Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

लोकमानस

आणखी काही गणिती गमती

 

श्रीरंग गोखले यांचे गणितातील गमतींविषयी पत्र (२८ जुलै) वाचले. ‘वार’ या शब्दाचा प्रयोग आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो. अनेकवार, क्रमवार, सोमवार, ‘तलवारीचा वार’ या प्रत्येक ठिकाणी ‘वार’चा अर्थ वेगळा आहे. दशमान पद्धतीपूर्वी गणितात लांबी मापणे पारंपरिक पद्धतीने चालत असे. १२ इंच म्हणजे १ फूट, तीन फूट म्हणजे १ यार्ड किंवा वार, २२० वार म्हणजे १ फर्लाग आणि ८ फर्लाग म्हणजे १ मैल असे मापन होते. त्यानुसार एक मैल = १७६० वार.
१७६० हा आकडा बहुधा यातूच आला असावा. यावरून एक विनोदही सांगितला जाई. शाळेत आलेले निरीक्षक एका विद्यार्थ्यांला विचारतात, ‘काय रे? एका मैलामध्ये किती यार्ड असतात?’ उत्तर न आल्याने तो विद्यार्थी चुळबुळत आपल्या शिक्षकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहतो. त्यावर ते शिक्षक तत्परतेने त्याला म्हणतात, ‘गाढवा! १७६० वेळा मी तुला सांगितलं की नीट अभ्यास करीत जा म्हणून!’ अर्थात विद्यार्थ्यांला त्याचं उत्तर आयतंच मिळतं..
सतीश बोन्तल, दादर, मुंबई

गृहिणींनो, शिका व भरपूर वाचा
खासगी टीव्ही वाहिन्यांच्या मालकांच्या कृपेने भरपेट मराठी मालिका रात्रंदिवस बघायला मिळतात. भरपूर नफा दिसल्यामुळे मालिकांचे पीक अमाप निघते पण त्यांचे ग्राहक बहुसंख्येने आमच्या माता-भगिनीच असतात. नोकरी करणाऱ्या महिला सायंकाळी या मालिका आवर्जून बघतात आणि गृहिणीवर्ग निवांतपणे दुपारी त्यांचा आस्वाद घेत असतो. पण अशाने वाहिन्यांचा टी.आर.पी. वाढण्याशिवाय बाकी काही साध्य होत नाही कारण या कार्यक्रमांचा बौद्धिक-मानसिक- शारीरिक विकासासाठी काही उपयोग नसतो.
याचा परिणाम म्हणजे जेव्हा ‘भावजी’ त्यांना विचारतात की, ‘आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन कोणता?’ तेव्हा त्यांना उत्तर देता येत नाही. अथवा ‘चालता बोलता’ विचारतो की, ‘संत रामदासांचे नाव काय?’ तेव्हा त्यांची बोलती बंद होते. त्या आपल्या फक्त नथ घालून ‘पाहायला आलेल्या’ कार्यक्रमासारख्या बसलेल्या असतात!
कित्येक गृहिणी साधे वर्तमानपत्र वाचत नाहीत, असे पाहण्यात आलेय. बऱ्याच गृहिणींकडे जी नियतकालिके येतात त्यात रोजच्या घडामोडींपेक्षा चघळता येणाऱ्या बातम्याच जास्त असतात.
म्हणून म्हणतो, गृहिणींनी खूप शिकावे. वाचावे. तरच त्यांना जगात काय चाललेय ते समजेल.
उल्हास सहस्रबुद्धे, कांजूर मार्ग, मुंबई