Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

कोल्हापुरात स्वतंत्र कक्षाच्या इमारतीची दूरवस्था
स्वाइन फ्लूच्या तीन संशयित
रुग्णांची गांभीर्याने दखल नाही
कोल्हापूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाईन फ्लूची प्रश्नथमिक लक्षणे दिसून आलेले तीन रुग्ण शहरात आहेत. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. जिल्हास्तरावरील कक्ष म्हणून महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलची निवड करण्यात आली असली तरी हा कक्ष जिथे करण्यात आला आहे तेथील इमारतीची दुरवस्था झाली आहे. या बाबीकडे आज स्थायी समितीच्या बैठकीत आशिष ढवळे, संजय निकम यांनी प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर या कक्ष इमारतीची दुरुस्ती तातडीने सुरू आहे, अशी सारवासारव प्रशासनाने केली.

नव्या जागेत जिल्हाधिकारी कार्यालयासह महसूल भवन उभारण्यास जनतेचा विरोध
वाहतूक समस्येत भर पडण्याची भीती
सोलापूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

शहरातील सात रस्त्यासारख्या अत्यंत गजबजलेल्या भागात शासकीय दूध योजनेच्या जागेत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थलांतर करून तेथेच महसूल भवन बांधण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध वाढत आहे. दरम्यान, या नव्या स्थलांतरित जागेत महसूल भवनाचे भूमिपूजन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असताना त्यास शहरातील बसपासह डाव्या पक्षांनी विरोध करून कार्यक्रमस्थळी काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
सात रस्त्यावरील शासकीय दूध योजनेच्या कार्यालयाच्या ताब्यात सुमारे दहा एकर जागा आहे. सध्या दररोज फक्त १६०० लिटपर्यंत दुधाचे संलकन या शासकीय दूध योजनेमार्फत होते.

साताऱ्यात स्वाइन फ्लूवर यशस्वी नियंत्रण- डॉ. सुरेश जगदाळे
सातारा, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाईन फ्लू साथ येथील आरोग्य विभागाने यशस्वीपणे नियंत्रणात आणली असून, २५ पैकी २१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा जिल्ह्य़ात पुणेप्रमाणेच साथ प्रतिबंधक कायदा लागू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात १० रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने उपचार केल्यामुळे त्यातील ५ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच पाचगणी येथील १६ रुग्णही बरे झाले असून, त्यांनाही हॉस्पिटलमधून सोडण्यात आले असल्याचे डॉ. जगदाळे यांनी सांगितले.

शालिनीताई काँग्रेसच्या वाटेवर; आज कौल घेणार
सातारा, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत आमदार शालिनीताई पाटील यांच्या क्रांतीसेना महाराष्ट्र या राजकीय पक्षाच्या गाजराची पुंगी न वाजताच मोडून पडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा हात धरण्यासाठी मतदारसंघातील जनतेचा कौल मागितला असून, येत्या शनिवारी ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या सोहळ्यात त्या आपली दिशा स्पष्ट करणार आङेत. कोरेगाव येथील स्वयंवर मंगल कार्यालयात शालिनीताईंच्या वाढदिवसाचा सोहळा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून, या निमित्त मतदारसंघातील त्यांच्या चाहत्या अनुयायांसाठी स्नेह भोजनही ठेवण्यात आले होते.

पालिका कर्मचाऱ्यांची सांगलीत निदर्शने
सांगली, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

महापालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर निदर्शने केली. या वेळी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन दिले. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या व राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिफारशीनुसार महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

राष्ट्रीयीकृत बँकांचा संप
पंढरपूर, ७ ऑगस्ट/वार्ताहर

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दि. ६ व ७ ऑगस्ट रोजी बँक कर्मचारी व अधिकारी यांना संपावर जाण्याचे आवाहन केले होते. पंढरपुरातील बँक कर्मचारीही या देशव्यापी संपात सहभागी झाले असून बँक कर्मचाऱ्यांनी आज स्टेट बँक ऑफ इंडियासमोर निदर्शने केली. कर्मचाऱ्यांना वेतन करार, अनुकंपा तत्त्वाखाली नेमणुका व पेन्शन पर्याय या प्रमुख मागण्या असल्याचे फोरमच्या वतीने सांगण्यात आले. सदर निदर्शने बँक ऑफ बडोदामधील कर्मचारी संघटनेचे उपमहासचिव जयंत दर्शने, स्टेट बँक स्टॉफ युनियनचे कार्यकारिणी सदस्य संजय देशपांडे, स्टेट बँक ऑफिसर्स असोसिएशनचे राजीव धवड, अर्जुन राऊत, दादा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
सदरहू कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र स्वामी, भावे, घोडके, आर. एम. कुलकर्णी, तारापूरकर, शंकरराव कांबळे, मधुकर कोरे, सूर्यगण, मिर्जी, गव्हाणे, अवघडे यांनी परिश्रम घेतले व निदर्शनात सहभागी झाले.

भाजपचे उद्या कोल्हापुरात ‘चले जाव’ आंदोलन
कोल्हापूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरलेल्या राज्यातील आघाडी सरकारला ‘चले जाव’चा नारा देण्यासाठी भाजपच्या वतीने येत्या क्रांतिदिनापासून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. कोल्हापुरात ९ ऑगस्ट रोजी कळंबा रोडवर रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवली आहे, असे भाजपने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
राज्यात गेली दहा वर्षे राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आघाडी सरकार आहे. या सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणे अवघड करून टाकले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या रोज वाढत जाणाऱ्या दरांनी जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. राज्याला प्रचंड कर्जाच्या खाईत ढकलण्याशिवाय या सरकारने काहीही केलेले नाही. एकूणच कारभार अनागोंदी पद्धतीने चालू आहे. मोक्याच्या जागा घशात घातल्या गेल्या आहेत. राज्याला विकासापासून दूर नेले आहे. अशा या सरकारला घालविण्यासाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनात जनतेने मोठय़ा संख्येने सहभागी होऊन राज्य शासनाविरुद्धचा आपला राग व्यक्त करावा, असे आवाहन भाजपचे आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.

‘गुंफण अकादमी’च्या वतीने विनोदी कथास्पर्धा
सातारा, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

राज्यातील नवोदित कथाकारांना प्रकाशात आणण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रेमलाताई चव्हाण राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेसाठी कथा पाठविण्याचे आवाहन येथील गुंफण अकादमंीचे विश्वस्त गजानन चेणगे यांनी केले आहे. लेखकांनी आपली सुटसुटीत विनोदी कथा कागदाच्या एकाच बाजूस सुवाच्च अक्षरात लिहून अथवा टाईप करून ३१ ऑगस्टपर्यंत गुंफण,द्वारा -विकास धुळेकर, १४६ अ, साईलीला अपार्टमेंट, दैनिक ऐक्यच्या मागे, प्रतापगंज, सातारा-४१५००२ या पत्त्यावर पाठवावी. अधिक माहितीसाठी ९८८१७३९७०९ किंवा ९८५०६५९७०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अकादमीचे विश्वस्त प्रश्न. आर. एस. हिरवे यांनी केले आहे. ‘गुंफण’ दिवाळी अंकासाठी नवोदित लेखकांनी कथा, कविता, चारोळ्या, विनोदी साहित्य पाठवावे, असे आवाहन सहसंपादक प्रश्नची गावसकर यांनी केले आहे.

विजेचा धक्का बसून महिलेचा जागीच मृत्यू
जत, ७ ऑगस्ट/वार्ताहर

जत येथील रामरावनगर येथे नळाचे पाणी मोटरने उचलत असताना विजेचा धक्का बसून वैशाली गंगाधर कोळी (वय २१, रा. सलगर बुद्रुक, ता. मंगळवेढा) ही विवाहिता जागीच मृत्युमुखी पडली. येथील नळ पाणीपुरवठा योजनेतून पाणी सोडण्यात आले होते. पाण्याचा दाब कमी असल्यामुळे पाणी उपसण्यासाठी विजेची मोटार लावण्यात आली होती. मात्र पाणी भरून झाल्यानंतर वीजपुरवठा बंद न करताच वैशाली कोळी यांनी या मोटरची पीन काढली. त्याचवेळी पायाखालची जागा ओली असल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. त्यात त्या जागेवरच बेशुद्ध पडल्या व मयत झाल्या. वैशाली कोळी या काही दिवसांपूर्वी रक्षाबंधनानिमित्त माहेरी आल्या होत्या. त्यांचे मूळगाव वळसंग हे असून, तेथे भावांना राखी बांधून त्या सायंकाळी जत येथे आपल्या वडिलांकडे आल्या होत्या.

जंगम समाज विकास संस्थेच्या शहर व तालुका अध्यक्षपदी घाणेगावकर
सोलापूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

येथील जंगम समाज विकास संस्थेच्या शहर व तालुका अध्यक्षपदी मराठी साहित्य मंडळाचे सदस्य सोमेश्वर मन्मथ घाणेगावकर यांची तर सचिवपदी प्रकाश यशवंत स्वामी यांची निवड करण्यात आली. शहरातील ऐनापूर मारुती रस्त्यावरील मानूरकर मठातील सभागृहामध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष शशिकांत रेवणसिद्ध चंद्रशेखर शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संस्थेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष, सचिवासह नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून त्यामध्ये सोमेश्वर घाणेगावकर (अध्यक्ष), उमेश सोमनाथस्वामी (उपाध्यक्ष), प्रकाश नागय्या स्वामी (उपाध्यक्ष), वीरेंद्र दसंगे (उपाध्यक्ष), प्रकाश यशवंत स्वामी (सचिव), यांची निवड करण्यात आली. नागनाथ पांडेकर, सांब गणेचारी, वालवडकर गुरुजी आदी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ वर्षे कार्यरत असलेल्या या संस्थेची वार्षिक सभा व नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम यशस्वितेसाठी अशोक मठपती, गणेश संबळे, प्रभुसिंग स्वामी, सचिन स्वामी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
तालुक्यातील पांगरी येथील सवरेदय विद्यामंदिर प्रशाला येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले घाणेगावकर अध्यक्षपदी निवडीनंतर म्हणाले की, जंगम समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देणे या प्रमुख कामासह विविध प्रकारचे समाजप्रबोधनपर कार्यक्रम सर्व समाजासाठी होणार आहे.

आटपाडीत मूर्तिकारांची गणेशमूर्तीसाठी धांदल
आटपाडी, ७ ऑगस्ट/वार्ताहर

आता अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी आटपाडी शहरातील मूर्तिकार सध्या मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात मग्न झाले आहेत. आटपाडी येथे रमेश टकले, अनिल दीक्षित, श्याम लांडगे, महालिंग कुंभार व अन्य मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करतात. गणेशोत्सव आता १५ दिवसांवर येऊन ठेपल्याने या मूर्तिकारांची चांगलीच धांदल उडाली आहे. चौंडेश्वरी कॉलनी येथील टकले बंधू यांच्या कारखान्यात सध्या मूर्तीवर अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. या कारखान्यात यावर्षी सात हजारांहून अधिक मूर्ती तयार केल्या जाणार आहेत. दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, शंखारूढ, जास्वंदी व अन्य स्वरूपातील घरगुती व गणेशोत्सव मंडळांसाठी सात फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, माती व रंगांच्या दरातील वाढीमुळे या मूर्तीचे दर दहा टक्क्यांनी वाढतील, असे सुरेश टकले यांनी सांगितले. मूर्तिकार राजू पोळ, बाळू सावंत, नितीन भोसले, विनायक टकले व अन्य सहकारी या उत्सव तयारीत मग्न आहेत. आटपाडीहून सांगोला, पंढरपूर, विटा, तासगाव व अकलूज आदी परिसरात या गणेशमूर्ती पाठविल्या जातात.

इचलकरंजीतील नगरसेवकाची माडगुळेत एकाला मारहाण
आटपाडी, ७ ऑगस्ट/ वार्ताहर

इचलकरंजी येथील एका माजी नगरसेवकाने आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथे मोजणीच्या कारणावरून एकास बेदम मारहाण केली. दरम्यान, या दहशतीच्या वातावरणात झालेल्या या मारहाणीमुळे अद्यापपर्यंत या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
माडगूळच्या पण सध्या इचलकरंजीत राहणाऱ्या या माजी नगरसेवकाचे माडगुळे येथे घर व शेतजमीन आहे. बांधाच्या कारणावरून त्याचे व शेजारच्या शेतकऱ्यांत वरचेवर बाचाबाची व भांडणे होत होती. या रोजच्या कटकटीला कंटाळून खंडोबा मंदिरानजीक असलेल्या या परिसरातील शेतकऱ्यांनी मोजणी मागितली होती. ही माहिती कळताच संतप्त माजी नगरसेवकाने आपल्या गुंडांसमवेत व हत्यारे बरोबर घेऊन एका शेतकऱ्याला मारहाण केली. या वेळी काही महिलांना त्यांनी बंदिस्त ठेवले होते, तर काही बघ्यांनाही किरकोळ मारहाण करून पिटाळून लावले. या घटनेमुळे माडगुळे गावात खळबळ उडाली असून, आज पोलिसांनी या गावास भेट दिली. परंतु दहशतीमुळे आमची तक्रार नसल्याचा जबाब संबंधित शेतकऱ्याने दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपले जाण्याची शक्यता बळावली आहे.

विष्णुदास भावे स्मृतिदिनानिमित्त सांगलीत उद्या कार्यक्रम
सांगली, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

नाटय़ पंढरीतील अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समिती व अखिल भारतीय नाटय़ परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी(९ ऑगस्ट)आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विष्णुदास भावे यांच्या जीवनावर आधारित ‘संगीत नाटय़ संभव’ या दोन अंकी संगीत नाटकाचे वाचन अभियंता डॉ. प्रियदर्शन मनोहर हे करणार आहेत. या नाटकामध्ये मराठीतील पहिले नाटक सांगलीनगरीमध्ये १८४३ साली रंगमंचकावर आले व तेव्हापासून मराठी नाटय़ व्यवसायास प्रश्नरंभ झाला. हे पहिले ‘सीता स्वयंवर आख्यान’ हे नाटक रंगमंचावर आणून ते व्यवसायावर रूढ करेपर्यंत विष्णुदास भावे यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्याची कथा या नाटकामध्ये गुंफलेली आहे. या नाटकाचे वाचन व त्यातील काही पदांचे गायन असा प्रयोग रविवारी दि. ९ ऑगस्ट रोजी येथील भावे नाटय़मंदिरात सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी डॉ. प्रियदर्शन मनोहर हे मार्गदर्शन करणार आहेत. सांगली शहर व परिसरातील ज्या कलाकारांनी विविध नाटय़ स्पर्धामध्ये पारितोषिके मिळवलेली आहेत. त्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. नाटय़रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कामगार सेनेचा मुंबईत उद्या मेळावा
कोल्हापूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या वतीने राज्यात प्रमुख जिल्ह्य़ांमध्ये कामगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून काही ठिकाणी यापूर्वी मेळावे झाले आहेत. रविवारी (९ ऑगस्ट) मुंबई येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत षण्मुखानंद हॉल येथे कामगार मेळावा होणार असल्याची माहिती भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस सूर्यकांत भोईटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार तसेच कामगार सेनेचे बाबुराव पाटील हे उपस्थित होते. यापूर्वी कोल्हापूर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, चिपळूण वगैरे ठिकाणी मेळावे झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्य़ात कामगारसेना रूजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील इंडोकाऊंट, युरोटेक्स, अरविंद, अमित, विल्सन मिल्समध्ये भारतीय कामगार सेनेची स्थापना झाली आहे. आजरा तालुक्यातील शेणोली येथेही या सेनेची स्थापना झाली असून कामगार वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सूर्यकांत भोईटे यांनी यावेळी सांगितले. अनेक उद्योगामध्ये भारतीय कामगार सेनेने संघटना म्हणून प्रवेश केला असला तरी अजून या संघटनेला मान्यता मिळालेली नाही. ही मान्यता मिळावी त्यासाठी रितसर प्रक्रिया सुरू असल्याचेही भोईटे यांनी यावेळी सांगितले.