Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कोल्हापुरात स्वतंत्र कक्षाच्या इमारतीची दूरवस्था
स्वाइन फ्लूच्या तीन संशयित
रुग्णांची गांभीर्याने दखल नाही
कोल्हापूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाईन फ्लूची प्रश्नथमिक लक्षणे दिसून आलेले तीन रुग्ण शहरात आहेत. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. जिल्हास्तरावरील कक्ष म्हणून महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलची निवड करण्यात आली असली तरी हा कक्ष जिथे

 

करण्यात आला आहे तेथील इमारतीची दुरवस्था झाली आहे. या बाबीकडे आज स्थायी समितीच्या बैठकीत आशिष ढवळे, संजय निकम यांनी प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर या कक्ष इमारतीची दुरुस्ती तातडीने सुरू आहे, अशी सारवासारव प्रशासनाने केली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती इंद्रजित सलगर हे होते.
पुणे, सातारा येथे स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कोल्हापूर शहरातही स्वाईन फ्लूची लक्षणे असलेले तीन रुग्ण आढळून आल्यानंतर या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून जिल्हास्तरावर महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. पण हा कक्ष असलेल्या इमारतीच्या दुरवस्थेकडे लक्ष गेल्यानंतर हा विषय आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. स्वाईन फ्लूच्या संदर्भात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.देशमुख हे दररोज लक्ष ठेवून आहेत. महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. कक्ष इमारतीची दुरुस्ती तातडीने सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
शहरातील कचरा उठावाचे काम रामकी कंपनीकडे आहे. पण या कंपनीकडून पूर्ण क्षमतेने कचऱ्याचा उठाव होत नाही. फायबरची कोंडाळी ठरावीक ठिकाणीच बसविण्यात आली आहेत. अशा आशयाच्या तक्रारी संभाजी देवणे, अशोक रेडेकर यांनी या बैठकीत केल्या. रामकी कंपनीला वारंवार नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्याकडून कचरा उठावाचे काम प्रभावीपणे होत नसेल तर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही इकडे सभासदांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असता पाणीपुरवठा विभागाकडून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
शहरातील अनेक उद्यानांकडे उद्यान विभागाचेच दुर्लक्ष झाले आहे. निसर्ग अलोक योजनेची अंमलबजावणी या विभागाकडून होत नाही, असे विजय सूर्यवंशी यांनी या बैठकीत सांगितल्यानंतर उद्यानांकडे तातडीने लक्ष दिले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. या बैठकीत नीलेश देसाई, सौ.मंगल ठोकळे, नंदकुमार गजगेश्वर, सुनील मोदी, पल्लवी मिठारी, शेखर घोटणे, प्रकाश मोहिते आदींनी अडचणी मांडल्या.
स्वाइन फ्ल्यू रुग्णांच्या तपासणीसाठी पथक
महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लू रुग्णास दाखल करून घेण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे आणि जिल्हय़ातील प्रश्नथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अशा रुग्णांसाठी दोन खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. स्वाइन फ्लू रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि आवश्यक ती सर्व यंत्रसामग्री आणि औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली.
आयसोलेशन हॉस्पिटल येथे उघडण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी संशयित स्वाइन फ्लू रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेण्यात येतील आणि ते राष्ट्रीय अणुसंज्ञान संस्थेत तपासणीसाठी तातडीने पाठविण्याची व्यवस्था जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूच्या संदर्भातील सर्व जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
स्वाइन फ्लू हा सौम्य प्रकारचा आजार असून त्यावर प्रभावी औषधे उपलब्ध असल्याने जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन देशमुख यांनी या वेळी बोलताना केले. विमानतळ, मध्यवर्ती बसस्थानक परिसर आणि रेल्वेस्थानक परिसर या ठिकाणी स्वाइन फ्लूच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि लोकजागरण करण्यासाठी बूथ उभे केले जाणार आहेत.
दरम्यान शहरातील लोकांनी स्वाइन फ्लूचा धसका घेतला असून, रुमालाने चेहरा झाकून घेणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. काहीजणांनी मास्कही लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाकडून आज मास्कचे वाटप करण्यात आले.