Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शालिनीताई काँग्रेसच्या वाटेवर; आज कौल घेणार
सातारा, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत आमदार शालिनीताई पाटील यांच्या क्रांतीसेना महाराष्ट्र या राजकीय पक्षाच्या गाजराची पुंगी न वाजताच मोडून पडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा हात धरण्यासाठी मतदारसंघातील जनतेचा कौल मागितला असून, येत्या शनिवारी ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या

 

वाढदिवसाच्या सोहळ्यात त्या आपली दिशा स्पष्ट करणार आङेत.
कोरेगाव येथील स्वयंवर मंगल कार्यालयात शालिनीताईंच्या वाढदिवसाचा सोहळा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून, या निमित्त मतदारसंघातील त्यांच्या चाहत्या अनुयायांसाठी स्नेह भोजनही ठेवण्यात आले होते. मात्र स्वाइन फ्लू, महामारी व साथीच्या रोगांच्या पाश्र्वभूमीवर व जिल्ह्य़ास साथ रोग प्रतिबंधक कायदा आदेश लागू करण्यात आल्याने स्नेह भोजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, त्याऐवजी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असल्याचे वाढदिवस उत्सव कमिटीने निमंत्रक शालिनीताईंचे भाजे राजेंद्र वसंतराव फाळके यांनी सांगितले. ज्येष्ट पत्रकार जयवंत गुजर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या वाढदिवसाच्या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीतून निलंबीत झालेल्या आमदार शालिनीताई या मूळच्या काँग्रेसच्याच आहेत. त्यांना पक्षात स्वीकारण्याबाबत हिरवा कंदील सातारच्या दौऱ्याच्यावेळी दाखवला आहे. मात्र त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मान्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
काँग्रेसचा हात धरताना ही अट त्या मान्य करणार का? याबाबत वाढदिवसाच्या सोहळ्यात काय बोलमार विधानसभा निवडणुकीतील त्यांची भूमिका काय सांगणार याबाबत जिल्ह्य़ात उत्सुकता निर्माण झाली आहे. कोरेगावच्या पुनर्रचित मतदारसंघात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व सातारा जिल्हा विकास परिषदेचे संस्थापक यशवंतभाऊ भोसले यांनी शालिनीताईंना धक्का देणयासाठी चालवलेल्या जोरदार हालचालींचा बंदोबस्त करण्याची कोणतीही रणनीती त्या जाहीर करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.