Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सोलापुरात तिघा ‘अतिरेक्यां’ना कंठस्नान घातले..
सोलापूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

बहुभाषकांच्या सोलापूर शहरात अतिरेक्यांनी घुसून एका जीपमधील प्रवाशांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी काही मिनिटांतच तेथे पोहोचून अतिरेक्यांचा बीमोड केला. नव्हे तिघा अतिरेक्यांना कंठस्नान घातले. विजापूर रस्त्यावर सोरेगाव येथे शुक्रवारी सकाळी तब्बल पाऊण तास अतिरेक्यांशी झुंज देतानाचा पोलिसांचा थरार नागरिकांनी अनुभवला खरा, पण ही सर्व

 

प्रश्नत्यक्षिके होती, हे जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा सर्वाचा जाव भांडय़ात पडला.
अलीकडे कोल्हापूर, सांगली व सातारा येथे अतिरेकी प्रतिबंधक आराखडय़ानुसार अतिरेक्यांशी लढण्याची प्रश्नत्यक्षिके स्थानिक पोलीस प्रशासनाकडून दाखविण्यात आली. त्या पाश्र्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनीही सकाळी अतिरेक्यांशी लढण्याचे प्रश्नत्यक्षिक यशस्वीपणे केले. यात पोलीस प्रशासनाकडून कोणतीही त्रुटी राहिली नसल्याचे नंतर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना स्पष्ट केले. मात्र पोलिसांच्या या थरारक प्रश्नत्यक्षिकांमुळे विजापूर रस्त्यावरील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती. त्या भागात अतिरेक्यांशी पोलीस चकमक झडत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांत काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते.
त्याचे असे झाले, की सकाळी ११ च्या सुमारास शहर पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनीद्वारे विजापूर रस्त्यावर अतिरेक्यांनी महिंद्रा कंपनीची जीप (एमएच १३-९३९४) प्रवाशांसह पळवून नेली व सर्व प्रवाशांना सोरेगावनजीक रस्त्याच्या कडेला एका पडक्या घरात ओलीस ठेवल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने कळविली. ही माहिती थोडाही विलंब न लावता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांचे कमांडो पथक सोरेगावच्या दिशेने आवश्यक शस्त्रसाठय़ांसह रवाना झाले. वीसजणांच्या या कमांडो पथकाचे नेतृत्व राखीव पोलीस निरीक्षक आर. पी. गायकवाड यांच्याकडे होते. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्यासह उपायुक्त डॉ. प्रभाकर बुधवंत, शाम दिघावकर, बापू यादव यांचा फौजफाटाही सोरेगावच्या दिशेने धावून गेला. त्या पाठोपाठ पोलिसांचे दंगलविरोधी ‘वज्र’ वाहन, रुग्णवाहिका, अग्निशामक दल धावून गेले. थोडय़ाच वेळात सोरेगावात अतिरेक्यांचा ठावठिकाणा सापडला आणि अतिरेक्यांच्या अड्डय़ाला कमांडो पोलिसांनी चपळाईने हेरून गोळीबार सुरू केला. अतिरेक्यांची संख्या दहा असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई आखली.
अतिरेक्यांशी पोलीस चकमक होत असल्याची माहिती आसपासच्या भागात समजण्यास विलंब लागला नाही. एका बाजूला अतिरेक्यांशी पोलीस चकमक होत असताना दुसऱ्या बाजूला वाहतूक पोलीस मुख्य रस्त्यावर नागरिकांना व वाहनधारकांना सावधानतेच्या सूचना देत होते. अखेर सुमारे चाळीस मिनिटांच्या पोलीस कमांडोंच्या कारवाईत तिघे अतिरेकी मारले गेले. मात्र दोन पोलीस जखमी झाले. तत्पूर्वी अतिरेक्यांना शरण येण्यासाठी पोलिसांना अश्रुधूरही सोडावा लागला. अतिरेक्यांच्या तावडीतून सर्व प्रवाशांची सुखरूपपणे सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले. अखेर ही सर्व प्रश्नत्यक्षिकांचा भाग असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले तेव्हा सर्वानी सुस्कारा सोडत टाकला.
या प्रश्नत्यक्षिकांनंतर पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी पोलीस प्रशासनातील प्रत्येक घटकाने पार पाडलेल्या जबाबदारीचा आढावा घेतला. यात उत्तम प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला. येत्या गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या काळात अतिरेकी किंवा आणखी कोणतेही घातपाती कृत्य होऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.