Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शिक्षण हक्क विधेयकातील जाचक तरतुदीविरोधात कृती समिती
कोल्हापूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

अत्यंत घाईगडबडीने मंजूर केले गेलेले शिक्षण हक्क विधेयक केवळ अपुरेच नाही तर जनताविरोधी आणि बालकविरोधी आहे. या विधेयकातील लोकविरोधी तरतुदी वगळण्यासाठी आणि आवश्यक असणाऱ्या तरतुदींचा समावेश करण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्यात येणार असून, त्यासाठी महाराष्ट्र शिक्षण हक्क कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय येथे झालेल्या

 

बैठकीत घेण्यात आला.
अठरा वयोगटाखाली असणाऱ्यांना बालक समजण्यात यावे व त्यांना दर्जेदार शिक्षण पुरविण्यात यावे, अशा आशयाचा एक ठराव १९७६ साली झालेल्या ब्राझील येथील आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेमध्ये संमत करण्यात आला असून, या ठरावावर भारताने पहिली स्वाक्षरी केलेली आहे. त्यामुळे १८ वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना समान दर्जाचे शिक्षण पुरविणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. तरीही केंद्र शासनाने यासंदर्भातील एक विधेयक चर्चा न करता सर्वसामान्य जनतेला विश्वासात न घेता मंजूर करण्यात आले आहे. मंजूर करण्याची ही पद्धत लोकशाही संकेताला पायदळी तुडविणारी आहे, असे मत या संदर्भात येथे झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
११० कोटींच्या जनतेच्या हितसंबंधांवर दूरगामी परिणाम करणारे हे विधेयक मंजूर करण्यापूर्वी लोकांमध्ये सुनावणीसाठी ठेवणे आवश्यक होते. त्यावर व्यापक प्रमाणात चर्चा होणे गरजेचे होते. पण या विधेयकाला लोकांचा विरोध होईल, या भीतीपोटी आणि शिक्षणसम्राटांच्या हितसंबंधांना धोका निर्माण होईल म्हणून जनसुनावणी घेण्यात आली नाही. आता यासंदर्भात एक व्यापक जनचळवळ उभारण्याचा निर्णय शिक्षण हक्क कृती समितीने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र शिक्षण हक्क कृती समितीची स्थापना केली जाणार आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रश्न.एन.डी.पाटील यांनी या समितीचे नेतृत्व करण्याचे मान्य केले आहे, तसेच ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे, प्रश्नचार्य सुनीलकुमार लवटे, प्रश्नचार्य डॉ.पी.एस.पाटील यांनीही या समितीमध्ये काम करण्यास होकार दिला आहे.
महाराष्ट्र शिक्षण हक्क कृती समितीच्या वतीने अन्याय्य विधेयक मागे घेण्यासाठी आणि सुधारित विधेयक मांडण्यात यावे, या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनामध्ये सर्व सामाजिक संघटना, शिक्षक संघटना, पालक, विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या समितीचे प्रभाकर आरडे, डॉ.राजेंद्र कुमार, श्रीमती अनुराधा भोसले यांनी केले आहे.