Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्रीय चर्मकार संघाचा सोमवारी सोलापुरात मेळावा
सुशीलकुमार प्रमुख पाहुणे
सोलापूर, ७ऑगस्ट/प्रतिनिधी

महाराष्ट्रीय चर्मकार संघाच्या सोलापूर शहर जिल्हा शाखेचा मेळावा येत्या सोमवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास

 

केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे हे उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान संघाचे संस्थापक-अध्यक्ष बबनराव घोलप हे भूषविणार आहेत, अशी माहिती संघाचे उपाध्यक्ष अशोक लांबतुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
या मेळाव्यास ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासह संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष संदेश कोंडविलकर, महापौर अरुणा वाकसे, खासदार आनंद अडसूळ, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सुभाष चव्हाण, आमदार डॉ. राम साळे, अश्विनी सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल, चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष रमेश मेढेकर, सरचिटणीस पंढरीनाथ पवार आदींची उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय चर्मकार संघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या सुरेखा लांबतुरे यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे लांबतुरे यांनी सांगितले.
या मेळाव्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अर्जुन वाघमारे (मोहोळ), गिरमल चाबुकस्वार (होटगी, ता. दक्षिण सोलापूर) व अश्विनी सहकारी रुग्णालये अध्यक्ष बिपीनभाई पटेल यांना ‘रोहिदास मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांना कर्जवाटप आणि गटई कामगारांना स्टॉल वाटप करण्यात येणार आहे. तसेच शासकीय रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी अशोक लांबतुरे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे संघाचे सदस्य मधुकर गवळी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस बबन शिंदे, बाळासाहेब आळसंदे, दिलीप टोणपे आदी उपस्थित होते.