Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

इस्लामपुरात १५ ऑगस्टला एक लाखाची दहीहंडी
इस्लामपूर, ७ ऑगस्ट/वार्ताहर

तब्बल एक लाख तीन हजार तीन रुपये बक्षिसाच्या ‘युवाशक्ती’ दहीहंडी स्पर्धेचे आयोजन दि. १५ ऑगस्ट रोजी वनश्री यूथ फाऊंडेशन संचलित महाडिक युवाशक्तीच्या वतीने इस्लामपूर येथे करण्यात आले आहे. ही माहिती संयोजनप्रमुख सम्राट महाडिक यांनी वार्ताहर बैठकीत दिली.

 

पश्चिम महाराष्ट्रात मानाची दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे. इस्लामपुरातील यल्लम्मा चौकात शनिवार दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता या दहीहंडी स्पर्धेस प्रश्नरंभ करण्यात येणार असल्याचेही सम्राट महाडिक यांनी सांगितले. एक लाख तीन हजार तीन रुपये बक्षिसाव्यतिरिक्त उत्कृष्ट सलामी व मनोरा यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेत शिरोळ, कोल्हापूर, तासगाव व कोकरूड याबरोबरच मुंबई व पुणे येथील गोविंदा पथके सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी सिनेअभिनेता श्रेयस तळपदे यांना खास निमंत्रित करण्यात आले आहे. या दहीहंडी स्पर्धेनिमित्ताने बंगलोर येथील फायर डान्स शो, मुंबईच्या लेसर व रॉक शो व लेडीज डीजे अशा आकर्षक कार्यक्रमांचे आयोजनही केले असून, प्रेक्षकांसाठी हे कार्यक्रम एक प्रेक्षणीय पर्वणीच ठरणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी व बक्षीस वितरणासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम, उद्योगमंत्री नारायण राणे, रोहयोमंत्री मदन पाटील, नीतेश राणे व जिल्हा काँग्रेसचे खजिनदार उद्योगपती नानासाहेब महाडिक आदी उपस्थित राहणार आहेत. या दहीहंडी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत संदीप माने, सतीश महाडिक, अ‍ॅड. फिरोज मगदूम, विजय कुंभार, सुजित थोरात, सोमनाथ फल्ले, चेतन शिंदे, कपिल ओसवाल, सनी खराडे व रितेश अग्रवाल यांचा समावेश आहे.