Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

बेपत्ता विद्यार्थ्यांच्या शोधासाठी निवडणूक बहिष्काराचा इशारा
शाहूवाडी, ७ ऑगस्ट / वार्ताहर

गाव शाहूवाडी तालुक्यातील परळे. शाळेतून घरी येताना प्रवीण विष्णू पाटील (वय १३) हा येथून २ जून रोजी बेपत्ता झाला. पोलिसांत तक्रार देऊन महिना झाला तरी तपासाला गती नाही. गावानेच

 

संशयित राजू उमर राऊत यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या शाहूवाडी पोलिसांवर ग्रामस्थांचा प्रचंड राग आहे. संशयित आरोपीच्या मुस्लीम वस्तीमधील घरावर जमाव चालूनही गेला होता. पण काहींच्या मध्यस्थीने हा पुढचा अनर्थ टळला. गावाने सोमवारी ‘रास्ता रोको’ करण्याचा आणि आगामी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता पोटच्या गोळ्याची वाट पाहून त्याची माउली मालूबाई हिने जमीन धरली आहे. तर बाप विष्णू पांडुरंग पाटील यांचे वाट पाहून डोळे आणि पोलिसांत हेलपाटे मारून मारून पायही थकलेत. दोन महिने झाले घरात कोणताही सण नाही. चूल पेटली नाही. शेजारी पाजारी जे देतील त्यावरच दिवस ढकलायचे चाललेत. एक इंचही जमीन नाही. त्यामुळे सातबारा माहीत नाही. मोलमजुरी, रोजगार करूनच पोट भरायचे. प्रवीण गायब झाल्याने खुरप्याची मूठही हातात धरलेली नाही. कोणाच्या वाळक्या पाल्यावर पाय न देणारे पाटील कुटुंब मोठय़ा बाक्या प्रसंगाला सामोरे जातेय. माझा प्रवीण दिसला का, म्हणून आई प्रत्येकाला विचारते. या तिचा प्रश्नाने अख्ख्या गावाला बैचेन केलेय.
प्रवीण दोन जूनला बेपत्ता झाला आणि ४ जूनला त्याच्या वडिलांनी शाहूवाडी पोलिसांत फिर्यात दाखल केली. दरम्यानच्या काळात गावातील राजू उमर राऊत हा गावात नसल्याने त्याच्यावर ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला. तशी खबरही पोलिसांना दिली. तो सातत्याने सासूरवाडी विजापूर व कर्नाटकातील अन्य भागात असतो. अखेर पोलिसांची दिरंगाई बघून ग्रामस्थांनीच संशयिताचा शोध घेतला आणि खास ४ ऑगस्ट रोजी पेठवडगाव येथे रात्री अकरा वाजता पकडले व शाहूवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला पोलिसांनी कर्नाटकात तपासाला नेल्याचे समजते. दरम्यान शाहूवाडी पोलिस यांच्यावर ग्रामसभेत थेट त्यांच्या निष्क्रियतेबद्दल आरोप झाले. तेही स्त्रियांच्याकडून अगदी टोकाचे. खरे तर असे कोणा पोलिस अधिकाऱ्याचे, राजकारण्याचे घडले असते तर असा विलंब झाला असता का ? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
सध्या गावात तणावाचे वातावरण असून संशयिताचे आईवडील बाहेरगावी गेल्याचे कळते तर त्याच्या मुसलमानवाडीतील मोहल्ल्यात पोलिसांचा बंदोबस्त आहे. संशयितांवरील रागामुळे आणि शाहूवाडी पोलिसांवरील आरोपांमुळे गावात स्फोटक स्थिती आहे. मलकापूर येथे सोमवारी १० ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्याचा व आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून तसा पत्रव्यवहार वरील प्रशासकीय पातळीवर करण्यात आला आहे.
सध्या पाटील कुटुंबीय प्रचंड धास्तीत आणि काळजीत जीवन जगते आहे. संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे ग्रामस्थांचा थेट आरोप आहे. विष्णू पाटील यांच्या दोन मुलांपैकी लहान बेपत्ता आहे. गावात एक घर तेही पावसाळ्यात गळणारे आणि जमीन भिजणारी आहे. आईच्या डोळ्याचे अश्रू तुटलेले नाहीत आणि बापाचे पोट खपाटीला गेले आहे. त्यांची ही अवस्था गरिबी आणि चांगुलपणा पाहून गावानेच सारी सूत्रे हाती घेतली आहेत. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु तपासकामात हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदार पोलिसांनाही शिक्षा झाली पाहिजे अशी ग्रामस्थांनी भावना आहे.