Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

गणेशोत्सवातील कमानींसाठी एक खिडकी योजनेची सूचना
सांगली, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

यंदाचा गणेशोत्सव शांततामय वातावरणात व सणाचे पावित्र्य राखून साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी केले.
आगामी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शांतता समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या

 

सभागृहात जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किशोर तावडे, अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब वाघमोडे, सांगली शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी निकेश खाटमोडे-पाटील व प्रश्नंताधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव या सणाचे पावित्र्य राखून शांततामय वातावरणात हा उत्सव साजरा करावा, याकामी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व शांतता समितीच्या सदस्यांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी वर्धने यांनी या बैठकीत सांगितले.
गणेशोत्सव मंडळांना मंडप व कमानी उभारणीस परवानगी देण्यासाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू करावी. या एक खिडकीत महापालिका, पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे. याबाबतचे सर्व नियंत्रण महापालिकेने करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाळासाहेब वाघमोडे म्हणाले, की उत्सवकाळात गणेशोत्सव मंडळाच्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असून मंडळाने दहा दिवस कार्यकर्ते उत्सवाच्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. समाजहिताचे भान ठेवून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सव साजरा करावा. तसेच गणेशमूर्तीची उंची प्रमाणापेक्षा जास्त असू नये. दि. २६ नोव्हेंबर २००८च्या पाश्र्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा होताना काही नियम कडक असणे आवश्यक असल्याचे सांगून गतवर्षी जसे गणेशोत्सव मंडळांनी सहकार्य केले, त्याचप्रमाणे यंदाही सहकार्य करावे, असे आवाहन केले. या बैठकीस शांतता समितीचे सदस्य किरण कांबळे, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, शैलेंद्र सॅमसन, आप्पासाहेब काटकर, श्री कदम व शिवाजी कांबळे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.