Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे विटंबन केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ‘मूक मोर्चा’
सोलापूर, ७ ऑगस्ट/वार्ताहर

परतूर (जि. जालना) येथील सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी संबंधित आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी ‘दलित

 

महासंघा’च्या वतीने मोहोळ येथे मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
परतूर येथील सत्यशोधक अण्णा भाऊ साठे पुतळा विटंबना प्रकरणी संबंधित आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, पांगरी (ता. बार्शी) पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू झालेल्या लक्ष्मण शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणी संबंधित सहा. पोलीस निरीक्षकासह डय़ुटीवरील सर्व कर्मचाऱ्यांवर दोषारोप पत्र दाखल करावे अशा आशयाचे निवेदन दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजीव खिलारे आणि मोहोळ तालुका अध्यक्ष संतोष खंदारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून मोहोळ तहसील कार्यालयावर ‘मूक मोर्चा’ काढला आणि तहसीलदार स्वाती शेंडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांना याबाबतचे निवेदन देऊन निषेध नोंदविला. या घटनेबाबत संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास दलित महासंघाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
या मूक मोर्चात विलास कांबळे, बबन खिलारे, रावसाहेब चोरमले, मदन सोनवणे, किरण खंदारे, महादेव खंदारे, रामा काळे, भैय्या कांबळे, संजय खवळे, दशरथ खंदारे आदी प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.