Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

किसन वीर कारखान्याच्या २२ मेगाव्ॉट वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन
सातारा, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

सत्ता हे सेवेचे साधन मानून किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने साखर उत्पादनाशिवाय गेल्या सहा वर्षात

 

विकासाच्या नवनवीन वाटा चोखाळल्या. २ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर आता कारखाना महत्त्वाकांक्षी २२ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीच्या दिशेने दमदार पाऊल टाकत आहे. आज या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. कारखान्याच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे.
आतापर्यंत उद्योग व ऊर्जाक्षेत्रात महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर ठरले आहे. मात्र मागील काही वर्षापासून वीजटंचाई हा राज्याच्या आर्थिक विकासासाठी अडथळा ठरू पाहत आहे. राज्याची वीजनिर्मिती क्षमता देशात सर्वात जास्त असूनही राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यामध्ये जवळपास चार हजार मेगावॉटची तफावत आहे. ही तफावत दूर करून महाराष्ट्र राज्य विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्य शासनाने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना वीजनिर्मितीसाठी प्रश्नेत्साहन देण्यासाठी राज्यातील ५५ सहकारी साखर कारखान्यांची निवड करून सुमारे १९०० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठरविलेले आहे. त्यात किसन वीर कारखान्याचा समावेश आहे. कारखान्याने यापूर्वीच अवघ्या ८५ लाखांत दोन मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प अवघ्या ३६ दिवसांत कार्यान्वित करून ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलेले आहे. दोन वर्षात २ मेगावॉटचा प्रकल्प पहिल्याच हंगामात गुंतवणूकमुक्त होऊन गेल्या दोन वर्षात सुमारे तीन कोटींचा नफा कारखान्याने मिळवला आहे. आता २२ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प चालविण्याच्या दिशेने कारखान्याने दमदार पाऊल उचलले आहे.
११३ कोटींच्या प्रकल्प उभारणीसाठी कारखान्याला ५ टक्के, म्हणजे ६ कोटी ७३ लाखांची गुंतवणूक करावी लागणार असून, शासनाचे ४ कोटी ९९ लाख रुपये भागभांडवल राहणार आहे. प्रकल्पाच्या ४० टक्के म्हणजे ३७ कोटी १६ लाख रुपये साखर विकासनिधीतून उभारण्यात येणार असून, ६० टक्के म्हणजे ६४ कोटी ८९ लाख रुपये एनसीडीसी अन्यथा अन्य वित्तीय संस्थांतून उपलब्ध करण्यात येणार आहेत.
कारखान्याच्या निर्मितीनंतर ४० वर्षात सर्वात मोठा हा प्रकल्प ठरणार आहे. ऑक्टोबर २०१० पर्यंत हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याच्या दिशेने व्यवस्थापनाची कार्यवाही सुरू आहे. प्रकल्प उभारणीनंतर पुढील दहा वर्षापर्यंत कारखान्याला खरेदी कर माफ होणार आहे. बगॅसपासून होणारी वीजनिर्मिती ही हरित ऊर्जा प्रकल्पामध्ये येत असल्यामुळे कार्बन क्रेडिटच्या रूपात अतिरिक्त उत्पन्न कारखान्यास मिळणार आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे ऊस उत्पादक शेतक ऱ्यांच्या उसाला जादा दर मिळण्याबरोबरच बेरोजगारांना मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतक ऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी स्व. किसन वीर व ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जांबच्या उजाड रानावर ४० वर्षापूर्वी कारखाना उभारला. त्यांना अभिप्रेत असणारा शेतकरी व कारखाना परिसराचा चौफेर विकास आमदार मदनदादा भोसले यांच्या कल्पकतेतून साकारतो आहे. २२ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीतून त्यांना अभिप्रेत असणारी क्रांतीच जांबच्या माळावर घडणार आहे. आज या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, विज्ञान-तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालयमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्याशी संबंधित सर्वच घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक एन. डी. निंबाळकर यांनी केले आहे.