Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पाणीप्रश्नावर सर्वसमावेशक आंदोलनाची गरज- डॉ. दिलीप येळगावकर
सातारा, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

सातारा जिल्ह्य़ाचे पाणी सांगलीला पळविले गेले ते त्यांच्या एकजुटीमुळेच, मात्र तसे सर्वसमावेशक आंदोलन दुर्दैवाने झाले नाही व झालेले प्रयत्न चिरडून टाकण्यात आले असल्याची खंत भाजपचे आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली व सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा व इतर मागण्यांसाठी आपण येत्या ९ ऑगस्ट रोजी जनआंदोलन

 

करणार असल्याचे जाहीर केले.
अनेकांनी पाणीप्रश्नावर मोहिमा काढल्या, त्याचे आपण स्वागत केले आहे. हा प्रश्न सर्वानी एकमुखाने लढण्याची गरज आहे. प्रश्न सुटेपर्यंत त्यासाठी पाठपुरावा करावा, मीही त्यामध्ये सहभागी होईन. काँग्रेसचे रणजित देशमुख यांनी संघर्ष यात्रा काढली त्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी पक्षाची यात्रा असल्याचे सांगितले. खरे तर ती यात्रा पक्षीय नव्हे तर एक होती, असा अभिप्रश्नय त्यांनी या वेळी दिला. आंदोलनात संकुचित भूमिका नसावी, पण आझाद मैदानावरील सभेत डॉ. भारत पाटणकर यांनी आपल्याला व्यासपीठावरून खाली उतरविल्याची आठवण त्यांनी सांगितली.
खटाव तालुक्यातील प्रतिस्पर्धी आपला भाव वाढविण्यासाठी तात्पुरती धंदेवाईक आंदोलने करीत आहेत. काँग्रेसचे जि.प. सदस्य सुरेंद गुदगे आपले कारनामे बाहेर काढण्याची भाषा करतात, यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. येळगावकर यांनी त्यांच्या आरोपाची वाट बघत असल्याचे सांगून पतिव्रत्याचा आव आणणाऱ्यांची अवस्था वेश्येपेक्षा वाईट असल्याचा आरोप त्यांनी केला.
टेंभू चाचणीस विरोध
टेंभू सिंचन योजनेद्वारे खटाव व माण तालुक्यास प्रत्येकी अडीच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय १८ जानेवारी २००७ रोजी घेतला असताना तो ३ नोव्हेंबर २००८ ला बदलण्यात आला. त्या विरोधात आपण संघर्ष करणार आहोत. चितळी (ता.खटाव) येथे टेंभू उड्डाणपुलाजवळ टेंभूची चाचणी रद्द करावी या मागणीसाठी ९ ऑगस्टला दुपारी एक वाजता जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये १५०० कोटी सिंचन प्रकल्पासाठी जाहीर करून दोन महिने उलटले तरी कोणतीही कामे सुरू झालेली नाहीत. दहा दिवसांवर आचारसंहिता आली. टेंडरवाल्यांकडून काही मिळतेय का, याची सत्ताधारी वाट बघत असल्याची शंका येत आहे.
महाराष्ट्र सरकारची गलथान अवस्था आहे. वाहून जाणारे पाणी तातडीने माण खटाव दुष्काळी तालुक्यांना मिळाले पाहिजे. येरळवाडी नेर धरणात अत्यल्प पाणी साठा आहे, तर आंधळी, पिंपळी धरण मोकळे आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे.
वीजटंचाई, भारनियमनाचे प्रमाण वाढते आहे, रात्री अखंडित वीज देण्याची घोषणा हवेत विरुन गेली आहे, महागाईने कळस गाठला असून ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना फटका बसतोय. केंद्र व राज्य सरकारचे धोरणच या महागाईस जबाबदार आहे. भाजपच्या वतीने राज्यभर त्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.