Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

अमेरिकेच्या ‘ड्रोन’ हल्ल्यात बैतुल्ला ठार
इस्लामाबाद, ७ ऑगस्ट/पीटीआय
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्याप्रकरणातील संशयित मुख्य सुत्रधार व त्या देशातील तालिबानचा प्रमुख असलेला मोस्ट वॉँटेड दहशतवादी बैतुल्ला मसूद व त्याची पत्नी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेले. त्यामुळे तालिबानी संघटनेला जोरदार धक्का बसला आहे.अमेरिकेच्या ड्रोन विमानातून क्षेपणास्त्रांचा मारा केला असता त्यात तो मारला गेला. दक्षिण वझिरीस्तानात मकीन भागात असलेल्या त्याच्या सासऱ्यांच्या घरात मसूद याने त्याच्या दुसऱ्या पत्नीसह आश्रय घेतला होता.


‘स्वाईन फ्लू’चे ९६ नवे रुग्ण
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

परदेशातून भारतात आलेल्या ४३ लाख लोकांची चाचणी करून स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांना हुडकून काढताना डॉक्टरांनी दाखविलेल्या कमालीच्या सातत्यामुळेच अन्य देशांच्या तुलनेत भारतात स्वाइन फ्लूचा प्रसार होऊ शकलेला नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद यांनी आज स्पष्ट केले असले तरीदेखील आज दिवसभरात देशामध्ये स्वाईन फ्लूचे तब्बल ९६ नवे रूग्ण आढळले असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील पाच डॉक्टरांचा स्वाईन फ्लूची लागण लागली असून आता तर नवी मुंबईतदेखील स्वाईन फ्लूचा एक रूग्ण आढळल्याने पुण्यापाठोपाठ हा रोग मुंबईच्या दाराशी येऊन पोहचला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाहतूक पोलिसांतील लाचखोरीची कबुली!
१३१ ‘कॅशियर’ शिपायांच्या बदल्या
मुंबई, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी
आपापल्या हद्दीतील मोठी शोरूम्स, हॉटेल, पिझ्झा पार्लर, पाण्याचे टँकर, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वाहतूक व पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन दुर्लक्षित करण्यासाठी वाहतूक पोलीस दलाच्या मुंबई शहरातील २४ चौक्यांच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांनी आपल्या मर्जीतील एका पोलीस शिपायांना ‘कॅशियर’ म्हणून नेमून त्यांच्यामार्फत संबंधितांकडून पद्धतशीरपणे लाच गोळा करण्याची पद्धत गेली काही दशके फोफावली होती, अशी स्पष्ट कबुली खुद्द वाहतूक पोलीस खात्यानेच न्यायालयापुढे दिली आहे.

कसाबची नाटकं सुरूच
मुंबई, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

दोन आठवडय़ांपूर्वी नाटय़मयरित्या गुन्ह्याची कबुली देऊन खटल्याला वेगळ्या वळणावर आणून ठेवणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब याने आज पुन्हा एकदा त्याच्यावर ठेवण्यात आलेले सर्वच्या सर्व आरोप आपल्याला मान्य असल्याचे सांगितले आणि त्यामुळे खटला निकाली काढावा, अशी विनंती विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्याकडे करून खटल्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला.

उपमुख्यमंत्र्यांचे ‘बंधन’ ठरले पोलिसांसाठीच्या खरेदीतील मोठा अडथळा!
प्रणव धल सामंता , नवी दिल्ली, ७ ऑगस्ट
पोलिसांसाठी २५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची कोणतीही खरेदी करायची असल्यास उपमुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय ती करू नये, अशा खरेदीसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाची मंजुरी अनिवार्य असल्याचे २००० साली तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बंधनकारक केले होते, असे २६ नोव्हेंबरच्या हल्ला प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेबाबतच्या चौकशीत आता जवळजवळ नऊ महिन्यांनी उघड झाले आहे.

मांसाहार बंदीच्या मागणीला आयुक्तांचा झटका
मुंबई, ७ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

कोणाच्या तरी लहरी मागणीसाठी आमच्या पोटावर पाय का आणता, आम्ही जगायचे कसे, ज्यांना मासे-मटण खायचे असेल त्यांच्यावर कोणत्या कायद्याने बंदी आणणार.. महापालिका आयुक्त जयराज फाटक, तसेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आज कोळी बांधव-भगनी व मटणविक्रेत्यांच्या संतप्त प्रश्नांच्या भडिमाराला सामोरे जावे लागले. मांसाहाराला विरोध करणाऱ्या बिल्डर लॉबीचा, तसेच काही भाजप व काँग्रेस आमदारांच्या दबावापुढे गुढगे टेकून देवनार कत्तलखान्याला आठवडाभर टाळे लागणार होते.

गेटवे, झव्हेरी बाजार बॉम्बस्फोटातील तपास
अधिकाऱ्यांची बक्षिसी मात्र लाल फितीत!
निशांत सरवणकर ,मुंबई, ७ ऑगस्ट
गेटवे ऑफ इंडिया आणि झव्हेरी बाजार येथे २००३ मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटप्रकरणी पोटा न्यायालयाने तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली असली तरी हे प्रकरण ज्यांच्यामुळे उघड झाले त्या चार पोलिसांना कुठल्याही स्वरुपाचे साधे बक्षीसही आज सहा वर्षांनंतर देण्यात आलेले नाही. या चार पोलिसांना पदोन्नती देण्याची फाईल महासंचालक कार्यालयात २००३ मध्ये जी अडकून पडली ती पुन्हा बाहेर आलीच नाही.

गुलशन बावरा यांचे निधन
मुंबई, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘मेरे देश की धरती’, ‘यारी है इमान मेरा’ इत्यादी लोकप्रिय गाण्यांचे गीतकार गुलशन बावरा यांचे आज मुंबईतील पाली हिल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे. गुलशन बावरा यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात येणार आहे. गुलशन बावरा यांना रंगीबेरंगी शर्ट घालण्याची हौस होती. त्यामुळे चित्रपट वितरक शांतीभाई पटेल यांनी त्यांचे ‘बावरा’ असे नामकरण केले होते. पाकिस्तानात जन्मलेले गुलशन बावरा फाळणीनंतर त्यांच्या मात्यापित्यासह भारतात आले. पण त्यावेळी झालेल्या दंगलीत त्यांचे आईवडिल मारले गेले. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काही काळ भारतीय रेल्वेखात्यातही काम केले होते. ते फार चोखंदळ असल्यामुळे त्यांच्या ४९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी केवळ २५० गाणी रचली. १९५९ साली प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रसेना’ या चित्रपटातील ‘मै क्या जानू कहाँ’ या गाण्यापासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. ‘सट्टा बाजार’ या चित्रपटातील ‘चांदी के चंद टुकडो के लिये’, ‘आकडे का धंदा’ आणि ‘तुम्हे याद होगा कभी हम मिले थे’ या गाण्यांमुळे बावरा यांचे नाव चर्चेत आले. कल्याणजी-आनंदजी या दुकलीने त्यांच्या ६९ गाण्यांना संगीत दिले होते.

१२९ तालुक्यांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती
मुंबई, ७ ऑगस्ट / खास प्रतिनिधी
पावसाने दडी मारल्याने सरासरीपेक्षा ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या राज्यातील १२९ तालुक्यांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती राज्य सरकारने जाहीर केली आहे. टंचाई जाहीर झालेल्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना महसुलात सवलत, वीज बिलात ३३ टक्के सूट, कर्जाचे रूपांतर, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे.टंचाई जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्य़ांमध्ये मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्य़ांचा समावेश आहे. नांदेड (१६ तालुके), लातूर (१० तालुके), औरंगाबाद (९), जालना (८), बीड (११), परभणी (९), उस्मानाबाद (८), हिंगोली (५), चंद्रपूर (१५), यवतमाळ (१६) या तालुक्यांचा समावेश आहे. त्याशिवाय ठाणे जिल्ह्य़ातील अंबरनाथ, पेण (रायगड), नवापूर (नंदुरबार), वडगाव (जळगाव), धारणी (अमरावती), देऊळगाव राजा (बुलढाणा), मानोरा (वाशिम), चामरोशी, कोरची आणि अहेरी (गडचिरोली), वेल्हा आणि आंबेगाव (पुणे), पलुस व जत (सांगली), उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, अक्कलकोट, पढंरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ (सोलापूर), गगनबावडा (कोल्हापूर) हे टंचाईसदृश तालुके म्हणून जाहीर झाले आहेत.

तलावांत १८० दिवसांचा पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत सध्या १८० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. या महिन्यात पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना जास्त काळ पाणीकपात सहन करावी लागणार नाही, असे आज पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी स्पष्ट केले.

पुनर्वसनाच्या मागणीकरिता गिरणी कामगारांचा उद्यापासून बेमुदत सत्याग्रह
मुंबई, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

५५ हजार गिरणी कामगारांना घरे आणि प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अनुदानाची सरकारने घोषणा केली तरी अंमलबजावणी मात्र आजवर नगण्यच राहिली. गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाबाबत सरकारच्या या अनास्थेविरोधात, येत्या ९ ऑगस्टपासून म्हणजे ‘ऑगस्ट क्रांतिदिना’चे औचित्य साधून कामगार व त्यांच्या कुटुंबियांकडून बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. पुनर्वसनाच्या नावाने कायदा झाला, वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडून केवळ घोषणाबाजीही होते परंतु प्रत्यक्षात गिरणी कामगारांची फसगतच सुरू आहे, असा आरोप या सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करणाऱ्या सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष उदय भट यांनी केला. सर्वस्व गमावलेला गिरणी कामगार गावी परतला असला तरी प्रत्यक्षात तो हरलेला नसून, पुनर्वसनाचा लढा मुंबईसह कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यातून उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व कामगार व त्यांचे कुटुंबिय ९ ऑगस्टच्या बेमुदत ठिय्यामध्ये सामील होण्यासाठी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील ६१ गिरण्यातून जवळजवळ दोन लाख कामगारांचा रोजगार हिरावला गेला आहे. १९९१ सालच्या डीसी रूलमध्ये गिरण मालक आणि बिल्डरधार्जिण्या सुधारणा केल्या गेल्यानंतरही बहुतांश मालकांनी त्याचे पालन केलेले नाही. या सुधारणेमुळे फक्त १५ हजार गिरणी कामगारांनाच घरे मिळू शकतील आणि त्यासाठीही पाच ते सहा लाख रुपये किंमत मोजावी लागेल. गिरगावच्या ऑगस्ट क्रांती मैदानातील हुतात्मा स्तंभाला सकाळी १० वाजता अभिवादन करून या ठिय्या आंदोलनाला सुरुवात होईल.

सरकारी बँकांचा संप ‘कॅशलेस’ एटीएममुळे सामान्य ग्राहक हैराण
मुंबई, ७ ऑगस्ट/ व्यापार प्रतिनिधी

सरकारी बँकांतील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाचे चटके व्यापार-उद्योगजगतासह सर्वसामान्य ग्राहकांनाही आज जळजळीतपणे जाणवले. बँकेबाहेरचे ग्राहकसंपर्काचे माध्यम असलेली एटीएम केंद्रे जरी संपात सहभागी नसली तरी दोन दिवस नव्याने ‘कॅश’ भरली न गेल्याने बहुतांश एटीएम रिकामी झाली होती. महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन होणाऱ्या सामान्य पगारदारांसाठी महिनाअखेरची झळ त्यामुळे यंदा तुलनेने चांगलीच झोंबणारी ठरली. स्टेट बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांच्या देशभरातील ६० हजारांहून अधिक शाखांमधील तब्बल १०लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या नऊ संघटनांनी एकत्र येऊन स्थापलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ या महासंघाने या दोन दिवसांच्या संपाची हाक दिली होती. महासंघाच्या मुंबईतील प्रवक्त्याच्या मते संपूर्ण देशभरात संप १०० टक्के यशस्वी ठरला. केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही संपाची दखल घेऊन त्या संबंधी संसदेत निवेदन करताना भारतीय बँक महासंघाला वाटाघाटी करण्यासाठी सूचित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्रत्येक शुक्रवारी