Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

उस्मानाबाद जिल्हा बँकेवर दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व
विरोधकांचा धुव्वा
उस्मानाबाद, ८ जुलै/वार्ताहर

जिल्ह्य़ाच्या सहकार क्षेत्रात विरोधी पक्षाला फारशी किंमत नसल्याचे सिद्ध करीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविले. संचालक पदाच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीने यश मिळविले. बँक बचाव आघाडीतील शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील वगळता विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. जिल्हा बँकेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ व काँग्रेसचे ५ सदस्य निवडून आले आहेत.

मराठवाडय़ात सर्वदूर दमदार पाऊस
बीड, ८ जुलै/वार्ताहर

तब्बल महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर पावसाने काल मध्यरात्रीपासून सर्वदूर हजेरी लावली. तीन तालुक्यांत मध्यरात्रीनंतर जोराचा पाऊस झाला, तर बुधवारी सायंकाळी तासभर बीडसह इतर ठिकाणी पावसाने जोराची हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीच्या तयारीला लागला आहे, तर प्रथमच रस्ते व नाल्यातून पाणी वाहिले. बीड जिल्ह्य़ात या वर्षी मृगनक्षत्र सुरू होवून तब्बल महिन्याचा कालावधी लोटला. कधी तुरळक तर कधी हलक्या स्वरूपाच्या पावसाचे आगमन होत राहिले. मात्र खरिपाच्या पेरणीला आवश्यक असणारा पाऊस काही पडला नाही.

देवदर्शन करून निघालेल्या मोटारीस अपघात; येरमाळ्याचे पाच ठार
कळंब, ८ जुलै/वार्ताहर

तुळजापूर रस्त्यावरील उळे गावाजवळ दर्शन ढाब्यासमोर एका मोटारीला मालमोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील येरमाळा येथील पाचजण जागीच ठार झाले. एकाची प्रकृती चिंताजनक आहे.हा अपघात मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडला. तालुक्यातील येरमाळा येथील पाचजण जागीच ठार झाले. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मरण पावलेल्या पाच जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी होईपर्यंत येरमाळा व पंचक्रोशीमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली.

‘त्या’ ग्रेडर्सच्या संपत्तीवर ‘टाच’ येणार!
ओल्या कापसाची खरेदी
औरंगाबाद, ८ जुलै/प्रतिनिधी

गेल्या वर्षी पणन महासंघाच्या माध्यमातून नाफेडने खरेदी केलेल्या १५ लाख टन कापसापैकी बराच कापूस ओला खरेदी झाल्याचे उघड असताना त्यांच्यावर केवळ निलंबनाची व काहींवर बडतर्फीची कारवाई झाली. मात्र आता महामंडळाने त्याच्याही पुढे जाऊन झालेल्या नुकसानीची भरपाई त्या ग्रेडर्सच्या संपत्तीवर टाच आणून करण्याची तयारी चालू आहे. राज्यात गेल्या वषीई १५ लाख टन कापसाची खरेदी नाफेडने केली.

आधी स्थलांतर,मग उद्घाटन
नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय सात महिन्यांपूर्वीच सुरु; १४ रोजी उद्घाटन
नांदेड, ८ जुलै/वार्ताहर

सुमारे सात महिन्यांपूर्वी कार्यान्वित झालेल्या टोलेजंग पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन १४ जुलैला करण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकार म्हणजे संसार सुरू झाल्यानंतर जाहीर विवाह करण्यासारखा होय, असे मानले जाते. नांदेडसारख्या सर्वाधिक गुन्हे घडणाऱ्या जिल्ह्य़ात सुसज्ज पोलीस अधीक्षक कार्यालय असावे या हेतूने तत्कालीन पोलीस प्रमुख फत्तेसिंह पाटील यांनी प्रयत्न केले होते. गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर फत्तेसिंह पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने राज्याच्या गृह विभागाने नव्या इमारतीसाठी घसघशीत निधी मंजूर केला होता.

डॉ. यु. म. पठाण यांना कुसुमताई चव्हाण पुरस्कार
औरंगाबाद, ८ जुलै/खास प्रतिनिधी

पहिल्या विश्व संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांना मराठी साहित्यातील अमूल्य योगदानाबद्दल कुसुमताई चव्हाण स्मृतिजीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात १४ जुलै रोजी होणार आहे. डॉ. पठाण हे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.

अटकपूर्व जामीन नामंजूर होताच आरोपींचे न्यायालयातून पलायन
अंबाजोगाई, ८ जुलै/वार्ताहर

सेवानिवृत्त जमादारास मारहाण केल्याप्रकरणातील नऊ आरोपी आज अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी आले असता न्यायालयाने जामीन नामंजूर करताच नऊपैकी पाच आरोपी न्यायालयातून पसार झाले. यातील तीन महिला आरोपींना जामीन मंजूर झाला असून एकजण स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील आश्रुबा किसन घोळवे, प्रकाश आश्रुबा घोळवे, कल्याण आश्रुबा घोळवे, त्रिंबक आश्रुबा घोळवे, संजय आश्रुबा घोळवे, विजय आश्रुबा घोळवे यांच्यासह तीन महिलांनी सेवानिवृत्त जमादार देविदास किसन घोळवे यांना गेल्या आठ दिवसांपूर्वी जबर मारहाण केली होती. यात ते गंभीर जखमी झाल्याने वरील नऊजणांवर केज पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी आज नऊ आरोपी तदर्थ तिसरे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी हजर झाले होते. यापैकी तीन महिलांचा जामीन मंजूर करण्यात आला; परंतु सहा आरोपींचा जामीन नामंजूर झाल्यामुळे पाचजण न्यायालयातून पसार झाले. यातील आश्रुबा किसन घोळवे स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. नामंजूर झालेल्या आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन होऊन अटक होणे आवश्यक होते; परंतु न्यायालयात पोलीस हजर नसल्याने आरोपींनी न्यायालयातून पळ काढला. यातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

जिल्हा बँकेसह विमा कंपनीविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार-निलंगेकर
निलंगा, ८ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीकविमा वाटपात दुजाभाव करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसह विमा कंपनीला उच्च न्यायालयात खेचणार असल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज पत्रकार बैठकीत सांगितले. उद्या (गुरुवारी) उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळेच तालुक्यावर अन्याय झाला आहे. तालुक्यातील २४४२६ लोकांनी १ कोटी १९ लाख ९७ हजार रुपये विमा भरला आहे. यातच रात्रभर जागून काही शेतकऱ्यांनी ३१ जुलै २००८ च्या मध्यरात्री १५० टक्क्य़ांनी विमा भरला असतानाही लातूर जिल्हा बँकेच्या व काँग्रेस पुढाऱ्यांच्या दुजाभावामुळे निलंगा तालुक्यातील शेतकऱ्याला १०० टक्क्य़ाने विमा तर लातूरकरांना मात्र सरसकट १५० टक्क्य़ांनी विमा मंजुरीचे काम करण्यात आले आहे. यामुळे निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांविषयी अन्यायी भूमिका वठविणाऱ्या तालुक्याच्या काँग्रेस पुढारी यांच्यासह लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक व पीक विमा कंपनीला उच्च न्यायालयात खेचणार आहे. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी उद्या उपोषण सुरू करणार आहे. न्याय नाही मिळाल्यास आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

छायाचित्रकार संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार
अंबाजोगाई, ८ जुलै/वार्ताहर

शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत प्रत्येक विद्यालयातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अंबाजोगाई छायाचित्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत बर्दापूरकर, संघटनेचे अध्यक्ष विनायक सोळुंके, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव विनय परदेशी यांची उपस्थिती होती. या वेळी खोलेश्वर विद्यालयाचा राघव जोशी, गोदावरी कुंकुलोळची प्रीती लहाने, सेंट अ‍ॅन्थोनीची विदुला पाठक, मिल्लियाची आफशा सय्यद, योगेश्वरी नूतन विद्यालयाचा योगेश राऊत, नेताजीची सोनल कत्राळे, वेणुताईची पूनम सादुळे, ज्ञानेश्वरी पांचाळ, लक्ष्मी गुट्टे, सोनाली करपे, गौरी छत्रबंद आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्ममाचे सूत्रसंचालन अभय खोगरे यांनी तर प्रश्नस्ताविक नागेश औताडे यांनी केले. उपस्थितांचे आभार अशोक कचरे यांनी मानले.

धर्माबादचे ग्रामीण रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
बिलोली, ८ जुलै/वार्ताहर

धर्माबाद येथे ५५ लाख रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधून एक वर्ष पूर्ण झाले, पण अद्यापि या इमारतीचे उद्घाटन झाले नाही. उद्घाटनाचा मुहूर्त कधी लागेल, याचीच सर्वाना प्रतीक्षा लागून आहे. धर्माबाद येथील जुन्या शासकीय रुग्णालयात कोणत्याही सुविधा नसल्याने नवीन रुग्णालय बांधकामाला मान्यता मिळाली. त्यासाठी ५५ लाखांचा निधीही मंजूर झाला. सात एकर जमिनीत २००६ पासून बांधकामास सुरुवात झाली. गेल्या वर्षी हे बांधकाम पूर्ण झाले.
या इमारतीत पाणी व विजेची व्यवस्था करण्यात आली, रुग्णालयात तीन वॉर्ड असून प्रत्येकाचा वेगळा विभाग आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष, प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग, सामान्य विभाग, शौचालयाची व्यवस्थाही आहे. पण सोनोग्राफी, सिटीस्कॅन आणि अतिगंभीर रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या यंत्रणेची सोय व्हावी, विंचू, सर्पदंशावर उपचार व्हावा, बालरोगतज्ज्ञ नियुक्त करावा व या इमारतीचे तातडीने उद्घाटन व्हावे आणि रुग्णांच्या सेवेत रुजू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

शिक्षकांअभावी विद्यार्थी दुसऱ्या गावांतील शाळेत दाखल
सोयगाव, ८ जुलै/वार्ताहर

जिल्हा परिषद हायस्कूलमधील शिक्षकांची रिक्त पदे अजूनही न भरल्याने पालकांनी आपली मुले परजिल्ह्य़ात पाठवायला सुरुवात केली आहे. तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात असलेल्या उणिवा पालकांना नेहमीचा त्रासदायक ठरल्या आहेत. प्रश्नथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षकाची रिक्त पदे न भरल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ७ ते ८ वर्षापासून माध्यमिक शाळेला मुख्याध्यापक नाही. सहा वर्षापासून रिक्त असलेली क्रीडा शिक्षकाची जागा आता भरली आहे. गणित, चित्रकला, हस्तकला विषयाला शिक्षक नाही. लिपिकाची बदली झाली आहे, शिपायाची जागा रिक्त आहे. विद्यार्थ्यांना प्यायला शाळेत पाणी नाही. प्रश्नथमिक विभागात सुदैवाने शिक्षकांची संख्या पुरेशी आहे. मात्र शाळा धोकादायक झाली आहे. वर्गातील भिंतीला तडे गेले, स्लॅबलाही चिरा पडल्या. कन्या शाळेच्या सर्व वर्गात दुर्गंधी येत असल्याने नाक मुठीत ठेवूनच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेणयासाठीही विद्यार्थी परजिल्ह्य़ातील शेंदुर्णी येथे जाऊ लागले आहेत.

‘ मॅग्मो’च्या आंदोलनामुळे बाह्य़रुग्ण विभाग बंद
बीड, ८ जुलै/वार्ताहर

केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही सहावा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी मॅग्मो संघटनेच्या वतीने एकदिवस बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे बुधवारी जिल्ह्य़ातील सर्व प्रश्नथमिक आरोग्य केंद्रांतील बाह्य़रुग्ण विभाग बंद राहिले. जिल्ह्य़ात मॅग्मो संघटनेच्या वतीने जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग मिळावा यासाठी बुधवारी दिवसभर प्रश्नथमिक आरोग्य केंद्राचे बाह्य़रुग्ण विभाग बंद ठेवण्यात आले. जिल्ह्य़ातील ५० प्रश्नथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला. अत्यावश्यक सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी चव्हाण यांनी एक दिवस अगोदरच नियोजन केले होते. बंदच्या काळात खालापुरी, खरमोहा या भागांतील आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. आरोग्य सेवेवर दिवसभर परिणाम जाणवला. सरकारने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा शुक्रवारी (दि.१०) ग्रामीण रुग्णालय, त्यानंतर जिल्हा रुग्णालय बंद करण्याबाबत संघटनेला निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांनी दिला आहे.

पोलिसात तक्रार दिली म्हणून पत्नीला बेदम मारहाण
औरंगाबाद, ८ जुलै/प्रतिनिधी

पोलिसात तक्रार तसेच न्यायालयात दावा केला म्हणून पत्नीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी प्रकाश मोगल गायकवाड आणि त्याच्या बहिणीविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. जयश्री गायकवाड (वय २४, रा. साईशक्तीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाद झाल्याने त्यांनी पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. तसेच त्यांनी कौटुंबिक न्यायालयातही धाव घेतली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मंगळवारी सकाळी त्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. तेथेच प्रकाश आणि त्याची बहीण शोभा यांनी त्यांना गाठले. आमच्या विरोधात तक्रार करते, न्यायालयात जाते, असे म्हणत प्रकाशने त्यांच्या डोक्यात दगड घातला तसेच तुझे डोळेच फोडतो, असे म्हणत गालावर स्क्रू ड्रावरने गालावर वार केले. शोभाने लाथाबुक्क्य़ाने मारहाण केली. पोलिसांनी गायकवाड बहीण-भावंडाविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद केली आहे.

मुनी मिश्रीलालजी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन
औरंगाबाद, ८ जुलै/प्रतिनिधी

गुरुगणेशनगर स्थानकवासी जैन शिक्षण समिती औरंगाबाद संचालित दक्षिण केसरी मुनी मिश्रीलालजी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राजेंद्र दर्डा, डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, संस्था चेअरमन, ओमप्रकाश पोकर्णा, प्रश्नचार्य डॉ. एस. एम. देसरडा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आश्रमातील साध्वी माताजींचे दर्शन घेतल्यानंतर संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. चव्हाण म्हणाले, गुरुपौर्णिमेनिमित्त जैन साध्वी माताजींच दर्शनाचा लाभ घेताना समाधान लाभले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन प्रगतीचा मार्ग पादाक्रांत करावा. या संस्थेतील शिक्षण परोपकाराची भावना वृद्धिंगत करील, असेही त्यांनी सांगून संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी प्रतिष्ठित मान्यवर, महाविद्यालयातील मुले-मुली व अध्यापकवर्ग उपस्थित होता.

कविवर्य मंगेश पाडगावकर यांना आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार जाहीर
अंबाजोगाई, ८ जुलै/वार्ताहर

महाराष्ट्रभूषण कवी मंगेश पाडगावकर यांना आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येथील अ‍ॅड. आर. डी. देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राज्यातील कवीला हा पुरस्कार देण्यात येतो, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव दिनकर जोशी यांनी दिली. पुरस्कार वितरण समारंभ येत्या १२ जुलैला सायंकाळी सहा वाजता येथील नगरपालिका सभागृहात होणार आहे. पुरस्कार वितरणानंतर कवी मंगेश पाडगावकर यांचे काव्यवाचन आणि मुलाखतीचा कार्यक्रम होईल. वृत्तनिवेदिका दिपाली केळकर या मुलाखत घेतील. प्रमुख पाहुणे म्हणून योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे आणि भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह प्रश्न. सतीश पत्की उपस्थित राहणार आहे. यावेळी मंदार आपटे आणि विद्या करलगीकर हे ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक बाळासाहेब मुकदम, प्रमोद चरखा, आदींनी केले आहे. यापूर्वी रामदास फुटाणे, प्रश्न. प्रशांत मोरे, प्रश्न. फ. मुं. शिंदे, अशोक नायगावकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

रामानंद तीर्थ विद्यापीठातील १६७ अस्थायी कर्मचारी कायम
नांदेड, ८ जुलै/वार्ताहर

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील १६७ अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १६७ कर्मचारी वेगवेगळ्या विभागांत गेल्या १२ ते १३ वर्षापासून कार्यरत आहेत. विद्यापीठ उभारणीच्या वेळी ज्यांच्या जमिनी घेतल्या अशांना नोकरीवर घेण्यात आले; परंतु त्यांना कायम करण्यात आले नव्हते. अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती. कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. के. एम. कुलकर्णी यांनी सुरुवात केली. नांदेडचे भूमिपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडेही याबाबत कर्मचाऱ्यांनी साकडे घातले होते. व्यवस्थापन परिषदही सकारात्मक निर्णय घेण्याच्या भूमिकेतच होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत स्पष्ट आदेश दिल्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. १२ वर्षे म्हणजे तपापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची रास्त मागणी मान्य केल्याबद्दल कर्मचारी संघटनेने कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांचे आभार मानले आहेत. संघटनेचे वसंत पवार, धानोरकर, दर्शनकार, पडधण यांनीही कुलगुरूंचे संघटनेच्या वतीने आभार मानले.

राज्यातील ४० हजार औषध विक्रेत्यांना प्रशिक्षित करणार - नावंदर
निलंगा, ८ जुलै/वार्ताहर

समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी याकरिता आरोग्यसेवेचे महत्त्व जाणून घेऊन महाराष्ट्र केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने राज्यातील ४० हजार औषध विक्रेत्यांना प्रशिक्षित करण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन राज्य सचिव अनिल नावंदर यांनी केले.
निलंगा येथे लातूर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या तालुका शाखेच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष कुमार चापसी, मराठवाडा विभागाचे सचिव अरुण बरकसे, जिल्हा सचिव रामदास भोसले, जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश बाहेती, धनंजय जोशी, ईश्वर बाहेती, अतुल कोटलवार आदी उपस्थित होते. तालुक्याचे नूतन अध्यक्ष तुकाराम गोमसाळे, उपाध्यक्ष बालाजी शेटे, शिवाजी सोनवळकर, सचिव राजू धूत यांच्यासह केमिस्टांच्या दहावी व बारावीतील गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. नावंदर म्हणाले, भारतीय ग्राहकांची बदलणारी मानसिकता व त्याची खर्च करण्याची मर्यादा औषध विक्रेत्यांच्या लक्षात यावी याकरिता राज्यभरात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आहे. आतापर्यंत सुमारे सहा हजार औषध विक्रेत्यांना प्रशक्षिण देण्यात आले आहे.

धारूरच्या उपनगराध्यक्षपद निवडीचे घोंगडे भिजत
धारूर, ८ जुलै/वार्ताहर

नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन वीस दिवस उलटले तरी अद्यापि उपनगराध्यक्षाची निवड करण्यात आलेली नाही. उपनगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच चालू असल्यामुळे निवडीचे घोंगडे भिजत पडले आहे. नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोदावरी सिरसट यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीला २० दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्यापि उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यात आलेली नाही. उपाध्यक्षपदा-साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यशवंत गायके व काँग्रेसचे नगरसेवक अवेज कुरेशी या दोघांची नावे चर्चेत आहेत. या दोघांमध्येच या पदासाठी रस्सीखेच चालू आहे. काँग्रेसचे अवेज कुरेशी यांच्याकडे पूर्वी अडीच वर्षे उपाध्यक्षपद होते. पुन्ही त्यांनी उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे.

‘जपानी नागरिकांची उत्कट देशभक्ती अनुकरणीय’
परभणी, ८ जुलै/वार्ताहर

जेनेसिस जपान इस्ट एशिया नेटवर्क ऑफ एक्स्चेंज फॉर स्टुडंट्स अ‍ॅण्ड युथ्स या कार्यक्रमात देवेन गोपाळ पहिनकर याने जपानचा दौरा केला. नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या जपानी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय ठरल्यामुळे देवेनला जपान सरकार व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन सेंटर यांच्याकडून या दौऱ्यासाठी बोलविण्यात आले होते. जपानी लोकांची कष्ट करण्याची वृत्ती, त्यांचे निसर्गप्रेम, आदर्श आदरातिथ्य आणि उत्कट देशभक्ती अनुकरणीय होती, अशी प्रतिक्रिया देवेन याने व्यक्त केली. परभणी येथील बालविद्यामंदिर येथे शालेय शिक्षण घेऊन देवेनने पुणे विद्यापीठातून इंग्रजी वाङ्मयाची पदव्युत्तर पदवी तर इंडो जपानोज् असोसिएशनची जपानी भाषेतील पदवी संपादन केली आहे.