Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

अमेरिकेच्या ‘ड्रोन’ हल्ल्यात बैतुल्ला ठार
इस्लामाबाद, ७ ऑगस्ट/पीटीआय

 

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्याप्रकरणातील संशयित मुख्य सुत्रधार व त्या देशातील तालिबानचा प्रमुख असलेला मोस्ट वॉँटेड दहशतवादी बैतुल्ला मसूद व त्याची पत्नी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेले. त्यामुळे तालिबानी संघटनेला जोरदार धक्का बसला आहे.अमेरिकेच्या ड्रोन विमानातून क्षेपणास्त्रांचा मारा केला असता त्यात तो मारला गेला. दक्षिण वझिरीस्तानात मकीन भागात असलेल्या त्याच्या सासऱ्यांच्या घरात मसूद याने त्याच्या दुसऱ्या पत्नीसह आश्रय घेतला होता.
गुप्तचर सूत्रांचा हवाला देऊन पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी सांगितले, की ज्या ठिकाणी अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी हा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे, तेथे पाकिस्तानी अधिकारी भेट देत असून ते बैतुल्ला मारला गेला किंवा काय याची खातरजमा करतील.
कुरेशी म्हणाले, की माझ्या माहितीप्रमाणे ही बातमी खरी आहे व बैतुल्ला मारला गेला आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार हे खरे आहे, पण तरीही आम्ही प्रत्यक्ष त्याचा मृतदेह पाहून खातरजमा करणार आहोत. एका कार्यक्रमानंतर कुरेशी वार्ताहरांशी बोलत होते. अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी मसूदचे सासरे मलिक इक्रमुद्दीन यांच्या निवासस्थानाच्या परिसरात दोन क्षेपणास्त्रे डागली होती. अगोदरच्या बातम्यांनुसार मेहसूदची दुसरी पत्नी काही दहशतवाद्यांसमवेत मारली गेली आहे. पहिला क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर बैतुल्ला मसूदने या घरातून निसटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तो घरातून निसटून आपल्या वाहनापर्यंत पोहोचला होता तोवर दुसऱ्या क्षेपणास्त्राने त्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात बैतुल्ला ठार असल्याचे ओरकझाई आदिवासी भागातील तहरीक-ए-तालिबानचा कमांडर खिफायतुल्ला मसूद यानेही सांगितल्याचे वृत्त पाकिस्तानच्या एक्स्प्रेस २४/७ या दूरचित्रवाहिनीने दिले आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ही पाकिस्तानातील तालिबानची प्रमुख संघटना आहे. बैतुल्ला मसूद मारला गेल्यानंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून ओरकझाई येथील तालिबानी कमांडर हकीमुल्ला मसूद याची निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तालिबान शुरातील महत्वाचा सदस्य मौलाना अझमतुल्ला व मसूदचा माजी प्रवक्ता वली-उर-रहमान यांचीही नावे उत्तराधिकारी म्हणून चर्चिली जात आहेत.