Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘स्वाईन फ्लू’चे ९६ नवे रुग्ण
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

 

परदेशातून भारतात आलेल्या ४३ लाख लोकांची चाचणी करून स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांना हुडकून काढताना डॉक्टरांनी दाखविलेल्या कमालीच्या सातत्यामुळेच अन्य देशांच्या तुलनेत भारतात स्वाइन फ्लूचा प्रसार होऊ शकलेला नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद यांनी आज स्पष्ट केले असले तरीदेखील आज दिवसभरात देशामध्ये स्वाईन फ्लूचे तब्बल ९६ नवे रूग्ण आढळले असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशातील पाच डॉक्टरांचा स्वाईन फ्लूची लागण लागली असून आता तर नवी मुंबईतदेखील स्वाईन फ्लूचा एक रूग्ण आढळल्याने पुण्यापाठोपाठ हा रोग मुंबईच्या दाराशी येऊन पोहचला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्वाइन फ्लूमुळे देशात केवळ एकच मृत्यू झाला असून जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव नरेश दयाल यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे निर्देश दिल्ली सरकारने राजधानीतील इस्पितळांना दिले आहेत. स्वाइन फ्लूच्या उपचारांसाठी ओसेल्टामीवीर नावाचे औषध दिले जाते. त्याला टॅमी फ्लू पण म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाची शिफारस केली आहे. या औषधावर जनतेने विश्वास ठेवायला हवा आणि त्यासाठी रोगनिदानही होणे महत्त्वाचे आहे. भारतात ज्यांना हे औषध देण्यात आले, त्यांच्यापैकी कुणीही मृत्युमुखी पडलेले नाहीत. सरकारच्या आदेशाने या औषधाची बाजारात विक्री बंद आहे. सरकारने एकाच कंपनीकडून या औषधाचे ६० लाख डोसेस तयार ठेवले आहेत, असे आझाद यांनी स्पष्ट केले.
पुण्यामध्ये ‘स्वाइन फ्लू’च्या चिंताजनक प्रकृती असणाऱ्या त्या दोन रुग्णांपैकी केमिस्टची प्रकृती गंभीर पण स्थिर असली, तरी दुसरे रुग्ण असलेल्या डॉक्टरची प्रकृती मात्र चिंताजनक असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, निष्काळजीपणामुळे रिदा शेख हिचा मृत्यू झाल्याने जहांगीर रुग्णालयावर कारवाईची भाषा करणाऱ्या राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज मात्र रुग्णालयासंदर्भात बोलताना पुण्यात सौम्य भूमिका घेतली. मुलीला रुग्णालयात मानवी हेतूने दाखल करून तिच्यावर उपचार केले असतील, तर याचा चौकशीत सकारात्मक विचार क रून निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
पुण्यापाठोपाठ राज्यभर स्वाईन फ्लूची साथ वेगाने पसरत असतानाच, आज नवी मुंबईतील नेरुळ येथील एपीजे महाविद्यालयात शिकणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलाला या रोगाची लागण झाल्याचे वृत्त आहे. कोपरखैरण?े येथे राहणाऱ्या देबोजी सरकार या विद्यार्थ्यांस स्वाईन फ्लू झाल्याचे निदान कस्तूरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी केले आहे. या वृत्तास महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून, नवी मुंबई महापालिकेने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.