Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मांसाहार बंदीच्या मागणीला आयुक्तांचा झटका
मुंबई, ७ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

 

कोणाच्या तरी लहरी मागणीसाठी आमच्या पोटावर पाय का आणता, आम्ही जगायचे कसे, ज्यांना मासे-मटण खायचे असेल त्यांच्यावर कोणत्या कायद्याने बंदी आणणार.. महापालिका आयुक्त जयराज फाटक, तसेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आज कोळी बांधव-भगनी व मटणविक्रेत्यांच्या संतप्त प्रश्नांच्या भडिमाराला सामोरे जावे लागले. मांसाहाराला विरोध करणाऱ्या बिल्डर लॉबीचा, तसेच काही भाजप व काँग्रेस आमदारांच्या दबावापुढे गुढगे टेकून देवनार कत्तलखान्याला आठवडाभर टाळे लागणार होते. मात्र कोळी बांधवांच्या रुद्रावतारानंतर मासेविक्रीला बंदी लागू करता येणार नाही, अशी भूमिका आयुक्त जयराज फाटक यांनी जाहीर केली.
गेल्या वर्षीही जैन समाजाच्या ‘पर्युषण’ पर्वारंभानिमित्त महापालिकेचा देवनार येथील कत्तलखाना आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्व थरातून या ‘अतिरेकी शाकाहारगिरीला’ विरोध झाल्यानंतर हा निर्णय पालिका प्रशासनाला मागे घ्यावा लागला होता. काही बडय़ा बिल्डरांच्या दबावामुळे गेल्या वर्षी करण्यात आलेला आठवडाभराच्या सक्तीच्या मांसाहार बंदीच्या निर्णयप्रमाणेच यंदाही काही राजकारणी व बडय़ा ‘अतिरेकी शाकाहारी’ बिल्डरांनी राज्य शासन व पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आठवडाभर मांसाहार बंदी तसेच मासेविक्रीला बंदी लागू करावी, यासाठी प्रयत्न केला.
या संदर्भात कोळी बांधवांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन आपली बाजू मांडल्यानंतर त्यांनी आयुक्त जयराज फाटक यांना निर्णय घेण्यास सांगितले. त्यानंतर आयुक्त जयराज फाटक यांनी कोळी बांधवांची, तसेच मटणविक्रेत्यांची भूमिका ऐकून बंदी लागू केली जाणार नाही, असे सांगितल्याचे या कोळी बांधवांनी सांगितले. याबाबत आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दक्षिण मुंबईतील भाजपच्या एका माजी आमदारानेही आपल्या विभागात मांसाहार बंदी लागू करण्याची मागणी केली होती. पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी देवनार कत्तलखाना बंद करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
येत्या १७ ऑगस्टरोजी पर्युषण पर्वारंभ आहे. यासाठी बिल्डर लॉबीकडून काही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हाताशी धरून मासेबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यास शासनाला भाग पाडण्याचा प्रयत्न केला गेला. याच्याविरोधात महाराष्ट्र कोळी समाजाने आज पालिका मुख्यालयासमोर राज्य शासनाच्या प्रतिमेचे दहन केले.
पर्युषण काळात कोळी समाजावर मासेविक्री करण्यास बंदी लागू करण्याचा निर्णय आम्ही कोण्याताही परिस्थितीत सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी दिला आहे.