Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

गेटवे, झव्हेरी बाजार बॉम्बस्फोटातील तपास
अधिकाऱ्यांची बक्षिसी मात्र लाल फितीत!
निशांत सरवणकर ,मुंबई, ७ ऑगस्ट

 

गेटवे ऑफ इंडिया आणि झव्हेरी बाजार येथे २००३ मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटप्रकरणी पोटा न्यायालयाने तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली असली तरी हे प्रकरण ज्यांच्यामुळे उघड झाले त्या चार पोलिसांना कुठल्याही स्वरुपाचे साधे बक्षीसही आज सहा वर्षांनंतर देण्यात आलेले नाही. या चार पोलिसांना पदोन्नती देण्याची फाईल महासंचालक कार्यालयात २००३ मध्ये जी अडकून पडली ती पुन्हा बाहेर आलीच नाही. पदोन्नती तर नाहीच, पण साधी वेतनवाढही या पोलिसांना देण्यात आली नाही. आरोपी निर्दोष सुटले असते तर याच पोलिसांवर कारवाईचे हत्यार उगारण्यासाठी मागेपुढेही पाहिले गेले नसते, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
५४ लोकांचे बळी घेणाऱ्या या बॉम्बस्फोटाची उकल केवळ टॅक्सी चालक शिवकुमार पांडे याने दिलेल्या सहकार्यामुळे झाली हे खरे असले तरी पांडे याने दिलेल्या माहितीवरून आरोपींना पकडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या चार पोलिसांनी पार पाडली होती. पांडेने पोलिसांना फक्त एवढीच माहिती दिली होती की, बॉम्ब ठेवणाऱ्यांनी अंधेरी पश्चिम येथील शॉपर्स स्टॉप येथून टॅक्सी पकडली. या दुव्यावर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दहाचे तत्कालीन उपनिरीक्षक विजय कांदळगावकर, जितेंद्र वनकोटी, हवालदार नारायण पाटील, पोलीस नाईक प्रमोद शिंदे हे कामाला लागले होते. मुस्लिम बहुल जुहू गल्लीत संशयितांचा शोध सुरू झाला. तब्बल चार-पाच दिवसांनंतर या पथकाने अशरत अन्सारीला शोधून काढले. अशरत टॅक्सीत बसलेला नव्हता. त्यामुळे त्याच्याबद्दल पांडेलाही काहीही माहिती नव्हते. मात्र या पथकाने वेशांतर करून या परिसरात तळ ठोकून अशरतला ताब्यात घेतल्यानंतरच प्रत्यक्ष बॉम्ब ठेवणाऱ्या हनीफ व हमीदा सय्यद या दाम्पत्याचा सहभाग उघड झाला. याबाबत या चार पोलिसांचे तत्कालीन पोलीस आयुक्त रणजित शर्मा यांनी कौतुक केले. इतकेच नव्हे तर या चारही पोलिसांना पदोन्नती देण्याची शिफारस गृहखात्याकडे केली. मात्र हे चारही पोलीस क वर्गात येत असल्याने त्यांना पदोन्नती देण्याची बाब महासंचालकांच्या अखत्यारीत येते, असे कारण देत ही फाईल महासंचालक कार्यालयात पाठविण्यात आली. परंतु आजतागायत या चारही पोलिसांना आपल्या पदोन्नतीच्या फायलीचे काय झाले हे सहा वर्षांंनंतरही कळू शकलेले नाही.
या पदोन्नतीच्या आशेवर असलेल्या कांदळगावकर आणि वनकोटी यांना ज्येष्ठतेनुसार सहाय्यक निरीक्षक म्हणून बढती मिळाली तर शिंदे हे हवालदार झाले. पण पाटील हे अजून हवालदारच आहेत. तेव्हा पदोन्नती मिळाली असती तर कदाचित आज कांदळगावकर व वनकोटी हे पोलीस निरीक्षक झाले असते तर शिंदे सहाय्यक उपनिरीक्षक आणि पाटील उपनिरीक्षक होऊ शकले असते. सवरेत्कृष्ट तपासाबद्दलचा दीपक जोग चषक वगळता या पोलिसांना काहीही मिळाले नाही. त्यावेळी राकेश मारिया हे तेव्हा गुन्हे विभागाचे अतिरिक्त आयुक्त होते आणि प्रदीप सावंत हे उपायुक्त होते. या बॉम्बस्फोटांची उकल करण्याची जबाबदारी मारिया यांच्यावर सोपविण्यात आली होती. २६/११ च्या हल्ल्यात ठार झालेले चकमकफेम पोलीस निरीक्षक विजय साळसकर आणि विनायक सावदे यांच्यावर तपासाची मुख्य जबाबदारी होती.