Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कसाबची नाटकं सुरूच
मुंबई, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

दोन आठवडय़ांपूर्वी नाटय़मयरित्या गुन्ह्याची कबुली देऊन खटल्याला वेगळ्या वळणावर आणून ठेवणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब याने आज पुन्हा एकदा त्याच्यावर ठेवण्यात आलेले सर्वच्या सर्व आरोप आपल्याला मान्य असल्याचे सांगितले आणि त्यामुळे खटला निकाली काढावा, अशी विनंती विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्याकडे करून खटल्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु अ‍ॅड. अब्बास काझ्मी आणि अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी खटल्याच्या सुनावणीबाबत त्याला समजावल्यानंतर मात्र कसाबने आपल्याला अन्य आरोपांबद्दल सद्य:स्थितीला तरी काहीच बोलायचे नसून खटल्याची सुनावणी पुढे सुरू ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली.
दोन आठवडय़ांपूर्वीच कसाबने न्यायालयासमोर गुन्ह्याची कबुली देत फाशीची शिक्षा सुनावण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. मात्र त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या सातपैकी पाच प्रकरणांमधीलच गुन्हा त्याने मान्य केल्याने न्यायालयाने त्याचा कबुलीजबाब नोंद म्हणून दाखल करून घेत सुनावणी पुढे ठेवली होती. आज पहिल्या सत्रातील सुनावणी तहकूब करून न्यायालय उठत असतानाच कसाबने न्या. टहलियानी यांना आपणास काहीतरी सांगायचे आहे, असे सांगितले. न्यायालयाने त्याबाबत विचारणा केल्यावर कसाबने आपल्यावर ठेवण्यात आलेले सर्व गुन्हे आपल्याला मान्य असल्याचे सांगितले. तुझ्यावर अन्य कोणते गुन्हे ठेवण्यात आले आहेत, याविषयी न्यायालयाने विचारले असता मात्र कसाबने नकारार्थी उत्तर देत पुन्हा एकदा आपल्याला सर्व गुन्हे मान्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्याचदरम्यान अ‍ॅड. काझ्मी आणि निकम यांनी न्यायालयाला सुनावणी पुढे सुरू ठेवण्याची विनंती केली. मात्र त्यांना थांबवत कसाबने पुन्हा न्यायालयाला आपल्याला सर्व गुन्हे मान्य असल्याचे सांगितले. अखेर न्यायालयाने अ‍ॅड. काझ्मींशी बोलून दुपारच्या सत्रात उत्तर देण्याचे निर्देश त्याला दिले. दुसरे सत्र सुरू होताच न्यायालयाने त्याच्या वक्तव्याबाबत त्याच्याकडेच विचारणा केली. त्यावर आपल्याला काहीच बोलायचे नसल्याचे सांगत त्याने खटला पुढे सुरू ठेवण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्याच्या या विचित्र वागण्याने अचंबित झालेल्या न्या. टहलियानी यांनी त्याला, मग सुनावणीच्या पहिल्या सत्रात सर्व गुन्हे मान्य असल्याचे का बोलला होतास, अशी विचारणा केली. त्यावर खाली मान घालून हसत कसाबने ‘नाही’ म्हणून उत्तर दिले व खटला पुढे सुरू ठेवण्याची वारंवार विनंती केली. न्यायालयाने त्याच्या या अजब वागण्याची खोलवर चौकशी करून त्याला बोलते करण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला. पण तुम्ही तुमच्या मर्जीने खटला सुरू ठेवू शकता, असे कसाब म्हणाला. त्यावर न्यायालयाने काही खडे बोलही सुनावले आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्या पहिल्या वक्तव्यावर कायम राहायचे आहे का? याची विचारणा केली. कसाबकडून नकारार्थी उत्तर आल्यावर मात्र न्यायालयाने खटल्याचे कामकाज पुढे सुरू ठेवले.