Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

प्रादेशिक

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा बँकेस दिलेल्या ११६ कोटींच्या कर्जाचे रूपांतर झाले अनुदानात !
मुंबई, ७ ऑगस्ट / खास प्रतिनिधी
तोटय़ातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकाने दिलेली ११६ कोटींच्या कर्जाची रक्कम अनुदान म्हणून रूपांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर विविध समाज घटकांना खूश करण्यासाठी सवलतींची खिरापत सुरू असतानाच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वत:च्या नांदेड जिल्ह्य़ातील मतदारांची खबरदारी घेतली आहे.

राष्ट्रवादीला हवे २००४च्या निकालाच्या आधारे जागावाटप !
काँग्रेसला जास्त जागांची अपेक्षा
मुंबई, ७ ऑगस्ट / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेच्या वेळी जागावाटपात जास्त जागा मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका काँग्रेसने मांडली असतानाच २००४च्या निकालाच्या आधारावरच जागावाटप व्हावे, असा आग्रह धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने जागावाटप झाल्याने काँग्रेसचे नुकसान झाले होते.

ठाण्यात लागणार २१ लाखांची दहीहंडी
ठाणे, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

सात, आठ आणि नऊ थरांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार 'याची देही याचा डोळा' अनुभवणाऱ्या ठाणेकरांना आता दहा थरांची प्रतिक्षा लागली आहे. या विश्वविक्रमाची बरोबरी साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार तथा संघर्ष संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी २१ लाखांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. या उत्सवाचा पहिला अंक म्हणून गडकरी रंगायतनमध्ये १० ऑगस्टरोजी मराठी सिनेसृष्टीतील २० कलावंत रॅम्पवर उतरणार आहेत.

भारत सरकार आम्हाला घरीही जाऊ देत नाही!
तीन परदेशी नागरिकांच्या हायकोर्टात याचिका
मुंबई, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी
अमली पदार्थाची तस्करी केल्याच्या खटल्यातून निर्दोष सुटलेल्या एक सिंगापोरियन, एक जपानी व एक आयरिश असे तीन परकीय नागरिक घरी परत जाऊ इच्छित असूनही भारत सरकारने त्यांना ‘एक्झिट व्हिसा’ न देता गेले कित्येक महिने मुंबईतच अडकवून ठेवल्याचे एक धक्कादायक प्रकरम उच्च न्यायालयापुढे आले आहे.

नईबागकर यांच्या अपात्रतेचा विषय : ठाणे पालिकेची विशेष सभा घेण्याचा हायकोर्टाचा आदेश
मुंबई, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

बेकायदा बांधकाम करणे आणि पालिकेचे कंत्राट घेणे या कारणांवरून वर्तकनगर भागातील शिवसेनेचे नगरसेवक बळीराम वासुदेव नईबागकर यांना अपात्र ठरविण्याचा विषय दिवाणी न्यायाधीशांकडे सोपविण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी ठाणे महापालिकेची विशेष सभा येत्या २० ऑगस्टपूर्वी बोलावून त्याच दिवशी याविषयी निर्णय घेतला जावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला.

विस्थापितांना प्रस्थापित करण्यासाठी ऐक्याचा खेळ- प्रकाश आंबेडकर
मुंबई, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

राजकारणातून जे विस्थापित झाले आहेत, त्यांना पुन्हा एकदा प्रस्थापित व्हायचे असल्यामुळेच त्यांनी रिपब्लिकन ऐक्याचा जुनाच खेळ मांडला आहे, अशी प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्यांनी अवघ्या १५ दिवसांपूर्वी आम्ही काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसला हरविणार नाही, अशा शपथा जाहीरपणे घेतल्या ते आता कशासाठी जनतेला फसवित आहेत.

एनआरसी अतिरिक्त जमीनविक्री: ६० कोटी रूपये देण्याची रहेजाची तयारी
ठाणे, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

तब्बल चार हजारहून अधिक कामगारांचे भवितव्य अवलंबून असणाऱ्या कल्याण तालुक्यातील आंबिवली येथील नॅशनल रेयॉन कंपनीच्या अतिरिक्त जमीन विक्रीपोटी थकित असलेल्या एकूण रकमेपैकी ६० कोटी रूपये या महिन्यात देण्याचे आश्वासन रहेजा बिल्डरने गुरूवारी कामगारांच्या प्रतिनिधींना दिले. कंपनीला आर्थिक आरिष्टातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त जमीन विकण्याचा व्यवस्थापनाने निर्णय घेतला. कामगारांचे हित लक्षात घेऊन संघटनेनेही त्यास संमती दिली. त्यानुसार कंपनीलगतची जमीन व्यवस्थापनाने रहेजा बिल्डरला १६५ कोटी रूपयांना विकली. त्यातील ४५ कोटी रूपये रहेजाकडून कंपनीला मि़ळाले. त्यानंतरची रक्कम देण्याबाबत मात्र बिल्डरकडून चालढकल केली जात होती. सध्या कंपनीचे उत्पादन बंद आहे.

कूपर रुग्णालयाच्या पुनर्विकासाला पालिकेची मान्यता
मुंबई, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी
पार्ले येथील कूपर रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीने मान्यता दिली. त्यामुळे या रुग्णालयाची आता नव्याने बांधणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्तावाबाबत उच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने येत्या २१ ऑगस्टपर्यंत या कामाचे आदेशपत्र काढू नये, असे अंतरिम आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रस्तावाबाबत स्थायी समिती काय निर्णय घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र न्यायालय स्थायी समितीला प्रशासकीय निर्णय घेण्याबाबत आदेश देऊ शकत नाही आणि न्यायालयाने या प्रस्तावाला स्थगितीही दिलेली नाही, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर स्थायी समितीने हा प्रस्ताव समंत केला. लवकरच या कामाचे उदघाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी दिली.

वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा
मुंबई, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळातर्फे दरवर्षी वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाचा सातवा कौतुक सोहळा ९ ऑगस्ट रोजी दुपारी २.०० वाजता रुसी मेहता सभागृह, तुळशीवाडी, मुंबई आर.टी.ओ. शेजारी, ताडदेव, मुंबई सेन्ट्रल (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे. २००८-०९ या शैक्षणिक वर्षांत विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी मारुती उगले ९३२१२६०३२४, रमेश उगले ९३२३७९७०२७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

सोमवारी भविष्य निधी अदालत
मुंबई, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘एम्प्लॉईज प्रॉव्हिडन्ट फंड ऑर्गनायझेशन’च्या वतीने येत्या १० ऑगस्ट रोजी भविष्य निधी अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ही अदालत ऑर्गनायझेशनच्या कांदिवली येथील विभागीय कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक व्यक्तींनी आपल्या तक्रारी विभागीय कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्त एन. बी. आडुरकर यांनी केले आहे.