Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

गोविंदाच्या बॅकस्टेजची धम्माल
अदिती सारंगधर

आजपर्यंत मी प्रत्यक्ष दहीहंडी फोडायला कधीही गेले नाही. पण या उत्सवाची मजा लुटायला मला लहानपणापासून आवडायचे. यासाठी खास मी दादरला आजीच्या घरी जायचे. तेथे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या अंगावर पाणी टाकणे, फळे कापून देणे, दहीकाला, दही पोह्याचा प्रसाद तयार करणे या माझ्या आवडीच्या गोष्टी. या उत्सवाची मजा काही औरच आहे. या उत्सवाच्या वेळी मी आजपर्यंत बॅकस्टेजला राहून काम केले आहे.

नेमक्या तक्रारीला छायाचित्राची जोड
मुंबईकरांच्या दैनंदिनीतील असंख्य अडचणींना वाचा फोडण्यासाठी अद्ययावत तक्रार निवारण यंत्रणा मुंबई महानगरपालिकेकडे आहे. 1916 या दूरध्वनी क्रमांकावर केवळ एक फोन करून आपली तक्रार नोंदविण्याची सुविधा मुंबईकरांना अक्षरश ‘बारा महिने तेरा काळ’ उपलब्ध आहे. परंतु, या यंत्रणेबाबत प्रचार आणि प्रसार झाला तर महापालिकेची अकार्यक्षमता आणि कारभारातील त्रुटी उघड होतील, या भीतीपोटीच की काय या यंत्रणेला पालिकेने प्रसिद्धी दिलेली नाही. पालिकेच्या कारभारात ‘पारदर्शकता’ आणण्यासाठी ‘रामबाण’ ठरू शकेल अशा या यंत्रणेचे महत्त्व सुधीर बावकर यांनी ओळखले.

अचूक अर्ज भरल्यानंतरही अन्याय
विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थिनीचा खुल्या वर्गात समावेश
ऑनलाइनच्या घोडचुकीमुळे केळकर-वझेमध्ये प्रवेश मिळाला नाही
प्रतिनिधी
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ उडाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. अचूक अर्ज भरूनही विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळू शकलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभाग मात्र याचे सारे खापर विद्यार्थ्यांवरच फोडत आहे.

या मूषकांना कोण आवरणार?
मुंबईत जागेला सोन्याचा भाव आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे साहजिकच बिल्डरमंडळी आणि त्यांच्या माध्यमातून राजकारणी मंडळीही अधिकाधिक जमिनी वा एफएसआय हडप करण्यात गुंतलेली असतात. पुनर्विकास प्रकल्प हे तर या मंडळींसाठी हाती लागलेले आयते कुरण आहे. याचाच फायदा उठवित प्रशासनातील मूषक सारी यंत्रणा पोखरणे हे जणू आपले कर्तव्यच आहे अशा थाटात वावरत आहेत.

कायद्यांची माहिती करून घ्या
डॉ. किरण बेदींनी साधला मुंबईकर रेल्वे प्रवाशांशी संवाद

प्रतिनिधी
‘हमे कायदे-कानून मालूम होने चाहिये. वह हमारी जिम्मेदारी है. अगर हम कानून जानते है तो समस्या सुलझा सकते है’, साक्षात किरण बेदी मुंबईकरांशी लोकल ट्रेनमधून संवाद साधत होत्या. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘आपकी कचहरी’ या कार्यक्रमाचे दुसरे पर्व ५ ऑगस्टपासून सुरू झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. किरण बेदी यांनी मरिन लाइन्स ते दादर असा रेल्वेने प्रवास केला व प्रवाशांशी संवाद साधला.

निकाल जाहीर होऊनही बीएड विद्यार्थ्यांना गुणपत्रिका नाही
गुणपत्रिकांची छपाई चुकीच्या पद्धतीने झाल्याने घोळ
प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाने बीएड अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका बनविताना केलेल्या चुकांचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे २० दिवसांपूर्वी (१५ जुलै रोजी) निकाल जाहीर होऊनही विद्यार्थ्यांना अद्याप आपल्या गुणपत्रिका मिळू शकलेल्या नाहीत.

रेल्वेतील वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांची आज विशेष परिषद
प्रतिनिधी

रेल्वेच्या वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी येत्या ८ ऑगस्ट रोजी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (सीआरएमएस) वतीने भायखळा येथील मध्य रेल्वेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती रुग्णालयात एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन ‘सीआरएमएस’चे अध्यक्ष आर. पी. भटनागर यांच्या हस्ते होईल.

घटस्फोटित दाम्पत्यांच्या मुलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी

‘युएन’तर्फे ८ ऑगस्ट हा ‘जागतिक आनंददिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिनानिमित्त ‘अनाम प्रेम’ या संस्थेतर्फे कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या ‘अल्केश दिनेश मोदी सभागृहा’त दुपारी ४.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनाथ, अपंग, मतिमंद मुले, रस्त्यावरच्या मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत.

ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एलआयसीच्या अभिनव योजना
प्रतिनिधी

सध्या विमा क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. आपापल्या योजना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विमा कंपन्या कल्पकतेने पावले उचलत आहेत. लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) या कंपनीनेही डायरेक्ट मार्केटिंगसाठी अर्थात ग्राहकांना एलआयसीच्या योजनांची माहिती करून देण्यासाठी ग्राहकाभिमुख पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

पाटकर महाविद्यालयात मुलींसाठी वसतिगृह
प्रतिनिधी

गोरेगावच्या पाटकर महाविद्यालयात १०० विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था असणारे वसतिगृह उभारण्यासाठी युजीसीने परवानगी दिली असून १० ऑगस्ट रोजी दु. ३ वाजता या वसतीगृहाच्या कोनशीला समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या हस्ते या कोनशीलेचे अनावरण होणार आहे. याप्रसंगी चिकित्सक समुहाचे अध्यक्ष किशोर रांगणेकर, संयुक्त कार्यवाह डॉ. गुरुनाथ पंडित, प्रशासकीय अधिकारी मालती पवार उपस्थित राहणार आहेत. युजीसीने या वसतीगृहासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती पाटकर महाविद्यालयाचे प्रश्नचार्य उदय माशेलकर यांनी दिली.

‘वसुंधरा कन्या बचाओ’ अभियान ८ व ९ ऑगस्ट रोजी
प्रतिनिधी
‘युवक बिरादरी’तर्फे ८ व ९ ऑगस्ट रोजी ‘वसुंधरा कन्या बचाओ’ हे राष्ट्रव्यापी अभियान हाती घेण्यात येत असून उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या अभियानास प्रश्नरंभ करण्यात येणार आहे. भारतीय विद्या भवनच्या कानजी खेतसी सभागृहात संध्याकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व क्रांती शाह यांच्या नेतृत्वाखाली १८५७ ते १९४७ या कालखंडातील स्मृतींना उजाळा देण्याच्या निमित्ताने कानजी खेतसी सभागृह ते गोवालिया टँक दरम्यान प्रभात फेरी काढण्यात येणार आहे.
या प्रभातफेरीचा समारोप मणीभवनात करण्यात होईल. ८ ऑगस्ट १९४२ रोजी ‘छोडो भारत’चा प्रस्ताव स्वीकारण्यात आला होता व ९ ऑगस्टला ‘चले जाव’ आंदोलन छेडण्यात आले होते. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण लोकांना करुन देण्याच्या हेतूने ‘युवक बिरादरी’तर्फे देशभरातील ५० शहरांत कार्यक्रम करण्यात येणार आहेत. यात त्यांना अमिताभ बच्चन व श्री विलेपार्ले केळवणी मंडळाची साथ लाभणार आहे.

‘व्हाइट लिली..’चे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रयोग
प्रतिनिधी

अनामिका निर्मित, साईसाक्षी प्रकाशित ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या रसिका जोशी- मिलिंद फाटक लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित नाटकाचे तीन प्रयोग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रु. ५० व रु. ३० अशा सवलतीच्या दरांत ठेवण्यात आले आहेत. शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. पाल्र्याच्या दीनानाथ नाटय़गृहात, तर सोमवार, १० ऑगस्टला सकाळी ११ वा. शिवाजी मंदिर येथे आणि शुक्रवार, १४ ऑगस्टला सकाळी ११ वा. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हे प्रयोग होतील. या नाटकाचा विषय आजच्या तरुण पिढीशी जास्त संबंधित असल्याने तरुणांनी ते आवर्जून पाहावे, याकरिता हे सवलतीचे प्रयोग आयोजित करण्यात आले
आहेत.