Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

पंधाडे, लोंढे यांना उद्धव ठाकरेंकडून अभय
शिवसेनेतच सक्रिय होणार

नगर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी
शिवसेनेतून फुटलेल्या व आमदार अनिल राठोड यांच्यावर जहाल टीका करणाऱ्या अंबादास पंधाडे व सुभाष लोंढे या नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेची वाट धरली. मात्र त्यासाठी राठोड यांची मध्यस्थी न घेता त्यांनी मुंबईत थेट कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचेच दार ठोठावले.ठाकरे यांनीही त्यांना तुम्ही शिवसेनेतच आहात व शिवसेनेतच असाल, त्यांचे काय करायचे ते मी बघतो, असे म्हणत अभय दिले. सेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, विनायक राऊत यांनी पंधाडे व लोंढे यांना ठाकरे यांची भेट घालून दिली असल्याचे समजते.

प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत ऐक्य मंडळ विरोधी बाकावर
नगर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षक बँकेच्या रविवारी होणाऱ्या वार्षिक सभेत ऐक्यमंडळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे पत्रक ऐक्य मंडळाचे नेते युवराज लांडे, सर्जेराव राऊत, राजेंद्र निमसे, संतो, भोपे व सोनाजी लहामटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. गेल्या वर्षांपासून बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहारांशी ऐक्य मंडळाचा संबंध नाही. वार्षिक सभेत मंडळ विरोधी बाकावर बसेल, असे या नेत्यांनी स्पष्ट केले.

सव्वा कोटी खर्चूनही पाईप गटारांचे काम निकृष्ट
‘तक्रारींकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष’
नगर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी
महापालिकेच्या कामात नागरिकांनी लक्ष घालावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून होत असताना नागरिकांकडूनच आरोप होत असलेल्या नालेगाव हुडकोतील निकृष्ट काँक्रिटीकरण व चुकीच्या पद्धतीने गटार बांधण्याच्या कामाकडे प्रशासन मात्र कानाडोळा करीत आहे. दलित वस्ती सुधारणा या राज्य सरकारच्या योजनेंतर्गत मिळालेल्या सव्वा कोटी रुपयांच्या निधीतून हे काम होत आहे.

अलंकार पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालकांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल
कोपरगाव, ७ ऑगस्ट/वार्ताहर

येथील अलंकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक, अध्यक्ष व उपाध्यक्षासह १४ पदाधिकाऱ्यांविरुद्ध सभासदांची फसवणूक करून एक लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दत्तात्रय बाबुराव महाले यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. बी. शेळके यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित १४ जणांवर गुन्हा दाखल केला.

शंखासुरांच्या झाडांचे अस्तित्व धोक्यात
नगर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

महादेवाच्या पिंडीवर वाहण्यात येणाऱ्या शंखासुरांच्या (सोनतरवड) झाडांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. जतनासाठी प्रयत्न केले गेले नाही तर या वनस्पतीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. पुरातन महादेव मंदिरांजवळ, विशेषत: जिल्ह्य़ातील वृद्धेश्वर, डोंगरगण परिसरात शंखासुरांची बरीच झाडे आढळत. प्रथमदर्शनी गुलमोहोरासारखे भासणारे हे झाड लाल फुले फुलली की मनमोहक भासते.

पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला हातात झाडू
कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
राहुरी, ७ ऑगस्ट/वार्ताहर
नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढे कमी म्हणून की काय आज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे कर्मचारीही संपात सामील झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे यांनी स्वत हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.

भंडारदरा धरण ७५ टक्के भरले
राजूर, ७ ऑगस्ट/वार्ताहर

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वेग थंडावला आहे. धरण ७५ टक्के भरले आहे. धरणात पाण्याचा साठा ८ हजार ७३ दशलक्ष घनफूट इतका आहे.गेल्या २४ तासात पाणलोट क्षेत्रातील पांजरे येथे ३९ मिलीमिटर तर भंडारदरा येथे १८ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या तुलनेत पाणलोट क्षेत्रात पाऊस चांगला असला, तरी सध्या त्याची गती थंडावली आहे. गत वर्षी आजच्या दिवशी धरणात ८ हजार ४२० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होता. या वर्षी ते ८ हजार ७३ दहालक्ष घनफूट आहे. पावसाची आकडेवारी अशी : भंडारदरा १८ मिनी (१ हजार ३२१), घाटघर २५ मिमी (२ हजार ४९६), पांजरे ३९ मिमी (२ हजार ६२९), रतनवाडी १५ मिमी (२ हजार १३८), वाकी १७ मिमी (१ हजार ७३), वाकी धरणातून ५५६ क्यूसेक वेगाने, तर निळवंडे धरणातून १ हजार ४०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. भात लावणीचे काम आटोपत आले असून, आज अधूनमधून श्रावणसरी कोसळत होत्या.

दुकानमालकाचे ५ लाख दोघा नोकरांनी लांबविले
नगर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

शहरातील रामचंद्र खुंटावरील मनोज इलेक्ट्रिकच्या मालकाला दोघा नोकरांनी पाच लाख रुपयांना गंडा घातला. कोतवाली पोलिसांनी नोकर रोहन हृदयनाथ सुपेकर आणि अजित वेळापुरे (रा. दोघेही भूषणनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही पसार झाले आहेत.या प्रकरणी दिलीप गौरीलाल खंडेलवाल (४६ वर्षे, रा. रामचंद्र खुंट) यांनी फिर्याद दिली
आहे. खंडेलवाल यांनी काल त्यांचे मेहुणे विश्वंभर गुप्ता यांना उसने म्हणून देण्यासाठी पाच लाख रुपये दुकानातील नोकर सुपेकर व वेळापुरे यांच्याकडे दिले. परंतु या दोघांनी गुप्ता यांना पैसे न देता परस्पर अपहार केला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक कांचन जाधव करीत आहेत.

मुलींच्या वसतिगृहात गैरप्रकार करणाऱ्या तरुणाला अटक
नगर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

सावेडीतील सेंट मोनिका अध्यापिका विद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात शिरून गैरवर्तन केल्याबद्दल कैलास एकनाथ धाकतोडे याला तोफखाना पोलिसांनी अटक केली. या तरुणाने यापूर्वीही वसतिगृहाचे कर्मचारी व विद्यार्थिनींना त्रास दिला आहे.
धाकतोडे अनधिकृतपणे विद्यालयाच्या परिसरात राहतो. आज पहाटे तो मुलींच्या खोलीत शिरला. या प्रकाराने मुली घाबरल्या. त्यांनी वसतिगृहाच्या वॉर्डन एम. जे. गायकवाड यांना याबाबत सांगितले. गायकवाड यांच्या पतीने तोफखाना पोलिसांना ही माहिती कळविली. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मात्र त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक बिरारी करीत आहेत.धाकतोडे याने १० फेब्रुवारी २००९ रोजी वसतिगृहाच्या वॉर्डन गायकवाड यांना मारहाण केली होती. परिसरातील नागरिकांनीही त्याच्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. वारंवार त्रास देणाऱ्या या तरुणाचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

चिंचोडी पाटील ते मराठवाडी रस्ता पंतप्रधान ग्रामसडकमधून मंजूर
आठवडाभरात निविदा -कळमकर
नगर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

नगर व पाथर्डी तालुक्यांना फायदेशीर ठरणाऱ्या चिंचोडी पाटील ते मराठवाडी हा प्रलंबित रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी दिली. येत्या आठवडाभरातच सुमारे ९ कोटी खर्चाच्या या कामाच्या निविदा काढण्यात येतील, असे ते म्हणाले.प्रामुख्याने पाथर्डी तालुक्यातील दुर्गम व अविकसित भागाला या रस्त्याचा मोठा लाभ होईल. गेली अनेक वर्षे तो प्रलंबित आहे. स्वत: कळमकर त्यासाठी प्रयत्नशील होते. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप वळसे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सी. डी. फकीर यांचे या कामात सहकार्य लाभल्याचे कळमकर यांनी सांगितले.नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील व पाथर्डी तालुक्यातील पटेलवाडा, पत्र्याचा तांडा, माणिकदौंडी, हरीचा तांडा, महिंबा, मरकड वस्ती, मढी, सावरगाव आणि बीड जिल्ह्य़ातील मराठवाडी अशा या २५ किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे हा रस्ता येऊन मिळेल. शिवाय पाथर्डी तालुक्यातील संबंधित गावांतील छोटय़ा सडकाही या रस्त्याला जोडल्या जातील. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर नगर ते बीडचे अंतरही २१ किलोमीटरने कमी होईल, असे कळमकर यांनी सांगितले.

निमगाव गांगर्डातील जुगारअड्डय़ावर छापा; प्रतिष्ठितांसह १५जणांना अटक
कर्जत, ७ ऑगस्ट/वार्ताहर

तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील एका हॉटेलवर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या पंधराजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १४ हजार ४३० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नगर, श्रीगोंदे, आष्टी व कर्जत तालुक्यांतील प्रतिष्ठितांचा समावेश आहे.पोलीस उपअधीक्षक संदीप जाधव यांनी सायंकाळी ५ वाजता निमगाव गांगर्डा येथील संजय विठ्ठल गांगर्डे यांच्या हॉटेलवर छापा टाकला. तेथे जुगार सुरू असल्याचे आढळले. जुगार खेळणारे मिलिंद नवनाथ खोमणे (धोंगडेवाडी), चंद्रकांत दगडू भागवत, कुमार किसनदास खाबिया (दोघेही नगर), नवनाथ भिकू गाडे, सोपान भानूदास राऊत, हनुमंत तुळशीराम कर्डिले, शांतिलाल रुपचंद सटाले, संजय विठ्ठल गांगर्डे (सर्व रा. निमगाव गांगर्डा), दशरथ बाबूराव हजारे, राजू विठोबा गोरे, संतोष जनार्दन देवकर (रुईछत्तीशी), बबन महादू वाकळे (थिटे सांगवी, ता. श्रीगोंदे), संपत माळशिखरे, नवनाथ भगवान धोंगडे (दोघेही धोंगडेवाडी), लक्ष्मण आसाराम राठोड (धानोरे, ता. आष्टी) यांना अटक करून त्यांच्याकडून १४ हजार ४३० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल कैलास भांगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ओव्हरलोड वाहनांना शहरात प्रवेश नको’
नगर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी
अपघात, वाहतूक कोंडी व रस्त्याची दुरवस्था करण्यास कारणीभूत असलेल्या क्षमतेपेक्षा जादा वजनाच्या मालाची वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर शहरातून वाहतूक करण्यास त्वरित बंदी घालावी, अन्यथा १७ ऑगस्टपासून फलटण पोलीस चौकी (राज चेंबर्स) येथे रास्ता रोको करू, असा इशारा समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन यांनी दिला.
सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या ‘ओव्हरलोड’ वाहनांना आरटीओचा आशीर्वाद आहे. आरटीओ ओव्हरलोड वाहनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असा आरोपही पक्षातर्फे करण्यात आला. यासंदर्भात तक्रार मुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

पिंपळगाव खांड लघुपाटबंधारे प्रकल्पाचे आज भूमिपूजन
राजूर, ७ ऑगस्ट/वार्ताहर
पाटबंधारे मंत्री अजित पवार व पालकमंत्री दिलीप वळसे यांच्या उपस्थितीत उद्या (शनिवारी) पिंपळगाव खांड लघुपाटबंधारे प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी दिली.सकाळी ९ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार मधुकरराव पिचड उपस्थित राहणार आहेत. महानंदचे संचालक सीताराम पाटील गायकर कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.

बसपचा घोडेगावला मेळावा
नेवासे, ७ ऑगस्ट/वार्ताहर
नेवासे विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार बहुजन समाज पक्षाचा व्हावा, यासाठी हरिजन, गिरीजन, दलित संघटनांनी एका झेंडय़ाखाली यावे, असे आवाहन जिल्हा बसपचे बबन मकासरे यांनी केले.तालुक्यातील घोडेगाव येथे आयोजित बसप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मकासरे बोलत होते. तालुकाध्यक्ष विकास चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.या वेळी मकासरे म्हणाले की, तालुक्यातील सर्व जनता घराणेशाही व हुकूमशाहीला कंटाळलेली असून, बहन मायावतींनी सर्वाना एकत्र करून बहुजनहिताचे कार्य केले आहे. दलित, मुस्लिम, ओबीसींना उत्तर प्रदेशात हक्क मिळ-वून दिला. हेच कार्य महाराष्ट्रात करायचे आहे. या वेळी रमेश भक्त, संजय ठोंबरे यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मनोज कुटस्थाने यांनी आभार मानले.

भूखंड गायब केल्याची तक्रार
श्रीरामपूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी
शहरातील स्टेट बँकेसमोरील सुमारे अकरा गुंठय़ांचा भूखंड नगररचना विभागाने योजना पूर्ण करताना गायब केला आहे. या गैरप्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी विजय सुभाष बोरावके यांनी केली आहे.दोन वर्षांपूर्वी नगररचना योजनेची अंमलबजावणी करताना वडील सुभाष दिगंबर बोरावके यांच्या नावावरील अकरा गुंठय़ांचा भूखंड गायब झाला. त्याची नोंद नगररचना नकाशावर नाही.

‘मुलाच्या मारहाणीची चौकशी व्हावी’
श्रीरामपूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी
मुलाला चोर समजून बेदम मारहाण केली आणि एवढे कमी म्हणून की काय पैशाचीही मागणी केली. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जुलेखाबी आदमाने या महिलेने केली आहे. पोलिसांच्या मारहाणीत मुलगा इर्शादअली हा जखमी झाला असून, त्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी; अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा आदमाने यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम- साठे
नगर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांंच्या गुणवत्तेत आणखी वाढ करण्यासाठी रेसिडेन्शिअल ज्युनिअर महाविद्यालयात मार्गदर्शनपर उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती उपप्राचार्य पी. एम. साठे यांनी दिली.महाविद्यालयात नुकताच पालक-शिक्षक मेळावा पार पडला. त्यावेळी साठे बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य मेजर टी.एन. दहातोंडे होतो.विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी त्यांच्या क्षमतेनुसार वेगवेगळे गट करून मार्गदर्शन केले जाते. स्कॉलर तसेच व अप्रगत विद्यार्थ्यांच्या बॅचेस करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तासाला हजेरी, पालकांना माहिती देणे, इंग्रजी सुधार प्रकल्प, जादा सराव परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम इ. उपक्रम घेण्यात येत आहेत, असे म्हणाले. या वेळी प्रा. नवले, प्रा. गोखले, प्रा. थोरात, प्रा. श्रीमती काकडे आदी उपस्थित होते.

विखे गौरवग्रंथाचे प्रकाशन
राहाता, ७ ऑगस्ट/वार्ताहर
माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या जीवनावर आधारित ‘सहकाररत्न’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत झाले.राजेश गायकवाड यांनी संपादित केलेल्या गौरवग्रंथात डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. अरुण साधू, डॉ. गंगाधर पानतावणे यांचे लेख आहेत.नगर जिल्हा पर्यटन डायरीचेही प्रकाशन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते प्रवरानगर येथे झाले. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार बाळासाहेब विखे, आमदार जयंत ससाणे यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब कोळसे यांनी संपादित केलेल्या डायरीत शिर्डी, शनिशिंगणापूर या पर्यटनस्थळांबरोबरच जिल्ह्य़ातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती आहे.

‘जगदंबा’ भाडेपट्टय़ावर सुरू करण्याची शर्मा यांची ग्वाही
कर्जत, ७ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्याची कामधेनू असलेला जगदंबा सहकारी साखर कारखाना चालविण्यास नॅचरल शुगरने असमर्थता दर्शविली. मात्र शेतकऱ्यांचे व सभासदांचे भवितव्य लक्षात घेऊन हा कारखाना बंद न ठेवता चालवू, अशी ग्वाही तालुक्यातील बारडगाव येथील उद्योजक अनिल शर्मा यांनी दिली.त्या दृष्टीने शर्मा यांनी आज कारखान्याच्या कार्यस्थळाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत कारखान्याचे तज्ज्ञ अभियंता गोपीनाथ म्हसे व रमेश कुलट होते. कारखान्यातील कामगारांशीही त्यांनी चर्चा केली.याशिवाय चालू गळीत हंगाम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व साखर आयुक्त राजेंद्र पवार यांनी या संदर्भात निर्णय दिल्यास आपण कारखाना सुरू करू, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

विविध विकासकामांचा उद्या प्रारंभ
श्रीरामपूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

शहरातील विविध विकासकामांचा प्रारंभ शनिवारी (दि. ८) आमदार जयंत ससाणे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष संजय फंड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रभाग १३ व २५मध्ये १२ लाख रुपये खर्चून रस्ता, गटारी व शौचालयाची कामे करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मंदाबाई कांबळे यांनी दिली.

रस्ता दुरुस्तीची मागणी
श्रीरामपूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी
गोंधवणी ते मावलायाचा मळा या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भगतसिंग ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अमोल आसकर यांनी दिला आहे. रस्त्यासाठी निधी मंजूर असूनही ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

‘पशुवैद्यकांच्या प्रश्नांसंदर्भात निवडणुकीपूर्वी निर्णय घेऊ’
श्रीरामपूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

पशुवैद्यकांच्या प्रश्नांसंदर्भात विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या संगमनेर भेटीत पशुपर्यवेक्षक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. शंकर मुठे, क्रांतिसेनेचे जिल्हाध्यक्ष कृषिराज टकले, डॉ. केशव आसने यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी डॉ. संजय फरगडे, डॉ. लांडे उपस्थित होते.