Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये असंतोष
सुबोध मोहिते आणि चंद्रपाल चौकसे समर्थकांमध्ये खडाजंगीचंदनसिंग रोटेले आणि नाना गावंडे आमने-सामने
नागपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू होताच काँग्रेसमधील गटबाजी आणि असंतोष उफाळून आला आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून सुबोध मोहिते आणि आनंदराव देशमुख व चंद्रपाल चौकसे यांच्या समर्थकांमध्ये खडाजंगी उडाली. या गोंधळामुळे सुमारे दहा मिनिटे वातावरण तणावपूर्ण होते, तर सावनेर मतदारसंघाच्या चर्चेदरम्यान चंदनसिंग रोटेले आणि नाना गावंडे आमने-सामने आले. काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर ग्रामीणमधील सहाही मतदारसंघातील संघटनात्मक तयारी आणि राजकीय स्थितीवर आज झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बँक संप
एटीएम रिकामे झाल्याने ग्राहक अडचणीत
विदर्भात साडेचार हजार कोटींचे व्यवहार ठप्प
नागपूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी बँकांचे एटीएम रिकामे झाल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली. मात्र, खाजगी बँकांचे एटीएम सुरू असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला. दोन दिवसाच्या संपामुळे व्यापाऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून ते आता सोमवारनंतरच सुरळीत होणार असल्याने व्यापाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. दोन दिवसाच्या देशव्यापी संपात विदर्भातील सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत.

‘स्वाईन फ्लू’ला घाबरू नका!
नागपूर, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

‘स्वाईन फ्लू’वर पूर्ण उपचार शक्य असून केवळ अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. ‘स्वाईन फ्ल्यू’वर वेळीच योग्य उपचार केल्यास तो पूर्ण बरा होऊ शकतो. प्रत्येक ताप हा स्वाईन फ्लूचा नाही. तसेच, संपूर्ण देशात जेवढे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आणि त्यांच्यावर वेळीच उपाय झाल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेतल्यास दैनंदिन कामे सुरळीत पार पाडण्यास सर्वानाच मदत होईल, असे आवाहन राज्य प्रशासनाने केले आहे. ‘स्वाईन फ्लू’ हा आजार ‘एच१एन१’ या विषाणूमुळे होतो.

पुण्याकडे जाणाऱ्या बसेस रिकाम्या येणाऱ्या मात्र‘फुल्ल’
नागपूर, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

‘स्वाईन फ्लू’च्या भीतीपोटी अनेक नागपूरकरांनी त्यांचा पुण्याला जाण्याचा बेत रद्द केला आहे. एरवी वर्षभरही पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी गाडय़ांमध्ये दिसणारी गर्दी आता ओसरली असून काहींनी त्यांचे आरक्षणही रद्द केले आहे. मात्र, पुण्याहून नागपूरकडे येणाऱ्या गाडय़ांमध्ये मात्र गर्दी वाढली आहे. साहित्य, संस्कृती, शिक्षण आणि व्यावसायिकदृष्टय़ा पुणे नागपूरशी जुळले गेले आहे. नागपूरच नव्हे तर, विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्य़ातूनही पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच नेहमी नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या रेल्वेत आरक्षण सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवाशी खाजगी बसेसला प्रश्नध्यान्य देतात.

आय.एम.ए.च्या अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक
नागपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या, रविवारी काही मोजक्याच केंद्रावर होत आहे. यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. डॉ. बकुलेश मेहता आणि डॉ. वसंत शेणॉय हे दोन उमेदवार रिंगणात असून हे दोन्ही उमेदवार मुंबई येथील आहेत. यापैकी डॉ. बकुलेश मेहता यांना इंडियन मेडिकल असोसिएशनने पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे समजले जात आहे. सध्याचे अध्यक्ष डॉ. अरुण पावडे (आर्वी) यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. या निवडणुकीत आय.एम.ए.चे सदस्यच मतदान करू शकतात.

‘आधार’ तर्फे उद्या कार्यशाळा
नागपूर, ७ जुलै / प्रतिनिधी

स्वाईन फ्लूबाबत सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी व हा रोग काय आहे, याची माहिती देण्यासाठी ‘आधार’ या सामाजिक संस्थेतर्फे ९ ऑगस्टला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. बजाजनगरातील कस्तुरबा सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुसुमताई वांकर राहणार आहेत. डॉ. जय देशमुख, बालरोगतज्ज्ञ राजीव मोहता, सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ डॉ. मीना मिश्रा, रोगप्रतिबंधकशास्त्र तज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे स्वाईन फ्लूबाबत माहिती देणार आहेत. या रोगामुळे जगभर हाहाकार माजला आहे. १६८ देशात या रोगाचा प्रसार झाला आहे. राज्यातही शंभरावर रुग्णांना याची लागण झाली आहे. त्यामुळे जनता भयभीत झाली आहे. स्वाईन फ्लू म्हणजे नेमके काय, या रोगाबाबतचे तथ्य आणि अफवांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित नागरिकांना तज्ज्ञांसोबत संवाद साधता येईल. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘आधार’चे अध्यक्ष डॉ. अविनाश रोडे यांनी केले आहे.

राज्यातील बहुतांश दलित काँग्रेस सोबत -मोहनप्रकाश
नागपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे ऐक्य झाले असले तरी, काँग्रेसने आघाडीबाबत अद्याप निर्णय न घेतल्याने ऐक्याचा नेमका काय परिणाम होईल, हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र, काँग्रेससोबत महाराष्ट्रातील दलित समाज मोठय़ा प्रमाणात असल्याचा दावा, पक्षाचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मोहनप्रकाश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रिपब्लिकन ऐक्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आघाडीचे स्वरूप निश्चित झाल्यावर पक्षाला लाभ होतो की नुकसान हे स्पष्ट होईल. १९९८ मध्ये झालेले ऐक्य आणि आताच्या राजकीय परिस्थितीत बराच बदल झाला आहे. यामुळेच काँग्रेसचे चार दलित खासदार निवडून आले. स्वबळावर की आघाडी याचा निर्णय पुढच्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. सध्या सर्व मतदारसंघांची वस्तुस्थिती जाणून घेण्यात येत आहे. यानंतरच उमेदवार निश्चित करण्यात येतील. राज्यात भाजप-सेना युतीशी आमची लढत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत असल्याचे सांगून त्याचा निवडणुकीत परिणाम होण्याची शक्यता मोहनप्रकाश यांनी फेटाळून लावली. यावेळी जिल्हाध्यक्षा सुनीता गावंडे उपस्थित होत्या.

शेतकऱ्यांना सर्व कर्जातून मुक्त करा
बेला येथील शेतकरी मेळाव्यात मागणी
नागपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

शेतकऱ्यांचा आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून विदर्भ विकास महासभेच्यावतीने बेला येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून राजकुमार तिरपुडे, आत्माराम उखळकर, केशवराव गोडे, बाबासाहेब बोंदरे, रामाजी कन्नाके, अहमद कादरी, बाबासाहेब तिमांडे, प्रश्न. ज्ञानेश्वर डोंगरे, चिंतामणराव टेकाडे उपस्थित होते. शेतकऱ्यांना, अल्पभूधारकांना सर्व योजनांचा लाभ मिळावा, आदिवासी दलित ओबीसी अल्पसंख्यांक यांना मिळणाऱ्या सोयी सवलतीचा योग्य प्रकारे वापर करण्यात यावा, शेतकऱ्यांना आजपर्यंतच्या सर्व कर्जातून मुक्त करावे, शासनाने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा बाजारभावाप्रमाणे एकमुस्त मोबदला देण्यात यावा. इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
विदर्भातील शेतकरी भारनियमनाने त्रस्त झाला आहे. विदर्भातच वीज निर्मिती होत असूनही सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना उपेक्षा आणि यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे यावेळी राजकुमार तिरपुडे म्हणाले.

आदिम एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे बहुजन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिबीर
नागपूर,७ ऑगस्ट / प्रतिनिधी

ऑल इंडिया आदिम एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे बहुजन समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिबीर मानेवाडय़ात आयोजित करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष चंद्रभान पराते प्रमुख वक्ते तर, आदिमच्या नेत्या अ‍ॅड. नंदा पराते अध्यक्षस्थानी होत्या. कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधीलकीतून समाजाच्या समस्या सोडवण्यास प्रश्नधान्य द्यावे आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटावे, असे आवाहन चंद्रभान पराते यांनी केले. आदिवासी, दलित, शोषितांना आरक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे. राज्यघटनेत ही तरतूद आहे. मात्र, आजही समाजातील अनेक घटकांना डावलण्यात येत असल्याने ते अजूनही उपेक्षित आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मागास समाजाचे कल्याण होईल यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे अ‍ॅड. नंदा पराते म्हणाल्या. शिबिरास विठ्ठल बाकरे, अशोक डेकाटे, प्रवीण हेवलीकर, गोपाळ पौनीकर, हिरालाल मौंदेकर, रघुनंदन पराते, गणेश कोहाड, संजय टेंभेकर, हिराचंद सातपुते, प्रमोद निनावे, धनराज कुंभारे, कैलास निनावे, अरुण मौंदेकर, सुनील सोनकुसरे, ज्ञानेश्वर दाढे, हेमराज शिंदेकर, प्रमोद दंडारे, दशरथ गहाणे, दिलीप नंदनकर आदींचे सहकार्य लाभले.

विकास अर्बनच्या आवारात वृक्षारोपण
नागपूर, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

विकास अर्बन क्रेडिट सहकारी संस्थेच्या कार्यालयाच्या आवारात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण जुमडे, भाजपचे दक्षिण नागपूरचे अध्यक्ष बळवंत जिचकार, युनेस्को क्लबचे डॉ. त्र्यंबक बांदरे उपस्थित होते. झाडांचे जतन करून प्रदूषणावर मात करावी, असे आवाहन डॉ. बांदरे यांनी केले. संस्थेचे संचालक दिलीप सुरकर यांनी संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत १० वी, १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे भाऊराव कांबळे, ज्ञानेश्वर नखाते, रजनी बांदरे, भागवत, बुटले, ढगे, खानवलकर उपस्थित होते. संचालन दिलीप सुरकर यांनी केले. आभार रंजना कावळे यांनी मानले.

‘मातेचे दूध- बालकांचा सर्वोत्तम व संपूर्ण आहार’ सीडीचे प्रकाशन
नागपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

डॉ. संजय मराठे यांनी तयार केलेल्या ‘मातेचे दूध- बालकांचा सर्वोत्तम व संपूर्ण आहार’ या सीडीचे प्रकाशन नुकतेच शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला राष्ट्रीय नवजात शिशु मंचचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड, डॉ. अनिल जयस्वाल, डॉ. प्रवीण मिश्रा उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय मराठे यांनी बाळातपणानंतर सहा महिने आईच्या दुधाचे असलेले महत्त्व आणि त्यासाठी महिलांनी घ्यायची काळजी याबाबत माहिती दिली. यावेळी डॉ. मराठे यांनी सीडीबाबतही माहिती दिली. शहरातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालय, मातृसेवा संघ, बाल आणि स्त्रीरोग तज्ज्ञांना ही सीडी निशुल्क देण्यात येणार असल्याचे डॉ. मराठे यांनी सांगितले. बालकांच्या पोषक आहारासंबंधी महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. डॉ. माधुरी कानेटकर यांनी आभार मानले. सीडी तयार करण्यासाठी डॉ. शीला मथाय, डॉ. प्रवीण मिश्रा व संगीता पांडा यांनी परिश्रम घेतले.

आमदार बावनकुळे लोकांची दिशाभूल करीत आहेत -दळवी
नागपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

गेल्या साडेचार वर्षापासून नरसाळा हुडकेश्वर या भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील पाणी पुरवठय़ाच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. मात्र याचे श्रेय आमदार चंद्रशेखर बावनकुळे घेत असून ते लोकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत दळवी यांनी पत्रकार परिषदेत केला.
महापालिकेने गेल्या साडेचार वर्षात नरसाळा हुडकेश्वर भागात पाणी पुरवठय़ाची सोय केली नाही. जीवन प्रश्नधिकरणामार्फत नरसाळा येथे पाण्याची टाकी मंजूर करण्यासाठी ग्रामीण काँग्रेसने प्रयत्न केले. टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेला विनंती करण्यात आली. महापालिकेत भाजपची सत्ता, शिवाय नरसाळा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे, तरीही पाणी पुरवठा करण्यात आला नाही. ग्रामीण काँग्रेसने याबाबतीत मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला आणि पाणी पुरवठय़ाची योजना अंमलात आणली. मात्र या कामाचे श्रेय आमदार बावनकुळे घेत असल्याचे दळवी म्हणाले. पत्रकार परिषदेला दिवाकरराव जंगले, किशोर वानखेडे, महादेव भोयर, राजू वैद्य, विनोद चरडे, बंडू वैद्य आदी उपस्थित होते.

डॉ. राजेश नाईक यांचे रक्तदान
नागपूर, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष गेव्ह आवारी यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेचे सदस्य डॉ. राजेश नाईक यांनी डागा रुग्णालयातील रक्तपेढीत ५५ वे रक्तदान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली खेडीकर होत्या.
याप्रसंगी माजी उपमहापौर अशोक जर्मन, जिल्हा काँग्रेसचे महामंत्री तुफैलभाई अशर, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल कोटेजा, इसाकभाई अंसारी, डॉ. अतुल कल्लावार, डॉ. सतीशचंद्र जयस्वाल, शैलेश घाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल कल्लावार तर आभारप्रदर्शन डॉ. विक्रांत बंगालकर यांनी मानले.

साठेबाज, नफेखोरांविरुद्ध कारवाईची मागणी
नागपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी साठेबाज आणि नफेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शेख हुसेन यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांच्याकडे केली. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. साठेबाजांनी गोदामात वस्तू जमा करून कृत्रीम टंचाई निर्माण केली आहे. प्रश्नमाणिक व्यापारी यामुळे त्रस्त झाले आहेत. यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसत असून साठा करणाऱ्यांवर छापे टाकावे आणि कठोर कारवाई करण्यात यावी. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग यांनी व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिल्यानंतर छापे टाकण्यात आले पण, लवकरच ही कारवाई बंद झाली, याकडेही हुसेन यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. शिष्टमंडळात शकुर नागाणी, अब्दुल हमीद, अंबादास गोंडाणे, गणेश शाहु, मनोज शर्मा, अशफाक अली, नगरसेवक सुलेमान अब्बास, हरमींदर लोहिया, मुश्ताक अहमद, रवींद्र जनबंधु, शरीफ अंसारी, महेश शाहु, प्रवीण विघटे, नईम खान, अब्दुल गनी, अफझल अली आणि सूर्यकांत उईके यांचा समावेश होता.

जातिवाचक शिवीगाळ; अधिकाऱ्यावर गुन्हा
नागपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी तब्बल सात महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. दर्शन कॉलनी येथे हिरक परियोजना लेखा कार्यालय आहे. या कार्यालयात आनंद कृष्णाजी शिंदे (५९) हे लेखा अधिकारी आहेत. याच कार्यालयातील लेखा परीक्षक आत्माराम नागोराव वानखेडे (५४) हे २० डिसेंबर २००८ला शिंदे यांच्या कक्षात गेले असता दोघांमध्ये वाद झाला. या वादात शिंदे यांनी जातिवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार वानखेडे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली.
या तक्रारीची चौकशी केल्यानंतर शिंदे यांनी वानखेडे यांना शिवीगाळ केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नंदनवन पोलिसांनी ६ ऑगस्टला शिंदे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

गांधीसागरजवळ मृतदेह आढळला
नागपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

गांधीसागरजवळील टाटा पारशी शाळेजवळ आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. मृताच्या गळ्यावर तीष्ण शस्त्राचे वार होते.
सैय्यद शौकत अली (४८) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून तो लोधीपुरा येथील रहिवासी होता. पागे उद्यानासमोरील सायकल स्टँडवर तो गेल्या काही वर्षापासून काम करत होता. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माने आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी मेयोमध्ये पाठवला. याप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचा खून नेमका कशासाठी करण्यात आला, याचा शोध पोलीस घेत आहेत. जुन्या शत्रूत्वावरून त्याचा खून करण्यात आला असावा, असे बोलले जात आहे.

रविवारी वसंत गाडगीळ यांचे व्याख्यान
विश्व संस्कृती प्रतिष्ठानच्या विदर्भ शाखेतर्फे डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘प्रज्ञाभारती स्मृती सुधा’ व्याख्यानमाला रविवारी, ९ ऑगस्टला आयोजित करण्यात आली असून व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पुण्याच्या ‘शारदा’ नियतकालीकाचे संपादक वसंत अनंत गाडगीळ गुंफणार आहेत. बजाजनगरातील ज्ञानेश्वर मंदिरात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. वर्णेकर यांनी लिहिलेल्या ‘तीर्थभारतम्’ मधील गीत सादर करण्यात येतील. या गीतांना पुरुषोत्तम सामक यांनी संगीतबद्ध केले आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व संस्कृत प्रतिष्ठानचे प्रदेश अध्यक्ष डॉ. माणिक पाटील आणि डॉ. विजया जोशी यांनी केले आहे.

सप्तक व ललित कला निधीच्या वतीने आज शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम
नागपूर, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

सप्तक आणि ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, ८ व ९ ऑगस्टला वर्षाऋतूवर आधारित शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंटिफिक सभागृहात होणाऱ्या या महोत्सवाचा प्रश्नरंभ मुंबईच्या रतिश तागडे यांच्या व्हायोलिन वादनाने होणार आहे. व्हायोलिन वादनानंतर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विनायक तोरवी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. अत्यंत दमदार आणि रंजक गायनशैली लाभलेले पं. तोरवी प्रथमच नागपुरात येत आहेत. त्यांना संदेश पोपटकर व श्रीकांत पिसे साथसंगत करणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी इंदोरच्या तरुण गायिका शाश्वती मंडल यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. पं. बाळासाहेब पूंछवाले यांची शाश्वती ही कन्या आहे. शाश्वती मंडल यांच्या गायनानंतर अहमदाबादमधील मंजू मेहता यांचे सतार वादन होणार आहे. मंजू मेहता पं. विश्वमोहन भट यांच्या भगिनी आणि पं. रविशंकर यांच्या शिष्या आहेत. त्यांना तबला संगत पं. रामकुमार मिश्रा करणार आहेत. कार्यक्रम दोन्ही दिवस सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.