Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

नवनीत

जी व न द र्श न
देहप्रक्षालन पुरेसे नाही

 

एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते. संडगाख नावाचा ब्राह्मणही तेथे राहत होता. तो स्नानवादी होता आणि जलप्रक्षालनाने स्वत:ला शुद्ध करण्याच्या आचाराचे तो अवलंबन करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता. एकदा महास्थविर आनंद सकाळच्या प्रहरी चीवर धारण करून भिक्षापात्र व एक चीवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाला. श्रावस्तीत मिळविलेली भिक्षा खाल्ल्यावर तो भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला,
‘‘भगवान! या श्रावस्तीत संडगाख नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून, स्नानाने स्वत:ला शुद्ध बनविण्याच्या कर्मात तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही. भगवंतांनी करुणा करून त्या संडगाख ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल.’’
भगवंतांनी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शविली. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चीवर चढवून व एक चीवर आणि भिक्षापात्र हाती घेऊन त्या खंडगाख ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन ते आसनावर बसले. संडगाख ब्राह्मण भगवंताजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला.
तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले, ‘‘ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून, रात्रंदिवस स्नान करून स्वत:ला शुद्ध बनविण्याचा प्रयत्न करीत आहेस. हे खरे आहे का?’’
‘श्रमण गौतम, हे सर्व खरे आहे.’
‘मग, हे ब्राह्मणा, हे स्नानव्रत धरून तू काय मिळविणार आहेस?’
‘‘गौतमा, हे व्रत अशासाठी आहे;- दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नानव्रताने मी स्वत:ला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे.’’
भगवान म्हणाले, ‘धर्म हा एक तडाग आहे. तो स्वच्छ व निर्मल आहे.’ ‘‘जे या तडागात निमज्जन करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वाग शुद्ध होऊन पैलतीराला जातात.’’
यावर तो संडगाख ब्राह्मण म्हणाला, ‘‘वा: छान, श्रमण गौतम, मला आपला शरणागत उपासक करा. आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार.’’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बुद्ध आणि त्यांचा धम्म)

कु तू ह ल
सापेक्षतावादाचे पुरावे
व्यापक सापेक्षतावादाचे कोणते पुरावे सापडले आहेत?
दूरवरच्या ताऱ्याकडून येणारे प्रकाशकिरण सूर्यबिंबाच्या जवळून जात असताना व्यापक सापेक्षतावादानुसार सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे या प्रकाशकिरणांच्या मार्गात बदल व्हायला हवा. प्रकाशाच्या या मार्गबदलामुळे ताऱ्यांच्या स्थानांत बदल झालेला दिसायला हवा. व्यापक सापेक्षतावादावर आधारित असणाऱ्या या भाकितांचा पडताळा घेण्यासाठी २९ मे १९१९ साली झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी दोन ब्रिटिश मोहिमा आखण्यात आल्या. यातील एक मोहीम विख्यात खगोलशास्त्रज्ञ ऑर्थर एडिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला असलेल्या प्रिंसिपी या बेटावर गेली. दुसरी मोहीम ही ब्राझीलमधील सोब्राल येथे गेली होती. सूर्यबिंबाजवळ असणाऱ्या रोहिणी व तिच्या आसपासच्या ताऱ्यांची छायाचित्रं या मोहिमांत ग्रहणाच्या वेळी घेतली गेली. या छायाचित्रांची तुलना जानेवारी महिन्यात (जेव्हा हे तारे सूर्यबिंबापासून दूर होते त्यावेळी) रात्री घेतलेल्या छायाचित्रांशी करण्यात आली. सूर्यबिंबाजवळ असताना या ताऱ्यांची स्थानं सापेक्षतावादावर आधारित गणितानुसार अपेक्षेइतकी सरकलेली आढळली. किंताऱ्यांच्या (क्वेसार) स्थानांत सूर्यबिंबाच्या निकट असताना झालेला असाच बदल इ.स. १९६० सालच्या दशकात रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने मोजून या निष्कर्षांवर शिक्कामोर्तब केलं गेलं.
प्रकाशकिरणांच्या मार्गावर होणाऱ्या या परिणामाबरोबरच गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाशकिरणांच्या ऊर्जेत होणारे बदलही मोजण्यात आले आहेत. इ.स. १९५९ साली पाऊंड आणि रेबका या अमेरिकन शास्त्रज्ञद्वयांनी गामा किरणांच्या ऊर्जेत गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करताना होणारी घट ही किरणांच्या तरंगलांबीतील होणाऱ्या वाढीद्वारे यशस्वीरीत्या मोजली. हार्वर्ड विद्यापीठात केल्या गेलेल्या या प्रयोगात लोहाच्या एका विशिष्ट किरणोत्सर्गी समस्थानिकाचा वापर केला गेला. या समस्थानिकाच्या अणूंकडून उत्सर्जित होणारे गामा किरण हे सुमारे साडेबावीस मीटर उंचीच्या उभ्या मनोऱ्यातून गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने पाठवल्यावर त्यांच्या तरंगलांबीत झालेली वाढ ही व्यापक सापेक्षतावादानुसार अपेक्षेइतकी भरली.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
बीजिंग ऑलिम्पिकला सुरुवात
आठ ऑगस्ट २००८ या दिवशी सकाळी ८ वाजून ८ मिनिटे आणि ८ सेकंदाची वेळ जगाच्या- विशेषत: चीनच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. याच दिवशी बीजिंग ऑलिम्पिकला सुरुवात झाली. ऑलिम्पिक इतिहासात न भूतो न भविष्यति असा दिमाखदार सोहळा चीनने या दिवशी सादर केला. यासाठी १५ हजार कलाकार अहोरात्र झटत होते. जॉर्ज बुश, सोनिया गांधी यांच्यासह जगातील ८० देशांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ९१ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने १ अब्ज ३३ कोटी पंख असलेल्या चिनी ड्रॅगनने आपले डोळे उघडले आणि त्यातून लखलखणाऱ्या प्रकाशाने उपस्थितांच्या डोळय़ांची पारणे फेडली. उद्घाटनाच्या दिमाखदार सोहळय़ाच्या माध्यमातून चीनने आपल्या पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचे ओघवते दर्शन अवघ्या काही तासांत घडवले. तब्बल ५७ सुवर्णपदके जिंकत पदकांचे शतक ठोकत अमेरिकेची मक्तेदारी मोडून यजमान चीनने पदकतालिकेत प्रथम क्रमांक पटकावत जगाला हादरा दिला. भारताबाबत या ऑलिम्पिकमध्ये समाधानाची बाब म्हणजे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याची सुरुवात या ऑलिम्पिकपासूनच झाली.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
भुरळ पाडणारी बाग
प्रिया खूप मोठय़ा फ्लॅटमध्ये वाढली. अगदी आलिशान, ऐसपैस आणि देखणं घर होतं तिचं. पण शाळेत जाणाऱ्या, अल्लड, खेळकर आणि स्वप्नाळू प्रियाचं मन काही त्या घरात रमायचं नाही. तिला आपलं हिरवळीवरून धावायला आवडायचं. फुलांचे रंग आणि गंध, पक्ष्यांचे सुरेल गाणे मोहवून टाकायचे; पण तिच्या घराला मुळी बागच नव्हती. एके दिवशी तिला एक दूर जाणारी वाट दिसली. वाटेजवळ पेरू विकत बसलेल्या आजीला विचारले, ‘आजी, ही वाट कुठे जाते हो?’ ‘हा रस्ता भुरळ पाडणाऱ्या बागेकडे जातो. त्याच्या मालकिणीला जादुटोणा करता येतो. कुणी जात नाही या वाटेनं पोरी.’ बाग म्हटल्यावर प्रिया उत्साहाने निघाली. तिला एक गुलाबी पेरू कापून त्याला मीठतिखट लावून देत पेरुवाली म्हणाली, ‘बागेतले फूलबिल तोडू नको ताई. काहीतरी आक्रित घडेल.’ सगळय़ा बागांत सुंदर होती ती बाग. प्रिया फार आनंदली. पुन:पुन्हा ती बागेत जाऊ लागली. एके दिवशी फार सुंदर वास येणारं गुलाबाचं फूल तिनं न राहावून तोडलं आणि ते डोक्यात घालून ती घरी आली. फूल पाण्यात घालून ठेवताना तिला पेरुवाल्या आजीनं बजावलेलं आठवलं. ती फार घाबरली. रोज धास्तावून काय घडतंय याची ती वाट पाहू लागली. बरेच दिवस गेले. काहीच घडलं नाही. ती मनाचा हिय्या करून बागेत लांब जाणाऱ्या त्या पायवाटेने गेली. पाहते तो सगळी बाग मरगळलेली, सुकलेली, भकास झालेली होती. प्रियाला फार रडू आलं. तिला आणखी कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. एका सुंदर घरातून तो आवाज येत होता. प्रिया घरात गेली. एक जख्ख म्हातारी केविलवाणे रडत होती. प्रियाने तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरून विचारले, ‘का रडता?’ ‘कुणीतरी माझ्या जादूच्या बागेतलं फूल चोरलं. फूल कायम ताजं राहणार, पण बाग मरून गेली..’ प्रिया म्हणाली, ‘मी फूल तोडलं. मला काय ती शिक्षा द्या. बाग तुमच्या जादूने पूर्वीसारखी करा.’ म्हातारी म्हणाली, ‘फूल तोडलंस त्याच वेळी माझी जादू नाहीशी झाली. मीही या बागेसारखीच मरून जाईन.’ प्रियाचं काळीज फाटून गेलं. ती रडत किंचाळली, ‘असं होता कामा नये. मी काय करू?’ म्हातारी म्हणाली, ‘फूल परत आण. त्याबरोबर ओंजळभर मुंगळे आण.’ प्रियाने हिंमत करून मुंगळे गोळा केले. फूल घेऊन ती परतली. म्हातारीने काही मंत्र म्हटले. काही जादूची मोहिनी टाकली. तिने मुंगळय़ांचे काय केले प्रियाला कळले नाही. ती वाट पाहात उदासपणे बागेत बसून राहिली. म्हातारीने जादूचे रसायन बनविले आणि पिऊन टाकले. अचानक बाग पुन्हा तरारली. म्हातारीच्या जागी सुंदर तरुणी दिसायला लागली. प्रियाने धावत जाऊन तिला मिठी मारली. दोघी एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या आणि जादूच्या बागेत आनंदाने भेटू लागल्या. तुम्ही प्रामाणिकपणे वागण्याची हिंमत दाखवता तेव्हा तुमचा आसमंत तुम्हाला सुंदर वाटू लागतो. इतरांचा तुमच्यावर विश्वास बसतो. त्यामुळे नवे मित्रमैत्रिणी मिळतात. आजचा संकल्प- मी प्रामाणिकपणे वागेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com