Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

ऐरोलीतून आता माथाडी दबाव गट
नवी मुंबई (प्रतिनिधी) :
नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघांवर दावा सांगण्यात सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँॅग्रेसमधील नेतेमंडळींमध्ये स्पर्धा लागली असतानाच या शहरातून माथाडी कामगारांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी दबाव गट तयार होऊ लागला आहे. नवी मुंबईत विशेषत ऐरोली विधानसभा मतदारसंघात माथाडी कामगारांची संख्या लक्षणीय आहे. या पाश्र्वभूमीवर माथाडी कामगारांचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी या मतदारसंघासाठी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे दावा सांगितल्याने पालकमंत्री गणेश नाईक यांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत उपस्थित असलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये नरेंद्र पाटील यांना नवी मुंबईतून पाचारण करण्यात आले होते. यामुळे शहरातील दोन्ही मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या पालकमंत्र्यांवर आता कॉँग्रेससोबत माथाडी नेत्यांनाही चुचकारण्याची वेळ येणार आहे.

नवी मुंबईत इंजिनीयर, ग्रॅज्युएट्सना मोक्का
शिवसेनेचा आरोप
नवी मुंबई/प्रतिनिधी

नवी मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नवे पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईचा पहिलाच अंक सध्या वादात सापडण्याची चिन्हे दिसू लागली असून, शहर पोलिसांनी मागील आठवडय़ात मोक्का लावलेल्या ११ आरोपींपैकी पाच तरुण केवळ शिवसैनिक आहेत म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. अतिशय सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येते. असे असताना इंजिनीयर, कॉमर्स ग्रॅज्युएट असणाऱ्या सुशिक्षित तरुणांना केवळ ते शिवसेनेला मदत करतात, म्हणून पोलिसांनी मोक्का लावल्याचा खळबळजनक आरोप नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे, पालकमंत्री गणेश नाईक यांच्या सांगण्यावरून सुशिक्षित तरुणांना मोक्का लावण्यात आल्याचा आरोप करत चौगुले यांनी यावेळी या युवकांच्या पालकांनाही पत्रकारांपुढे उभे केले.

स्वाईन फ्ल्यू संदर्भात डॉक्टरांची बैठक
पनवेल/प्रतिनिधी :
स्वाईन फ्ल्यूने बाधित झालेला रुग्ण दुर्दैवाने पनवेल परिसरात आढळला तर त्याच्यावर पनवेल परिसरातच उपचार व्हावेत. या उपचारांसाठी एमजीएम अथवा त्यासारख्या रुग्णालयांचे सहकार्य घेणे शक्य आहे, असे मत आमदार विवेक पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले.
स्वाईन फ्ल्यूने राज्यभरात थैमान घातल्याच्या पाश्र्वभूमीवर पाटील यांनी पनवेलमधील आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी शहरातील सर्व प्रकारच्या डॉक्टरांची बैठक पनवेल नगरपालिकेत आयोजित केली होती. या बैठकीला १०० डॉक्टरांनी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला. यावेळी बाळाराम पाटील, नगराध्यक्ष सुनील मोहोड, अनेक नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.

ठाणे-पनवेल लोकलचा महिलांना सुखद धक्का!
पनवेल/प्रतिनिधी :
ठाणे-पनवेल मार्गावर धावणाऱ्या प्रत्येक लोकलमधील पहिला आणि शेवटचा डबा महिलांसाठी राखीव ठेवून रेल्वे प्रशासनाने महिलांना सुखद धक्का दिला आहे.
आतापर्यंत महिलांसाठी दुसऱ्या दर्जाचा एकच डबा असल्याने या निर्णयामुळे महिला प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या बदलामुळे जिना चढल्यानंतर आम्हाला लगेचच गाडी पकडता येईल. वृद्ध, आजारी आणि गरोदर स्त्रियांना त्याचा विशेष लाभ होईल, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाने कोणतीही घोषणा न करता हा निर्णय अमलात आणल्याने पुरुष प्रवाशांमध्ये मात्र गोंधळ उडाला आहे. नेहमी पहिला डबा पकडण्याची सवय झालेले पुरुष प्रवासी महिलांसाठीचा हा डबा पाहून गोंधळून जात आहेत. महिलांच्या डब्यात चढल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होत असल्याने रेल्वे प्रशासनाने हा बदल योग्यप्रकारे सांगणे गरजेचे होते, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

तरुणाच्या सतर्कतेमुळे चोराला अटक
बेलापूर/वार्ताहर

नवी मुंबईत दुचाकी व सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नवी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. असे असताना चोरांना पकडण्यास पोलिसांना यश येत नसल्याने, आता येथील नागरिकांनीच कंबर कसली आहे. पोलिसांच्या या अकार्यक्षमतेमुळे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त गुन्हे होतात, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तळातील कर्मचारी, शिपाई यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत उरण फाटा येथे रात्री १० वाजता बसची वाट पाहात उभे असलेल्या नागरिकाला लुटण्यात आले होते. यावेळी मित्रांसोबत दुचाकीवरून तेथून जात असताना प्रीतमसिंग या तरुणाच्या दृष्टीस ही घटना पडली. त्याने चोरांचा पाठलाग करून विकास बेढेकर या चोराला पकडले व पोलिसांच्या हवाली केले. तसेच लुटण्यात आलेल्या अशोक हेंगडे या जखमी नागरिकास रुग्णालयात दाखल केले. या तरुणाने पोलिसांच्या हवाली केलेल्या चोराची अधिक चौकशी करून पोलिसांनी अन्य चार जणांना अटक केली. तसेच एपीएमसी मार्केट येथेही सोनसाखळी चोराला पाच तरुणांनी पकडले.