Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

त्र्यंबकेश्वर परिक्रमेचे भाविकांना वेध
प्रशासनाकडून तयारीला गती * ‘स्वाइन फ्लू’च्या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागाची खास दक्षता
प्रतिनिधी / नाशिक

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वरच्या परिक्रमेसाठी भाविकांमध्ये यंदाही नेहमीप्रमाणेच उत्साह दिसून येत असताना प्रशासनातर्फे त्यादृष्टीने सर्वतोपरी सज्जतेचे प्रयत्न सुरू आहेत. यंदा पुण्यासह राज्यातील अन्य काही ठिकाणी उद्भवलेल्या ‘स्वाईन फ्लू’चा धोका पाहता व परिक्रमेसाठी त्र्यंबकनगरीत दाखल होणाऱ्या राज्यभरातील भाविकांची संख्या लक्षात घेता आरोग्य विभागातर्फे विशेष दक्षता घेतली जात आहे.

तडजोड शुल्काऐवजी बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध आता थेट खटले
प्रतिनिधी / नाशिक

वारंवार कारवाई करूनही शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने अखेर निर्वाणीची भूमिका घेतली असून धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याबद्दल प्रथम तडजोड शुल्क वसूल करण्याऐवजी चालकांविरुद्ध थेट न्यायालयात खटले दाखल करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यात तब्बल ६४५ रिक्षांचे वाहतूक परवाना निलंबित करतानाच २०१ प्रकरणे न्यायालयात दाखल झाली आहेत. दंड भरून कायद्याच्या कचाटय़ातून सुटका करवून घेणाऱ्या रिक्षाचालकांना या माध्यमातून वेसण घालण्याचा प्रयत्न आहे.

गणेशोत्सवादरम्यान जलप्रदूषणावर रोखण्यासाठी नेचर क्लबचा उपक्रम
प्रतिनिधी / नाशिक

सार्वजनिक उत्सवांमध्ये गणेशोत्सवाचे स्थान उच्च. त्यामुळेच गणेश मूर्तीची निवड करताना काळजी घेणे गरजेचे असते. विसर्जनावेळी बहुतेक मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने मोठय़ा प्रमाणावर जल प्रदूषण होते. विसर्जनाच्या दिवशी दरवर्षी वाढणाऱ्या जलप्रदुषणाचा विचार करता येथील नेचर क्लबतर्फे शाडू मातीच्या गणेश मूर्तीना स्थान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्सवाचा आनंद जपतांना आपल्याकडून पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी संस्थेच्या वतीने घेण्यात येते.

शिवसेनेतील घमासान
महागाईच्या वरवंटय़ाखाली दबली जाणारी जनता..अकरावी प्रवेशावरून उडालेला गोंधळ..एटीकेटीच्या निर्णयावरून झालेली नाचक्की..खतांच्या टंचाईमुळे हैराण झालेले शेतकरी..अशा एक ना अनेक समस्यांचा आगडोंब राज्यात उसळला असताना आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या सर्व परिस्थितीचा राजकीय लाभ उठविण्याच्या दिशेने राज्यात शिवसेनेकडून पावले टाकली जात असताना नाशिक महानगरातील शिवसेना मात्र अंतर्गत कलहातच गुरफटली आहे.

उपनगर येथे बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न
वार्ताहर / नाशिकरोड

येथील उपनगर भागात गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी महाराष्ट्र बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
रेल्वेस्थानक व नाशिक-पुणे महामार्गामुळे नाशिकरोड हा तसा रात्रंदिवस गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. बाहेर गावाहून येणारे प्रवासी अन् रात्रपाळीसाठी ये-जा करणाऱ्या कामगारांमुळे रात्रीही नाशिकरोड एकप्रकारे जागे असते. या परिस्थितीत महामार्गालगतच्या महाराष्ट्र बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
उपनगर येथे बँकेची ही शाखा आहे. कार्यालयाचा मागील दरवाजा तोडून चोरटे आतमध्ये शिरले. त्यांनी प्रथम धोक्याची सूचना देणाऱ्या यंत्रणेच्या वायर्स कापून टाकल्या. त्यानंतर बराच वेळ तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना ते शक्य झाले नाही. अनेक खटपटी करूनही तिजोरी फोडता न आल्याने चोरटे पळून गेले. सकाळी बँकेचे कर्मचारी दाखल झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर बँकेचे व्यवस्थापक गिरीश जहागीरदार यांनी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम नाशिकरोड पोलीस ठाण्यात सुरू होते. दुकाने फोडून चोरीचे प्रकार यापूर्वी नाशिकरोड परिसरात घडले आहे. रात्रीची गस्त वाढवून पोलीस यंत्रणेने अशा घटनांवर नियंत्रण मिळावावे अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.

राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्यां इंदुमती गायधनी यांचे निधन
नाशिक / प्रतिनिधी

येथील राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां इंदुमती त्र्यंबक गायधनी (८४) यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. राष्ट्रीय सेविका संघाचे त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ कार्य केले. नाशिकच्या राणी लक्ष्मीबाई भवनच्या स्थापनेपासून त्या समितीच्या कार्यकर्त्यां होत्या. नाशिक विभागीय राष्ट्र सेविका समितीच्या कामात त्यांचा सहभाग होता. महिला सबलीकरणावर त्यांनी विशेष भर दिला. महिलांनी स्वतचे संरक्षण स्वत करावे यासाठी त्या लाठीकाठी चालविण्याचे प्रशिक्षणही देत. महिलांनी केवळ चूल-मूल सांभाळू नये तर राष्ट्रीय कार्यातही सहभागी व्हावे अशी त्यांची आग्रहाची भूमिका होती. पारतंत्रात भूमिगत झालेल्या कार्यकर्त्यांची भोजन व्यवस्था त्या स्वत बघत. आणीबाणीच्या काळात पती त्र्यंबक गायधनी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले. किल्लारीच्या भूकंपात त्यांनी दहा दिवस तेथे राहून महिलांच्या पुनर्वसनासाठी काम केले. नाशिक जिल्ह्य़ाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्याध्यक्ष रमेश गायधनी यांच्या त्या काकू होय.