Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

..अखेर जळगावमध्ये रोडरोमिओ प्रतिबंधक पथक
वार्ताहर / जळगाव

शहरात एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर टवाळखोर तरुणाकडून प्राणघातक हल्ला झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी ‘रोडरोमिओ प्रतिबंधक पथक’ स्थापन केले आहे. पालक वर्गाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असले तरी पथकातील सदस्यांकडून प्रामाणिकपणे काम व्हावे, जेणेकरून खरोखरच टवाळखोरीवर प्रतिबंध बसेल अशी अपेक्षा येथे व्यक्त करण्यात येत आहे.

कोटबांधणी येथे गॅस्ट्रोसदृश आजाराने दोन बालकांचा मृत्यू
वार्ताहर / शहादा

तालुक्यातील म्हसावद परिसरात गॅस्ट्रोसदृश रोगाची लागण झाली असून त्यामुळे कोटबांधणी येथील दोन बालके दगावली तर अन्य नऊ रुग्णांना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आजारामुळे रश्मी गोरख भील (१ वर्ष), कमला फुलसिंग भिल (८ महिने) या दोन बालकांचा कोटबांधणी येथे मृत्यू झाला.

सटाणा वळण रस्त्याचे काम लवकरच
वार्ताहर / सटाणा
सटाणा वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास शहरातून जाणारी अवजड वाहने शहराबाहेरून जाणार असल्याने वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे वळण रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे, अशी माहिती राम इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक यु. डी. नेहेते यांनी दिली.

पराभवाचे शल्य येत्या निवडणुकीत धुवून काढा : आर. आर. पाटील
वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ातील जळगाव आणि रावेर या लोकसभेच्या दोन्ही जागांवर झालेल्या पराभवाचे शल्य येत्या विधानसभा निवडणुकीत धुवून काढावे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी केले. जातीयवादी शक्तींना दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी व्हावी हा हेतू आहे. पण आघाडी होणार नसेल तर सर्वच्या सर्व २८८ जागांवर लढण्यास राष्ट्रवादी सक्षम असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सावरकरांनी धुळाक्षरे गिरविलेली शाळा घाणीच्या साम्राज्यात
स्पॉट दारणा
प्रकाश उबाळे / भगूर
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव हीच भगूरची खरी ओळख. स्वा. सावरकरांनी येथील ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले, त्या शाळेकडे ऐतिहासिक वारसा म्हणून पाहिले जायला हवे. पण त्याऐवजी सध्या या शाळे भोवतालच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शाळेच्या प्रवेशव्दारालाच सांडपाण्याचा विळखा बसला आहे. लहवितरोडवर जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली ही मराठी शाळा दुरूस्ती अभावी मोडकळीस आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज मेळावा
वार्ताहर / धुळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत येथे ८ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. पारोळा रस्त्यावर डोंगरे महाराजनगरमध्ये हा मेळावा होईल, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रकांत केले यांनी कळविले आहे. पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी कामगार मंत्री डॉ. हेमंत देशमुख असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष हबीब फकी, आ. राजवर्धन कदमबांडे हे उपस्थित असतील. या मेळाव्यास महापौर, नगरसेवक तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

साठेबाज खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित
सटाणा / वार्ताहर
शहरात ज्या दोघा रासायनिक खत विक्रेत्यांनी खतांचा अवैध साठा करून ठेवला होता, त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्यांना येत्या १० तारखेस सुनावणीसाठी नाशिक येथे बोलवण्यात आल्याची माहिती, कृषीविकास अधिकारी अंकुश मोरे यांनी दिली. शिवसेनेचे तालुका प्रमुख जयप्रकाश सोनवणे व शहर प्रमुख संदीप सोनवणे यांनी शिवसैनिकांसह हल्लाबोल करून हे अवैधरित्या साठवून ठेवलेले खतांचे साठे शोधून काढले होते. कृषी अधिकाऱ्यां समक्ष पंचनामे करून उभय व्यापाऱ्यांची गोदामे सील करण्यात आली होते. प्रमोद केव्हे व निलेश कोठावदे यांची गोदामे यात सील झाली होती. या संदर्भात अंकुश मोरे हे चौकशी करीत असून खतविक्रेत्यांची दप्तर तपासणीही सुरू आहे. खताचा साठा, विक्री याबाबत काही गैर आढळल्यास त्यावर सटाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येईल, असे मोरे यांनी सांगितले. त्यानंतर संबंधितांचे खतविक्री परवाने रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान खत विक्रेते जादा भावाने खत विक्री करतात किंवा नाही याबाबत शेतकऱ्यांचे जबाब नोंदविण्याचे कामही सुरू आहे.