Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

उमेदवारीसाठी सर्वच पक्षात ओढाताण

 

विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर भंडारा लोकसभा मतदारसंघात भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर, भंडारा, साकोली, तर गोंदिया जिल्ह्य़ातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा व गोंदिया हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट झाले आहेत. गोंदिया जिल्ह्य़ातील आमगाव विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गेला आहे. भंडारा जिल्ह्य़ातून अडय़ाळ, लाखांदूर, तर गोंदिया जिल्ह्य़ातून गोरेगाव मतदारसंघ संपुष्टात आले आहेत. आमदार बंडूभाऊ सावरबांधे (अडय़ाळ), नानाभाऊ पटोले (लाखांदूर), हेमंत पटले (गोरेगाव) यांना पुनर्रचनेमुळे, तर भंडारा अनुसूचित जातीकरता आरक्षित झाल्यामुळे विद्यमान मंत्री नाना पंचबुद्धे, आमगाव अनुसूचित जातीकरता आरक्षित झाल्यामुळे आमदार भैरसिंह नागपुरे यांची मतदारसंघातून उचलबांगडी झाली.
विधानसभा निवडणुकीत खरी लढत काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच, भाजप-शिवसेना युतीत असून भाकप, बसपा निष्प्रभ दिसत आहेत. पटोले भाजपात गेल्यामुळे निवडणुकीची अनेक समीकरणे बदलली आहेत. कुणबी, तेली, बौद्ध, पोवार अशी जातीय समीकरणेही आकार घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शालेय शिक्षण राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना भंडारा विधानसभा मतदारसंघातून विस्थापित व्हावे लागत आहे. अनुसूचित जातीकरता आरक्षित झालेल्या या मतदारसंघात पवनी तालुक्यातील उमेदवारांचे वजन पुनर्रचनेमुळे वाढणार आहे. भाजप-सेना युतीत त्यामुळे पवनीतून शिवसेनेचे अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांचे नाव समोर आले आहे. भाजपचे रामकुमार गजभिये, गोवर्धन चौबे, माजी आमदार हरीश मोरे, शिवसेनेचे मनोहर खरोले, काँग्रेसचे जिल्हा सचिव प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध श्यामकुवर, मनोज बागडे, विकास राऊत, तर नागपूरचे राजकुमार तिरपुडे अशी नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे भंडाऱ्याचे नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, तुमसरचे प्राचार्य सच्चिदानंद फुलेकर, नरेंद्र भोंडेकर यांचीही नावे आघाडीवर आहेत. हिवराज उके यांच्या नावाची घोषणा भाकपकडून उमेदवार म्हणून झाली आहे.
तुमसर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मधुकर कुकडे यांना चवथ्यांदाही निवडून येण्याची अपेक्षा आहे. खासदार राहिलेले शिशुपाल पटले हेही इच्छुक दिसतात. याशिवाय, भारतीय जनता युवा मोर्चाचे महासचिव राजेंद्र पटले व बसपातून भाजपात आलेले प्रदीप पडोळे हेही रांगेत आहेत. तुमसरची जागा काँग्रेसलाच मिळावी, असा आग्रह असून अनिल बावणकर व शिवकुमार भेलावे इच्छुक आहेत. अ‍ॅड. शिशिर वंजारी यांनीही इच्छा प्रदíशत केली आहे. त्यांच्याकडे वडील माजी आमदार आनंदराव वंजारी यांचा वारसा आहे. आता हा मतदारसंघ पोवारबहुल राहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही जागा आल्यास नाना पंचबुद्धे उमेदवारीत आघाडीवर राहतील.
साकोली या कुणबीबहुल मतदारसंघातून दोनदा निवडून आलेले काँग्रेसचे सेवकभाऊ वाघाये हे तिसऱ्यांदाही प्रबळ दावेदार आहेत. अन्य इच्छुकांमध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यां प्रमिता कुटे, विजय खोब्रागडे, प्रभाकर सपाटे, जगतराम राहांगडाले, सदाशिव वलथरे, माजी आमदार आनंदराव वंजारी हे दिसतात. येथे भाजपचे प्राबल्य आहे. भाजपचे माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, नारायण हटवार, बाळा काशीवार, शिवराम गिऱ्हेपुंजे, वामनराव बेदरे, रेखा भाजीपाले उमेदवारीसाठी आग्रही आहेत. लाखांदूर मतदारसंघ साकोलीत विलीन झाल्यामुळे आता भाजपात आलेले नाना पटोले हे सेवकभाऊ वाघाये यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी ठरू शकतात. काँग्रेस-राष्ट्रवादी युतीत राष्ट्रवादीचे पारडे जड झाले तर भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दामाजी खंडाईत, प्राचार्य हेमराज कापगते यापैकी कुणाची तरी निवड प्रफुल्ल पटेल करू शकतात. भाकपने साकोलीवरून कॉ. चंद्रशेखर टेंभुर्णे यांची उमेदवारी घोषित केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार महादेवराव शिवणकरही निवडणुकीत उडी घेतील, अशी चर्चा आहे.
काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांची गोंदिया मतदारसंघातून जोरात तयारी सुरू आहे. ही जागा भाजप-सेना युतीत शिवसेनेला मिळण्याचे निश्चित असून सेनेचे माजी आमदार रमेश कुथे यांची दावेदारी प्रबळ आहे. अग्रवाल विरोधी नकारात्मक मतांवर त्यांचा डोळा आहे. वर्षांबेन पटेल यांची राष्ट्रवादीकडून वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभेतील प्रफुल्ल पटेल यांना गोंदियात मिळालेली आघाडी त्यांच्या उमेदवारीला प्रेरक ठरू शकते.
३५ वर्षे अनुसूचित जातीेसाठी राखीव असलेला तिरोडा विधानसभा मतदारसंघ आता खुला झाला आहे. तो राष्ट्रवादीच्या कोटय़ात असल्याची चर्चाआहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बन्सोड येथून इच्छुक आहेत. तसेच डॉ. सुशील राहांगडाले, गोंदिया जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश जयस्वाल, राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय राणे, भंडारा जि.प.च्या माजी अध्यक्षा प्रिया हरिणखेडे हेही चर्चेत आहेत. भाजपचे प्रदेश सचिव डॉ. खुशाल बोपचे, गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत पटले, गोंदिया जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन, गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती विजय राहांगडाले इच्छुक दिसतात. हा मतदारसंघ पोवारबहुल आहे.
नव्याने निर्माण झालेल्या अर्जुनी-मोरगाव या मतदारसंघात अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी व गोरेगाव हे मतदारसंघ समाविष्ट झाले आहेत. अनुसूचित जातीकरता हा मतदारसंघ राखीव आहे. येथे माजी आमदार नाना पटोले यांचा वरचष्मा आहे. येथून राष्ट्रवादीचे तिरोडय़ाचे आमदार दिलीप बन्सोड, मीलन राऊत, अभय घरडे, सोनदास गणवीर, मीनाक्षी सांगोळे, यशवंत गणवीर, रत्नदीप दहिवले, राजेश नंदागवळी, किरण कांबळे, विशाखा साखरे तसेच, काँग्रेसचे गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. के.आर. शेंडे, प्रा.पी.एस. डांगे यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपतर्फे लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, डॉ. व्यंकट चौधरी, डॉ. गोविंद मेश्राम ही नावे आघाडीवर आहेत.
वामन तुरिले