Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

नेत्यांपुढे आव्हान उमेदवार निश्चितीचे
लोकसभा निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नागपूरची जागा कायम राखून रामटेकचा गड परत मिळण्यात यश आल्याने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमधील उत्साह द्विगुणित झाला आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर आता विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांऐवजी कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी दुसऱ्या फळीतील नेत्यांनी दंड थोपटले आहेत. याउलट, पराभवाने निराश न होता नव्या जोमाने कामाला लागण्यासाठी भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना ‘एनर्जी डोस’ दिला आहे.

उमेदवारीसाठी सर्वच पक्षात ओढाताण
विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर भंडारा लोकसभा मतदारसंघात भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर, भंडारा, साकोली, तर गोंदिया जिल्ह्य़ातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा व गोंदिया हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट झाले आहेत. गोंदिया जिल्ह्य़ातील आमगाव विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गेला आहे. भंडारा जिल्ह्य़ातून अडय़ाळ, लाखांदूर, तर गोंदिया जिल्ह्य़ातून गोरेगाव मतदारसंघ संपुष्टात आले आहेत. आमदार बंडूभाऊ सावरबांधे (अडय़ाळ), नानाभाऊ पटोले (लाखांदूर), हेमंत पटले (गोरेगाव) यांना पुनर्रचनेमुळे, तर भंडारा अनुसूचित जातीकरता आरक्षित झाल्यामुळे विद्यमान मंत्री नाना पंचबुद्धे, आमगाव अनुसूचित जातीकरता आरक्षित झाल्यामुळे आमदार भैरसिंह नागपुरे यांची मतदारसंघातून उचलबांगडी झाली.

काँग्रेसच्या गोटात आनंदीआनंद !
पुनर्रचनेनंतर गडचिरोली-चिमूर हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्य़ात पसरलेल्या या मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्य़ातील चिमूर,ब्रह्मपुरी व गोंदिया जिल्ह्य़ातील आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. भौगोलिकदृष्टय़ा हा लोकसभा मतदारसंघ मोठा असून येथून काँग्रेसचे मारोतराव कोवासे हे निवडून आले होते. त्यामुळे आता या मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याचा चंग नेत्यांनी बांधला आहे.

सिनेमाची नवी पहाट डिजिटल तंत्रज्ञान
१९ व्या शतकाच्या अखेरीला सिनेमाचा जन्म झाला. विसाव्या शतकात सिनेमाची ‘कले’कडे वाटचाल सुरू झाली. जगभरच्या अनेक दिग्दर्शकांनी अभिजात चित्रपटांना जन्म दिला. १९९५ मध्ये सिनेमा-शोधाला १०० वर्षे पूर्ण होत असताना सिनेमातील डिजिटल क्रांती भारतात आली.
डिजिटल टेक्नॉलॉजी युरोप-अमेरिकेत सुरू झाली होती. भारतात त्याचे दृश्य परिणाम १९९५ च्या आसपास डीव्हीडीमुळे दिसायला लागले. पाठोपाठ डिजिटल कॅमेरे आले. सिनेमा मुळात सेल्युलॉइड प्रतिमा दाखविणारा. डिजिटल कॅमेऱ्याची प्रतिमा ही मॅग्नॅटिक असते. यापाठोपाठ डिजिटल साऊण्ड आला. अनेक चित्रपटगृहांनी डॉल्बी कंपनीची साऊण्ड सिस्टीम बसवून घेतली.
सेल्युलॉइड निगेटिव्ह ही चांदीवर आधारित असते. (म्हणून तर ‘सिल्व्हर स्क्रीन’ शब्द आला.) कोडॅक कंपनी गेली ५० वर्षे चांदीऐवजी वेगळा काही धातू वापरता येईल का यावर संशोधन करीत होती. कोडॅकला त्यात यश आले नाही. एवढय़ात डिजिटल तंत्रज्ञान आले आणि निगेटिव्ह सेल्युलॉइडऐवजी मॅग्नेटिक टेप आली.
डिजिटल तंत्रज्ञान सिनेमातली नवी पहाट ठरली. स्पिलबर्ग व जॉर्ज लुकास यांनी तर जाहीरच केले की आम्ही सेल्युलॉइड निगेटिव्हचा वापर करणार नाही. डिजिटलमुळे स्पेशल इफेक्टस्साठी कॉम्प्युटरचा वापर सुरू झाला. २० व्या शतकाच्या अखेरच्या ५-७ वर्षांत भारतात डिजिटल तंत्रज्ञान झपाटय़ाने आले. त्यामुळे सिनेमानिर्मिती काही प्रमाणात स्वस्त झाली. आता कोणीही सामान्य तरुण हॅण्डीकॅम विकत घेऊन फिल्म चित्रीत करू शकतो. भारतात ९१ नंतर अनेक टेलिव्हिजन चॅनेल्समुळे भारतीय प्रेक्षकांतील टेलिव्हिजनची क्रेझ ओसरली. प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहाकडे वळला, पण थिएटर्स फार वाईट अवस्थेत होती. म्हणून राजश्री पिक्चर्सने मुंबईच्या लिबर्टी थिएटरमध्ये आपला ‘हम आपके है कौन’ (१९९४) हा चित्रपट लावण्यापूर्वी लिबर्टी थिएटर सुशोभित केले. ‘हम आपके’ने उत्पन्नाचे उच्चांक मोडले, हा इतिहास सर्वश्रुतच आहे. पण महत्त्वाचे म्हणजे ‘प्रेक्षक’ पुन्हा चित्रपटगृहाकडे आला. प्रेक्षकांची सिनेमाविषयी नव्याने जागृत झालेली उत्सुकता आणि ‘डीव्हीडी’चे नवे तंत्रज्ञान यामुळे फिल्म सोसायटी चळवळीला पुन्हा बळ लाभले. ३५ एम. एम. फिल्मच्या अवजड पेटय़ा किंवा १६ एमएम छोटय़ा पेटय़ा उचलणे, त्यासाठी चित्रगृह भाडय़ाने घेणे हे सारे बाद झाले. शाळा-कॉलेजच्या हॉलमध्ये पोर्टेबल डीव्हीडी प्रोजेक्टर भाडय़ाने आणला, की फिल्म सोसायटीचे खेळ चटकन आयोजित करता येऊ लागले. डीव्हीडीची इमेज व्हिडीओपेक्षा अधिक चांगली असते. यामुळे बंद पडलेल्या फिल्म सोसायटय़ा पुन्हा जिवंत होऊ लागल्या. काही कार्यकर्ते डीव्हीडीवर कसला चित्रपट पाहायचा, असेही म्हणू लागले. परंतु ज्या विदेशी वकिलातींकडून फिल्म सोसायटय़ांना जगभरच्या चित्रपटांचा पुरवठा होत असे, आजही होतो. त्या वकिलातींनी फेडरेशनला कळविले की, यापुढे ३५/१६ एम. एम. चित्रपट आणणे शक्य होणार नाही. फक्त डीव्हीडीवर चित्रपट उपलब्ध होतील. १९९९ साली देशातल्या सर्व फिल्म सोसायटय़ांची त्रवार्षिक कॉन्फरन्स पुण्यात फिल्म आर्काइव्हमध्ये भरली होती. त्यामध्ये डीव्हीडी तंत्रज्ञानावर चर्चा झाली. त्यानंतर आता सर्वच फिल्म सोसायटय़ांनी डीव्हीडी शो सुरू केल्याने जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी फिल्म सोसायटय़ा सुरू झाल्या. १९८४ ते १९९४ ही दहा वर्षे फिल्म सोसायटय़ांना जिवंत राहण्यासाठी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. नव्या तंत्रज्ञानाने तो अग्नीपरीक्षेचा काळ संपून फिल्म सोसायटी चळवळ नव्या जोमाने उभी राहू लागली. तरुणवर्ग फिल्म सोसायटीच्या कामात रस घेऊ लागला. दहा वर्षांत ढेपाळलेली चळवळ पुन्हा उभी करणे काहीसे अवघड होते; पण अशक्य नव्हते.
सुधीर नांदगांवकर
फेडरेशनचे केंद्रीय सचिव

cinesudhir@gmail.com