Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

प्रवेशासाठी पैसे घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
देहूगाव, ७ ऑगस्ट / वार्ताहर

आकुर्डीतील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी परराज्यातील उच्चभ्रू विद्यार्थ्यांकडून सात लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा देहू रोड पोलिसांनी पर्दाफाश केला. देहू रोड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुपकुमार अशोककुमार सिंग (रा. व्यकंटेशनगर, नागपूर) याच्यासह तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी डॉ. आय. ए. खान (रा. विधीतानगर, जम्मू) यांनी फिर्याद दिली आहे.

दुधात भेसळ करणारी टोळी जेरबंद
पुणे, ७ ऑगस्ट/ खास प्रतिनिधी

भेसळयुक्त दुधाचा पुरवठा करून कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटय़ांमधील पाच हजारांवर रहिवाशांची फसवणूक करणारी आंध्र प्रदेशातील भामटय़ांची मोठी टोळी पोलिसांनी आज पहाटे रंगेहाथ पकडली. त्यांच्याकडून पाच हजार दोनशे लिटर भेसळयुक्त दुधाच्या पिशव्या व भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले. दुधाच्या पिशव्यांमधून काढलेल्या दुधात पाणी मिसळून ते पुन्हा दुसऱ्या जुन्या दुधाच्या पिशव्यांमध्ये भरण्याचा उद्योग ही टोळी गेल्या सहा महिन्यांपासून करीत होती, अशी माहिती गुन्हे विभागाचे उपायुक्त अनिल कुंभारे व सहायक पोलीस आयुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी आज पत्रकारांना दिली.

‘जहांगीर’ प्रकरणी आरोग्य विभागाची सौम्य भूमिका!
पुणे, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

निष्काळजीपणामुळे रिदा शेख हिचा मृत्यू झाल्याने जहांगीर रुग्णालयावर कारवाईची भाषा करणारे आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज मात्र रुग्णालयासंदर्भात बोलताना पुण्यात सौम्य भूमिका घेतली. मुलीला रुग्णालयात मानवी हेतूने दाखल करून तिच्यावर उपचार केले असतील, तर याचा चौकशीत सकारात्मक विचार क रून निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
रिदा शेख हिचा देशातील स्वाइन फ्लूने पहिला बळी गेल्यानंतर पुण्यातील नियंत्रण स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. शिंगणे यांनी आज आरोग्य अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

नव्या फ्लूचा प्रसार आणि लक्षणे
स्वाइन फ्लूविषयी सर्व काही..

या नव्या फ्लूचा विषाणू शरीरात गेल्यापासून १ ते ७ दिवसात आजाराची लक्षणं दिसायला लागतात. लक्षणं दिसण्याआधीच्या २४ तासांपासूनच रुग्णापासून दुसऱ्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या रोगाचा भर, प्रसार रोखणं शक्य होत नाही. रुग्णाचा ताप पूर्ण उतरेपर्यंत दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो. रुग्ण शिंकताना, खोकताना, बोलताना हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. शाळा-कॉलेजातील वर्गात, सिनेमा हॉल यासारख्या गर्दीच्या ठिकाणी हा आजार जास्त वेगानं पसरतो. रुग्णाकडून उत्सर्जित झालेला विषाणू टेबल, शाळेतील बाके, टेलिफोन रिसीव्हर, दाराचे हँडल यासारख्या पृष्ठभागावर ६ ते ८ तास राहतो.

दुरुस्ती चालू असताना लिफ्टमध्ये अडकून तंत्रज्ञ ठार
पुणे, ७ ऑगस्ट/ खास प्रतिनिधी

दुरुस्तीचे काम करताना लिफ्ट आणि डक्टमधील जागेत चिरडल्याने नंदलाल श्रीधर गवळे (वय ३२, किवळे, देहूरोड) हे तंत्रज्ञ आज दुपारी जागीच ठार झाले. सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात आज दुपारी ही दुर्घटना घडली. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, सिम्बायोसिस महाविद्यालयाचे मुलांचे वसतिगृह सेनापती बापट रस्त्यालगत अकरा मजली इमारतीत आहे. या इमारतीची लिफ्ट काल दुपारपासून नादुरुस्त होती.

---------------------------------------------------------------------------

आनंददायी शिक्षण
अभ्यासाला बस, अभ्यास कर असं काही म्हणताच तुमच्यापैकी अनेकांना बहुतेक वेळा कंटाळा येतो. काय ती रोज-रोजची शाळा, अभ्यास, का आई-बाबा आपल्याला त्रास देतात? असे विचार तुमच्यापैकी अनेक बालमित्रमैत्रिणींच्या मनात बऱ्याचदा येत असतील. पण जर तुमचे काही मित्रमैत्रिणी म्हणाले, की आम्हाला अभ्यासाचा अजिबात कंटाळा येत नाही आणि आम्हाला शाळा आणि अभ्यास खूप-खूप आवडतो, तर..आश्चर्य वाटले ना !का बरं हे मित्रमैत्रिणी असे म्हणत असतील असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. पण फार विचार करू नका, हे मित्रमैत्रिणी आहेत महाराष्ट्र विद्या मंडळाच्या सेमी इंग्रजी पूर्व प्रश्नथमिक विभागाचे. या शाळेप्रमाणेच इतर शाळा, त्यातील शिक्षक तुम्हा बालमित्रांचे शिक्षण आनंददायी, सोपे वाटावे म्हणून प्रयत्न करत असतात.

‘गोल्डन लाँज’ स्पेशल
मौज, मजा आणि मस्ती, सुंदर रेस्टॉरंट आणि मोठमोठे मॉल्स अशी ओळख एम. जी. रस्ता म्हणजे कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्त्याची आहे. या रस्त्यावर फिरण्याची मजाच काही और आहे आणि आनंदही निराळा आहे. त्यामुळेच या भागाला विशेष प्रतिष्ठा लाभली आहे. येथील खानपानाची व्यवस्थासुद्धा निराळी आहे. एकेकाळी कॅम्पमधील इराणी हॉटेल्स खूपच प्रसिद्ध होती म्हणजे ती आजही आहेत. यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली असून ती आजही कायम आहे. नाझ, माझरेरिन, कयानी आणि हुसेनी बेकरी ही कॅम्प परिसराची शान आहे. कॅम्प परिसरात म्हणजे एम.जी. रस्त्यावर फिरायला जायचे आहे, असे प्रत्येक पुणेकर मोठय़ा अभिमानाने नेहमीच सांगतो.

‘विद्यार्थ्यांनी नेतृत्वगुणांचा विकास करावा’
पुणे-विद्यार्थ्यांनी अभ्यासा बरोबरच नेतृत्वगुणांचा विकास करावा, असे रोटरी क्लब पुणे सेंट्रलचे अध्यक्ष उद्योजक नीरज हांडा यांनी सांगितले. विष्णूजी शेकूजी सातव विद्यालयात समाजभूषण कै. विठ्ठलराव सातव यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे उपसचिव मा. के. के. निकम, सरपंच जयश्री सातव पाटील, रोटरी क्लब पुणेचे अध्यक्ष आर. सी. जोशी, शिरीष मोहिले, भाई पंडित, सामाजिक कार्यकर्ते संग्राम जाधवराव, राजेंद्र सातव पाटील, वासंती बोर्डे, विजय बोर्डे, प्रश्नचार्य एस. बी. देसाई, निर्मलादेवी सातव आदी उपस्थित होते. वाघेश्वर विद्या विकास ट्रस्टतर्फे इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी व शिष्यवृत्तीप्रश्नप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत विद्यालयाचा रूपेश ठोंबरे हा विद्यार्थी ९५.०७ टक्के गुण मिळवून प्रथम आला.

निसर्ग रक्षाबंधन
पुणे-
सामाजिक वनीकरण विभाग व एम्प्रेस गार्डन यांच्या वतीने ‘एम्प्रेस गार्डन’ येथे राखीपौर्णिमेनिमित्त वनमहोत्सव व वृक्षांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. आंबेडकर मेमोरियल हायस्कूलने भाग घेतला. विद्यार्थिनींनी झाडाची गळालेली पाने, ढोबळी मिरची व सॅलड इ. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून बनविलेल्या नैसर्गिक राखीचे वनखात्याचे संचालक प्रकाश ठोसरे यांनी विशेष कौतुक केले. वृक्षांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम शाळेतही पार पडला. याप्रसंगी इस्कॉनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती
पुणे- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्यामार्फत राज्यातील मातंग समाजातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अण्णा भाऊ साठे यांच्या ८९व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये राज्यात दहावीत सर्वप्रथम आलेली सायली अविनाश भिसे (सातारा), भाग्यश्री बाळासाहेब काळुखे (लातूर), किरण अंबादास गायकवाड (नांदेड), रोहन संजय तुपसुंदर (सोलापूर), किरण नामदेव घोडजकर (नांदेड) आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी : अस्मिता सकटे, संदीप रणदिवे, बाबासाहेब रणदिवे, प्रियंका जगताप, सुजाता सोनटक्के, सुशील वाडेकर, राजेश वाघमारे, नम्रता गायकवाड, संदीप कलवणे, सुमेश पेंटापरती, अश्विनी घडेकर, भाग्यश्री काळुंके, उदयकुमार हणमंते, राहुल कांबळे, बालाजी कांबळे, अनिल भोरे, किरण घोडजकर, विशाल थोरात, अभिजित सरकटे आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

‘स्वाइन फ्लू’विषयी व्याख्यान
पुणे-
सध्या मॉडर्न हायस्कूलच्या वतीने प्रश्नथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थी व पालकांसाठी ‘स्वाइन फ्लू’ या विषयावर भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र खेडेकर यांचे व्याख्यान वारजे माळवाडी येथील शाळेत झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक भगवान दानवे, बंडोपंत चिंतावार होते. या वेळी मुख्याध्यापिका (माध्यमिक) वैदेही शेटे, मुख्याध्यापिका (प्रश्नथमिक) सुनंदा देशपांडे, गौरव दंडवते उपस्थित होते.

रमणबाग प्रशालेत गुणगौरव सोहळा
पुणे- न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागमध्ये शालान्त परीक्षेतील यशवंतांचे कौतुक करण्यासाठी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रशालेच्या शाला समितीचे अध्यक्ष किरण शाळिग्राम प्रमुख पाहुणे होते. प्रशालेने एक नावीन्यपूर्ण प्रथा या वर्षीपासून सुरू केली. ती म्हणजे प्रशालेतील ज्या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रतिकूल आर्थिक, शारीरिक परिस्थितीत उत्तम यश मिळविले, त्यांचाही गौरव करण्यात आला.

---------------------------------------------------------------------------
‘स्वाइन’ आता पोचला सिम्बायोसिस कॉलेजमध्ये
पुणे, ७ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

‘एमआयटी’ च्या माध्यमातून ‘कॉलेज कॅम्पस’वर पोचलेला ‘स्वाइन फ्लू’ ने आज सिम्बायोसिस महाविद्यालयामध्ये अस्तित्व दाखविण्यास प्रश्नरंभ केला. एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून ‘सिम्बायोसिस’च्या नऊ संस्था १३ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी ही माहिती दिली. ‘सिम्बायोसिस’च्या सेनापती बापट रस्त्यावरील मुख्य ‘कॅम्पस’ मध्ये बीसीएस अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीला ‘स्वाइन फ्लू’ची लागण झाली. त्याचप्रमाणे विमाननगर येथील संस्थेत बीबीए अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्यांलाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही कॅम्पसवर एकूण नऊ संस्था कार्यरत असून सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी व प्रश्नध्यापकवर्गाला यापुढील काळात संसर्ग होऊ नये, यासाठी संबंधित कॅम्पसमधील नऊ संस्था १३ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. शहर व परिसरातील आणखी शिक्षणसंस्थांनी वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मर्सिडीज बेंझची आंतरराष्ट्रीय शाळा १९ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सेंट अ‍ॅन्स, हेलेना, बिशप संस्थेच्या तीनही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर व परिसरातील आणखी काही शिक्षणसंस्थांमध्येही ‘स्वाइन फ्लू’ पसरल्याची निराधार चर्चा दिवसभर सुरू होती.

क्रांतिदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
पुणे, ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

राजा-राणी ट्रॅव्हल्सतर्फे ८ व ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनाच्या औचित्याने स्वातंत्रसैनिकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. बालगंधर्व कलादालनात होणाऱ्या या प्रदर्शनात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांची दुर्मिळ छायाचित्रे पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत. राजा-राणी ट्रॅव्हल्सचे नितीन शास्त्री यांनी स्वत: या छायाचित्रांचे विविध संस्थांकडून संकलन केले आहे. या प्रदर्शनात १८५७ ते १९६१ पर्यंतच्या स्वातंत्र्य लढय़ातील संघर्षाच्या विविध छटा पुणेकरांना अनुभवता येणार आहेत. या छायाचित्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्रश्नप्तीच्या ९० वर्षाच्या इतिहासाला उजाळा मिळणार आहे. याच क्रांतिदिनाच्या औचित्याने लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकारी विचारांची साक्ष असलेल्या म्यानमार येथे १४ ऑगस्ट रोजी विशेष सहलही आयोजित करण्यात आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी उभारलेला संघर्ष नागरिकांसमोर आणावा हा या सहलीचा हेतू आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे यांच्या हस्ते या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव यलगी उपस्थित राहणार आहेत. महापौर राजलक्ष्मी भोसले उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

रवींद्र साठे, प्रदीप पटवर्धन, दिलीप प्रभावळकर यांना मराठी नाटय़ परिषदेचे पुरस्कार
पिंपरी, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

रंगभूमीवर उल्लेखनीय कार्य क रणाऱ्या दिवंगत कलाकारांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांना बालगंधर्व पुरस्कार, सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन यांना आचार्य अत्रे पुरस्कार, मिलिंद गुणाजी यांना अरुण सरनाईक पुरस्कार, ज्येष्ठ नाटय़चित्रपट अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जयवंत दळवी, तर मृणाल कुलकर्णी यांना स्मिता पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख अकरा हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उद्या (शनिवार) सायंकाळी सहा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर तसेच मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय काम केलेल्या नवोदित कलावंतांपैकी चिन्मय पाटसकर, अशोक अवचट, राहुल लोहगावकर, शुभांगी दामले यांनाही रोख एक हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्थानिक कलाकार डॉ.मंदार जोगळेकर, अमोल राजगुरू, सुरेश कुलकर्णी, दत्तात्रय उबाळे, गौरी लोंढे यांचाही पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

पालिकेच्या आठ रुग्णालयांत तापाच्या आजारांची तपासणी
िपपरी, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह आकुर्डी, यमुनानगर, भोसरी, सांगवी, जिजामाता, तालेरा आणि थेरगाव या आठ रुग्णालयांत फ्लूसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची प्रश्नथमिक तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांनी दिली आहे. नागरिकांनी परस्पर औंध येथील सवरेपचार रुग्णालयात जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
फ्लूसारखी लक्षणे असणारा रुग्ण, स्वाइन फ्ल्यू रुग्णाच्या संपर्कात आला असल्यास संबंधित रूग्णाने महानगरपालिकेच्या या आठ रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्यावी, असे डॉ. अय्यर यांनी म्हटले आहे. फ्लूसदृश लक्षणांचा त्रास होणाऱ्या रुग्णांनी प्रश्नथमिक उपचार घेऊन सात दिवस पूर्णपणे घरातच राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात आढळून आलेल्या स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या पाच असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांनी पत्रकारांना सांगितले.