Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

रामराव पाटलाच्या जाहीर आवाहनामुळे खळबळ
नाशिक, ७ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

 

राज्यातील अवघ्या पोलीस दलामध्ये कार्यक्षमतेच्या अंगानेप्रतिमा उजळलेल्या नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या लेखी वादग्रस्त घंटागाडी ठेकेदार रामराव तुकाराम पाटील गायब असला तरी याच रामरावने आज स्वखर्चाने अन् स्वत:च्या छबीसह एक ‘जाहीर आवाहन’ प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली. पोलिसांच्या नाकावर टिच्चून करण्यात आलेल्या या आवाहनानुसार, पाटलाने पोलिसात तक्रार दाखल करणाऱ्या कामगार केशव भुक्तरे यांच्यावरील संपूर्ण कर्जाची परतफेड करीत कर्ज खाते बंद केले असून अन्य कर्जदार कामगारांनीही वसुलीच्या नोटिसा निवासस्थानी जमा कराव्यात असेही सुचविले आहे. ज्या कामगारांच्या तक्रारीच्या आधारे संशयिताची शोधाशोध होत आहे त्यानेच जाहिररीत्या आवाहन करीत कामगारांना घरी बोलवावे अन् त्यांची समजूत काढावी. एवढेच नाही तर हा सर्व प्रकार राजरोस व बिनदिक्कत सुरु असल्याने पोलिसांनीच एकप्रकारे संभ्रम निर्माण करण्याची खेळी खेळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
घंटागाडी प्रकरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ामध्ये खऱ्या अर्थाने गंभीर वळणावर येवून दाखल झाले. आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ाला सुरुवात झाली. म्हणजेच या प्रकरणाला जवळपास एक महिना होत असतानाही नाशिक पोलिसांना या प्रकरणाशी संबंधीत तपासाची गती गाठता आलेली नाही. एका बाजूला जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार खात्याच्या मदतीने रामरावच्या सुमारे चार कोटींच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया हाती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. कामगारांच्या नावे कोटय़वधीचे कर्ज प्रकरणे मंजूर करणाऱ्या चंद्रकांत बढे पतसंस्थेच्या तत्परतेविषयी सहकार खात्याकरवी आता कुठेशी पावले उचलली जात आहे. एकप्रकारे सर्वच पातळीवर वेगवान हालचाली सुरु झाल्या असताना पोलीस मात्र या एकूण प्रकाराचे स्थितप्रज्ञाप्रमाणे अवलोकन करीत असल्याचे चित्र आहे. रामरावने आदर्श घंटागाडी प्रकल्प हाती घेतल्यावर त्यासाठी सर्वप्रथम नाशिकची निवड केली असली तरी दिंडोरी तालुक्यातील ज्या तळेगाव शिवारात त्याचा जमीन जुमला आहे तेथे एका शेडमध्ये ट्रॉली बनविण्याचा उद्योग देखील त्याने हाती घेतल्याचे समजते. या प्रकल्पाला िदडोरीवर प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बडय़ा नेत्याने खास भेट दिल्याचीही चर्चा आता दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
रामराव पाटीलने जाहीरपणे कामगारांना केलेले आवाहन त्याने केलेल्या गैरव्यवहाराची साक्ष देण्यास पुरेशी आहे. आदर्श घंटागाडी प्रकल्प या आपल्या संस्थेला दिलेल्या कामासाठी लागणाऱ्या वाहनांची व्यवस्था कामगारांच्या नावे चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेच्या पनवेल शाखेतून कर्ज काढून केल्याचे म्हटले आहे. या माध्यमातून खरेदी केलेल्या ५२ ट्रॅक्टरच्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी आदर्श घंटागाडी प्रकल्प व आपली असल्याचे पाटीलने मान्य केले आहे. याचाच अर्थ या आवाहनाच्या माध्यमातून रामरावने एकप्रकारे आपल्या गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे. आपल्या हितसंबंधांचा वापर करून पाटीलने ज्या कामगारांचा पगार केवळ दोन ते अडीच हजार रूपये इतकाच आहे, त्यांच्या नावावर प्रत्येकी १० ते १२ लाख असे एकूण १० कोटींचे कर्ज उचलण्याची किमया करून दाखविली. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, आजवर फरार असणाऱ्या ‘रामराव’ विरोधात पोलीस यंत्रणा नेमकी कधी कारवाई करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.