Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

राज्यातील धरणे निम्मीच भरल्याने जलसंकट अटळ
पुणे, ७ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

 

पावसाच्या मोसमातील दोन महिन्यांत केवळ काही दिवस हजेरी लावलेल्या पावसामुळे राज्यातील धरणांत आतापर्यंत केवळ ४६ टक्केच पाणीसाठा होऊ शकला असून, ही परिस्थिती जलसंकटाला निमंत्रण देणारी आहे. धरणांमध्ये पिण्यापुरता साठा झाला असला तरी शेतीच्या पाण्याची अवस्था मात्र बिकट आहे. राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत मराठवाडय़ातील धरणांच्या जलसाठय़ाची स्थिती दुष्काळाकडे वाटचाल करणारी आहे.
पावसाच्या राज्यातील आगमनाला यंदा मोठा विलंब झाला. पावसाचे आगमन लांबल्यामुळे धरणातील पाणीसाठय़ावर परिणाम होऊन मुंबई, पुण्यासारख्या मोठय़ा शहरांवर चाळीस टक्क्यांपर्यंत पाणीकपातीची वेळ आली. मात्र जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली आणि धरणाचे जलसाठेही काही प्रमाणात वधारले. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा धरणातील पाणीसाठय़ांची चिंता निर्माण झाली आहे.
यंदाच्या पर्जन्यकाळातील दोन महिने उलटले आहेत. या काळात मराठवाडा वगळता अन्य भागांतील धरणांत बेताचा पाणीसाठा झाला आहे. मात्र ही परिस्थिती अजूनही समाधानकारक नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असला तरी शेतीच्या वर्षभराचे पाणी अजून धरणांत अडायचे आहे. मराठवाडय़ातील धरणांची परिस्थिती चिंताजनक आहे. मराठवाडय़ातील पूर्णा येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, उध्र्व पेनगंगा ही धरणे कोरडी ठणठणीत, तर निम्न तेरणा व मनार धरणात केवळ चार टक्के जलसंचय झाला आहे. राज्यातील सर्वात मोठय़ा जायकवाडी धरणात केवळ १६ टक्के पाणी साठले आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास मराठवाडय़ात दुष्काळ अटळ आहे.
राज्यात कोकणातील धरणांच्या जलसाठय़ाची स्थिती समाधानकारक आहे. कोकणातील धरणांत ८२ टक्के पाणीसाठा आहे. त्याखालोखाल पुणे विभागात ५९ टक्के पाणीसाठा आहे, तर नागपूरमध्ये ४८ टक्के पाणी साठले आहे. नाशिकमध्ये ४० टक्के साठा आणि अमरावती विभागात फक्त २३ टक्के पाणीसाठा झाला आहे. अमरावतीतील बेंबळा, काटेपूर्णा या धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. पेनटाकळी, नळगंगा, पूस व अरुणावती धरणांत तीन ते सात टक्के पाणी आहे. नागपूरमधील रामटेक धरणात १३ टक्के पाणी आहे. पेंच तोतलाडोह, कामठीखैरी, नांद, इटियाडोह, बोर, दिना, बाघ कालिसरार, बाघ पुजारीटोला, असोलामेंढा ही धरणे तीस ते साठ टक्के भरली आहेत.
पुणे विभागातील कोयना धरणात ८१ टक्के पाणीसाठा झाला असल्याने जलविद्युतनिर्मिती थांबण्याचे संकट टळले आहे. उजनी धरण ४० टक्के भरले आहे. पुण्यातील कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे हे धरण अजूनही कोरडे आहे. माणिकडोह, डिंभे, येडगाव, वडज ही धरणेही अद्याप पूर्ण भरलेली नाहीत. पानशेत, वरसगाव या धरणांतही साठ ते सत्तर टक्केच पाणीसाठा झाला आहे. नाशिक विभागातील गिरणा, हातनूर या धरणांच्या जलसाठय़ाची स्थिती बेताचीच आहे.