Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

रेडी बंदराच्या विकासाचे दिवास्वप्नच?
अभिमन्यू लोंढे , सावंतवाडी, ७ ऑगस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांनी सागराचे महत्त्व जाणून सैन्य दलासाठी त्याचा उपयोग केला. त्यानंतर ब्रिटिश, पोर्तुगीज, डच या व्यापारासाठी आलेल्या परप्रांतीयांनी त्याचा उपयोग करून घेतला, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर छत्रपतींचे सागरी आरमार दुर्लक्षित झाले, पर्यायाने लोकशाही स्वीकारल्यानंतर कोकणातील बंदरांची वाट लागली. रेडीच्या बंदराचा विकास करण्याचे निवडणुकीपूर्वीच गाजर दाखविण्यात येत आहे असे बोलले जाते. त्यासाठी एक हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ कि.मी. सागरी किनारपट्टीचे महत्त्व लोकशाहीतील सरकारांनी जाणलेच नाही. त्यामुळे सागरातील दळणवळणाची यंत्रणाच कोलमडली. विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ले, रेडी अशा अनेक बंदरांचा देखभालीअभावी सांगाडाच राहिला.

 


छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरातील धोके जाणून जलदुर्ग हे आरमाराचे केंद्र उभारले. आजही सागरातील अतिक्रमणे आणि भारताच्या सुरक्षेचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणातील छत्रपतींचे आरमार ठरणारे किल्ले व बंदराचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दूरदृष्टीने विचार करायला हवा.
रेडी येथील समुद्रात संशयास्पद मोठे जहाज व त्याच्या शेजारी छोटे जहाज रडार यंत्रणेने टिपले. पण अपुऱ्या यंत्रणेमुळे रेडी पोर्टवरून त्या जहाजापर्यंत पोहोचता आले नाही. देशाच्या सुरक्षततेच्या गप्पा थाटात केल्या जातात, पण सक्षम यंत्रणा उभी करण्यासाठी ठोस कृती किंवा निर्णय होत नाहीत. त्यामुळे सरकार नोकरशाहीच्या हातचे बाहुले बनल्याचा संशय सामान्य जनता व्यक्त करते.
रेडी बंदर छत्रपती, ब्रिटिश काळापासून नावाजलेले आहे. नंतरच्या काळात या बंदराच्या जवळपास तस्करीचे केंद्रही होते. अनेकांना तस्करीमुळे ‘अंदर’ही व्हावे लागले. रेडीत ५० वर्षांच्या मायनिंग उद्योगाचा गाजावाजा केला जातो. मायनिंग उत्पादने चीन किंवा अन्य देशात नेण्यासाठी या बंदराचा उपयोग गेली ५० वर्षे केला जात आहे.
रेडी बंदर विकसित नसले तरी मायनिंग कंपन्यानी आजमितीपर्यंत या बंदराचा उपयोग करून घेतला. या मायिनग कंपन्यांच्या निर्यात मालातून मिळालेल्या करातून एव्हाना रेडी बंदर विकसित झाले असते. पण बंदराच्या विकासाकडे स्वातंत्र्यानंतर जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले.
रेडी पोर्ट विकसित होऊन जलप्रवासी वाहतूक पुनश्च सुरू करावी, अशी जनतेची मागणी आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर हे बंदर ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर विकसित करण्याचा विचार पुढे आला आहे. वास्को (गोवा) येथील बंदराच्या धर्तीवर एक हजार कोटी रुपये गुंतवून बंदर उभारण्याचा मानस व्यक्त केला जात आहे.
सिंधुदुर्गात मायनिंग व औष्णिक प्रकल्पांना विरोध होत असल्याने एक हजार कोटींची गुंतवणूक करणारी कंपनी पुढे येण्याची शक्यता कमीच आहे. कारण हेच उद्योग गुंतवणूक करणाऱ्या कंपनींना फायद्याचे आहे. बंदर सद्यस्थितीत वापरात आहे. त्याच्या मॉडेलची दुरुस्ती किंवा नूतनीकरण झाल्यास त्याचा योग्य पद्धतीने वापर करता येण्यासारखा आहे. रेडी बंदर विकसित झाल्यास सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव (कर्नाटक) आदी भागांतील व्यापाराचे दळणवळणाचे केंद्र म्हणून त्याकडे पाहिले जाईल.