Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

प्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करण्याची सूचना
अलिबाग, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

 

गेली ५३ वष्रे लोंबकळत असलेला महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने समर्थपणे उभे राहून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष किरण ठाकूर यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.
‘कर्नाटक सरकार चले जाव’ असा इशारा देण्यासाठी सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा, या मागणीसाठी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यात जनजागृती करून लोकमताचे पाठबळ उभे करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून समर्थ महाराष्ट्र अभियानाचा प्रारंभ गेल्या ३० जुलै रोजी बेळगाव येथून करण्यात येईल. कोल्हापूर, सातारा, सांगली व पुणे जिल्ह्य़ात तब्बल ६० जाहीर सभांमधून अभियानाची भूमिका स्पष्ट करून हे अभियान गुरुवारी रायगड जिल्ह्य़ात अलिबाग येथे दाखल झाले. त्यावेळी येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीशेजारील पटांगणात आयोजित जाहीर सभेत किरण ठाकूर बोलत होते. अभियानाचे अलिबाग शहराच्या वेशीवर पिंपळभाट येथे अभियानाचे नेते किरण ठाकूर व त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे माजी मंत्री मीनाक्षी पाटील, अलिबागच्या उपनगराध्यक्षा अ‍ॅड. नीलम हजारे, अभिव्यक्ती समर्थनचे जयंत धुळप, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी यांनी स्वागत केले.
मीनाक्षी पाटील यांनी हा प्रश्न राजकीय नसल्याचा दावा केला. यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी दोन महिन्यांत मी महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार आहे. त्यावेळी हा प्रश्न सभागृहात निश्चितपणे मांडून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी अभियानातील नेते बी. वाय. पाटील, अनिल गोमा पाटील यांनीही आपले विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा सुनीता नाईक, वाय. बी. चौगुले, नेताजी मनगुतकर आदी मान्यवर उपस्थित होते. सभेनंतर अलिबाग शहरात जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.