Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

निम्मी सरासरी गाठूनही कोकणात पावसाचा खंड चिंताजनक
खास प्रतिनिधी ,रत्नागिरी, ७ ऑगस्ट

 

यंदाच्या वर्षी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने निम्मी वार्षिक सरासरी गाठली असली, तरी गेले दोन आठवडे पडलेला खंड जिल्ह्यातील पाणीसाठे आणि शेतीच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे.
कोकणात दरवर्षी सरासरी साडेतीन ते चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो, पण यंदा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आलेल्या मान्सूनच्या पावसाने जून महिन्यात फक्त एकदाच जोरदार हजेरी लावली. त्यामुळे त्या महिन्यात गेल्या पाच वर्षांंतील निचांकी सरासरी (३३५.८ मि.मी.) गाठली गेली, पण २ जुलैपासून दमदार पुनरागमन करीत सलग सुमारे १० दिवस झालेल्या धुवाँधार बरसातीने ही कसर भरून काढली. एवढेच नव्हे, तर मागील वर्षी १५ जुलैपर्यंत झालेल्या सरासरी पावसापेक्षाही जास्त मजल गाठली. १८ जुलैपासून मात्र पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले. त्यातल्या त्यात २१ ते २४ जुलै या काळात जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला, पण २५ जुलैपासून महिन्याअखेपर्यंत जिल्ह्यात दररोज सरासरी २५ मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस पडला, तरीही पहिल्या पंधरवडय़ातील वर्षांवाच्या आधारे ३१ जुलैअखेर वार्षिक सरासरीच्या सुमारे निम्मी सरासरी (१८५८.३ मि.मी.) गाठण्यात पावसाने यश मिळविले. गेल्या १ ऑगस्टपासून मात्र जिल्ह्यातील रोजच्या सरासरी पावसाचे प्रमाण १० मिलीमीटरपेक्षाही कमी राहिले आहे. त्यामुळे पाणीसाठे आणि शेतीच्या दृष्टीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पाणीसाठय़ांची पातळी घसरली आहे. खासगी मालकीच्या विहिरींमध्येही पाणी वेगाने कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात जास्त बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.
जिल्ह्यात रखडलेली लावणीची कामे गेल्या महिन्यातील पावसामुळे समाधानकारकपणे पूर्ण झाली, पण त्यानंतर भाताची चांगली वाढ होण्यासाठी दररोज किमान एक-दोन मोठय़ा सरींची आवश्यकता होती. तसे न होता पावसाने अनेक ठिकाणी पाठ फिरविल्यामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने हे चित्र फारसे सुखावह नाही.
गेल्या पाच वर्षांंतील पावसाच्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला तर असे दिसून येते की, २००५ च्या जूनअखेर जिल्ह्यात सरासरी ७८६.५ मिलीमीटर पाऊस पडला होता, पण जुलैअखेर तो २२८१.६ मिलिमीटरवर पोहोचल्याने परिस्थिती चांगली सुधारली. पुढील आठवडाभरात त्यामध्ये आणखी सुमारे तब्बल ५०० मिलीमीटरची भर पडली आणि त्या वर्षी जिल्ह्यात एकूण सरासरी ४००९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात झालेल्या धुवाँधार पावसामुळे २००६ हे वर्ष अनेकांच्या स्मरणात आहे. त्यावर्षी या एकाच आठवडय़ात सरासरी २३३.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ जून महिनाअखेर सरासरी ९०० मि.मी., तर जुलैअखेर २२२२.१ मि.मी. सरासरी गाठत पावसाने आपली घोडदौड कायम राखली. त्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात आणखी सुमारे ३०० मि.मी.ची भर पडली आणि पावसाळा संपताना जिल्ह्यात सरासरी ३९७३.३ मि.मी. असा समाधानकारक पाऊस नोंदविण्यात आला.
पावसाचे हे वेळापत्रक २००७ मध्येही कायम राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्या वर्षी जूनअखेर १२९९.३ मि.मी., जुलैअखेर २२३०.२ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे पाणीसाठे आणि शेतीच्या दृष्टीने समाधानकारक स्थिती झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ाअखेर यामध्ये आणखी सुमारे ४०० मि.मी. पावसाची भर पडली, तर पावसाळा संपताना तीन वर्षांंतील विक्रमी ४१७५.६ मि.मी. पावसाची नोंद लक्षणीय ठरली.
गेल्या वर्षांपासून मात्र हे वेळापत्रक काहीसे विस्कटायला लागल्याचे अनुभवाला येत आहे. २००८ च्या जूनअखेपर्यंत ९६६, तर जुलैअखेर जेमतेम १६८०.९ मि.मी. पाऊस जिल्ह्यामध्ये नोंदला गेला. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ाअखेर ही सरासरी १९८६.७ मि.मी. पर्यंत गेली, पण त्यानंतर मोठा खंड पडला. गणेशोत्सवानंतर सुमारे आठ दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला, पण त्यानंतर तो गायबच झाल्यामुळे त्यावर्षी एकूण सरासरी ३४२१.९ मि.मी.वरच थबकली.
गेल्या पाच वर्षांंतील पावसाचे प्रमाण, तसेच पाणीसाठे व शेतीच्या दृष्टीने निर्णायक जून ते ऑगस्ट या कालावधीतील आवश्यक सातत्य याचा विचार केल्यास गेल्या वर्षीपासून ते बिघडल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचा परिणाम असा झाला की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी एरवी फेब्रुवारी-मार्चनंतर जाणवणारी पाणीटंचाई गेल्या वर्षी जानेवारीअखेरच जाणवू लागली आणि नंतरचे चार महिने तिची तीव्रता वाढत गेली. दोन मोठय़ा पावसांमध्ये पडणारा दीर्घ खंड त्यादृष्टीने चिंताजनक मानला जातो. त्याचबरोबर भात फुलोऱ्यावर येत असताना पुरेसे पाणी मिळाले नाही तर उत्पादनांमध्ये घटही अटळ होणार आहे. ही स्थिती म्हणजे जागतिक पातळीवरील बहुचर्चित हवामान बदलाचा आविष्कार मानायचा की हवामानाचा तात्पुरता लहरीपणा (इरॅटिक बिहॅविअर), याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद होऊ शकतात, पण कोकणच्या दृष्टीने ही स्थिती म्हणजे धोक्याची घंटा आहे, एवढे मात्र निश्चित!