Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

डिंगणी- फुणगूस पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार
संगमेश्वर, ७ ऑगस्ट/ वार्ताहर

 

युती सरकारच्या काळात मंजूर झालेल्या व आघाडी सरकारने निधी न दिल्याने तब्बल १२ वर्षे रखडलेल्या डिंगणी- फुणगूस पुलाचे काम आमदार सुभाष देसाई, विधानसभेचे माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडे, माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या प्रयत्नाने मार्गी लागले. मात्र या तीनही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने आज या पुलाचे उद्घाटन आमदार सुभाष बने यांच्या हस्ते पार पाडल्याने खाडी भागातील शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातला व आपला तीव्र निषेध व्यक्त केला. डिंगणी-फुणगूस पुलाच्या पूर्णत्वाचे संपूर्ण श्रेय शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई यांचे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना पुलाच्या उद्घाटनाचे निमंत्रण केवळ २४ तास आधी दिले. असाच प्रकार आमदार दत्ताजी नलावडे व रवींद्र माने यांच्या बाबतीत घडल्याने या तीनही लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दर्शविला. सार्वजनिक बांधकाम विभागाने छापलेल्या पत्रिकेत पुलाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते केले जाणार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात भुजबळ सोडाच, पण पालकमंत्री तटकरेही उद्घाटन कार्यक्रमास आले नाहीत. एवढय़ावर शहाणपण शिकून उद्घाटन समारंभ रद्द करण्याऐवजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे उद्घाटन करण्याच्या चढाओढीत आज शिवसेना-भाजपा युतीचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात आमदार सुभाष बने यांनी कोणतेही संकेत न पाळता पुलाचे उद्घाटन केल्याने शिवसैनिकांसह खाडी भागातील जनतेने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचा फज्जा उडाला.