Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटन
रत्नागिरी, ७ ऑगस्ट/ वार्ताहर

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दलित, पीडित जनतेच्या विकासासाठी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले असून, त्यांचा शिक्षणविषयक आदर्श नजरेसमोर ठेवून राज्याचा सामाजिक न्याय विभाग काम करीत असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी येथे काढले. या अतिभव्य संकुलातून दलित, पीडित जनतेच्या सर्वागीण विकासाचे कार्य व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव येथे सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन’ तसेच शंभर विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह इमारतीचे उद्घाटन हंडोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे, आमदार उदय सामंत, गणपत कदम, सुभाष बने, भारिप नेते राजेंद्र गवई, नगराध्यक्ष राजेश्वरी शेटय़े आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या संकुलात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी उपस्थित आंबेडकरी जनतेने केली. याप्रसंगी आमदार उदय सामंत, सुभाष बने, गणपत कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या, तर पालकमंत्री सुनील तटकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन व वसतिगृहाच्या इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या संकुलातून समाजातील दलित, पीडित जनतेचा सर्वागीण विकास व्हावा आणि या पीडित जनतेला आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आणण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार व्हावे, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत जिल्हा माहिती अधिकारी पाटोदकर यांनी, तर विभागीय सामाजिक अधिकारी महाजन यांनी आभार मानले.