Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

मार्लेश्वरच्या मूळ देवस्थानातून पुरातन वस्तू गायब
देवरुख, ७ ऑगस्ट/ वार्ताहर

 

ऐन श्रावण महिन्यात संगमेश्वर तालुक्याचे आराध्य दैवत श्री देव मार्लेश्वरचे मूळ देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगवली गावातील मठातच पूजेतील मौल्यवान आणि पुरातन वस्तूंची चोरी झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. चोरटय़ांची मजल थेट आराध्य दैवतापर्यंत पोहोचल्याने भाविकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या चोरीने तालुक्यातील पोलीस यंत्रणेलाही मोठे आव्हान मिळाले असून, ते वेगाने तपास कामाला लागले आहेत, मात्र अद्याप तपासात कोणतेही ठोस धागेदारे हाती आलेले नाहीत.
देवरुखनजीकच्या आंगवली गावातील मठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्लेश्वर मंदिरात बुधवारी चोरी झाल्याचे पुजारी विष्णू जंगम यांच्या लक्षात आले. नेहमीप्रमाणे सकाळी पूजेसाठी ते गेले असता देव्हाऱ्याला कुलूपच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मठातील श्री देव मार्लेश्वर (शंकर) पिंडीवरील चांदीचा टोप, चांदीचा तीन किलो वजनाचा नाग यांसह सोन्या-चांदीच्या आणि पितळेच्या पुण्यातील पुरातन मूर्ती, पादुका, बेलपान, दिंडी कळस अशा अनेक वस्तू लंपास झाल्याचे स्पष्ट झाले. मार्लेश्वर हे जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. ऐन श्रावणात शंकर भक्तांची मार्लेश्वर-आंगवली मठात मोठी रेलचेल असते. अशा भाविक वातावरणात मंदिरात चोरी झाल्याने संताप व्यक्त होत आहे.