Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

ग्राम स्वातंत्र्याच्या मागणीसाठी संघर्ष समितीचा रास्ता रोको
गुजरात महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प
ठाणे, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

 

वसई-विरार महापालिकेतून ५३ गावे वगळण्याच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीय गाव वाचवा संघर्ष समितीच्या वतीने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा, शिरसाड व चिंचोटी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. श्रमजीवी संघटनेसह विविध राजकीय पक्षांचे हजारो कार्यकर्ते महामार्गावर उतरल्याने सुमारे तीन ते चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
वसई तालुक्यातील ४९ गावच्या ग्रामस्थांनी महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध करणारे ग्रामसभांचे ठराव मंजूर करून ते शासनाकडे पाठविले होते, परंतु ते डावलून राज्य सरकारने दि. ३ जुलै २००९ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत या गावांचाही महापालिकेत समाविष्ट केला. त्याविरुद्ध विविध मार्गाने आंदोलने सुरू झाली असून, त्याचा भाग म्हणून आजचा रास्ता रोको करण्यात आला, असे संघर्ष समितीच्या निमंत्रक डॉमनिका डाबरे यांनी सांगितले.
श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित, काँग्रेस अध्यक्ष मायकेल फुटर्य़ाडो, तसेच मनवेल तुस्कानो, शाम पाटकर, सुरेश जोशी, जगदीश धोडी, विलास विचारे, प्रफुल्ल ठाकूर, मिलिंद खानोलकर, केदारनाथ म्हात्रे, विनायक निकम, शिरीष चव्हाण, विजय मचॅडो, सुरेश रेंजड, ईश्वर धुळे, सुखदेव खैरनार आदी सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोकोचे नेतृत्व केले.
विविध मार्गाने सातत्यपूर्ण आंदोलने करूनही राज्य सरकार सामान्य जनतेचे ऐकणारच नसेल तर एक दिवस नाइलाजाने लोकांना कायदा हाती घ्यावा लागेल, असा इशारा या प्रसंगी केलेल्या भाषणात सर्वच नेत्यांनी दिला.