Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

अलिबागमध्ये आज तबलावादन आणि गायनाची मैफल
अलिबाग, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

 

विख्यात तबलावादक पं. भाई गायतोंडे यांचे शिष्य सुनील जायफळकर यांचे सोलो तबलावादन आणि येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका शीतल कुंटे यांचे गायन अशा शानदार संगीत मैफलीचे आयोजन शनिवार, ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता सरखेल कान्होजीराजे आंग्रे वसाहतीतील जयंतराव टिपरे सभागृहात ‘मैफील, अलिबाग’ या संस्थेच्या वतीने करण्यात आले आह़े
गेली काही वष्रे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नामवंत कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करून अलिबागकर रसिकांना दर्जेदार संगीताचा अनुभव देणाऱ्या या संस्थेने यावेळेस खास रसिकाग्रहास्तव हा कार्यक्रम आयोजित करून स्थानिक, तसेच नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे ठरविले आह़े यात तबलावादन सादर करणारे सुनील जायफळकर हे गेली २० वष्रे विख्यात तबलावादक पं़ भाई गायतोंडे यांच्याकडे तालीम घेत आहेत़ देशविदेशातील विविध कार्यक्रमांत आघाडीच्या कलाकारांना साथ करणाऱ्या या गुणी कलाकाराने स्वतंत्र तबलावादनानेही रसिकांची दाद मिळविली आह़े
मैफिलीतील दुसऱ्या कलाकार संगीत विशारद शीतल कुंटे या आपल्या सुरेल व तडफदार गायकीसाठी अलिबागकर रसिकांना परिचित आहेत़ इचलकरंजी येथील सुप्रसिद्ध गायक शेंडेबुवा, तसेच ए़ आऱ पांगारकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर शीतल कुंटे यांनी बुजुर्ग कलाकार काणेबुवा व शुभदा पराडकर यांच्याकडे गायनाची तालीम प्राप्त केली आह़े सध्या शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक म्हणून परिचित असलेल्या डॉ़ शिल्पा बहुलेकर यांच्याकडे त्या संगीत अलंकार पदवीसाठी मार्गदर्शन घेत आहेत़ अलिबाग परिसरातील विविध संस्थांमध्ये गायनाचे रंजक कार्यक्रम सादर करणाऱ्या शीतल कुंटे आपल्या गायन वर्गाच्या माध्यमातून गेली काही वष्रे होतकरू गायक गायिकांना मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत़ त्यांनी लिटिल चॅम्प्स मुग्धा वैशंपायन हीस शास्त्रीय गायनाचे प्राथमिक धडे दिले असून, अलिबाग आयडॉल व स्वरमल्हार पुरस्कार मिळविणारा अनुराग गोडबोले, प्रशांत दामले फाऊंडेशन पुरस्कारप्राप्त कस्तुरी देशपांडे, मुंबईमध्ये शास्त्रीय गायनात करियर करणारा अक्षय भुस्कुटे ही त्यांच्या शिष्यवर्गापैकी काही निवडक नावे आहेत़
या कार्यक्रमात थळ येथील सुपरिचित तबलावादक संजय कवळे व पेणचे सुप्रसिद्ध कलाकार नित्यनाथ आठवले यांची साथसंगत दोन्ही कलाकारांना लाभणार आहे. तसेच शीतल कुंटे यांच्या शिष्या मधुरा मुटाटकर व मुग्धा पाटील या स्वरसाथ करणार आहेत़ कार्यक्रमास रसिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आह़े