Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘लोकसत्ते’चा ‘यशस्वी भव!’ उपक्रम स्तुत्य- भालेराव
सटाणा, ७ ऑगस्ट / वार्ताहर

 

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दै. लोकसत्ताने सुरू केलेला ‘यशस्वी भव !’ हा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी योग्य मार्गदर्शन लाभणार असल्याचे प्रतिपादन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी ई. जी. भालेराव यांनी केले. कळवण येथे प्रकल्प कार्यालयात आयोजित शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी लोकसत्ताचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक सुरेश बोडस, विशेष प्रतिनिधी जयप्रकाश पवार, सहाय्यक वितरण व्यवस्थापक वंदन चंद्रात्रे व वितरण प्रतिनिधी संदीप खोले उपस्थित होते. यावेळी भालेराव यांनी आदिवासी आश्रमशाळांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. या विभागातील १८ शासकीय आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला असून मुख्याध्यापक व शिक्षक जबाबदारीने ज्ञानदानाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांना आता एक संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा ते निश्चित उपयोग करून घेतील. या उपक्रमामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांत शालांत परीक्षेचा निकाल गतवर्षीपेक्षा उत्कृष्ट लागेल, असा विश्वास भालेराव यांनी व्यक्त केला. यावेळी वंदन चंद्रात्रे यांनी उपस्थितांना ‘यशस्वी भव !’ उपक्रमाची माहिती दिली. आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी या उपक्रमाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेतला तर शहरी भागातील शाळांप्रमाणे आदिवासी भागातील विद्यार्थीही शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकतील, असे सांगितले. मुंबई येथील शांतीलाल संघवी फाऊंडेशनचे गायकवाड यांनी लोकसत्ताच्या या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम दहावीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे, शिवाय वृत्तपत्रातील बातम्यांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी या माध्यमातून जगापर्यंत पोहोचू शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमातून आदिवासी भागात लोकसत्ताने ज्ञानाचे एक दालन उघडून दिले असल्याचे ते म्हणाले. बैठकीत मालेगाव, चांदवड, बागलाण, कळवण, सुरगाणा, नांदगाव तालुक्यातील आश्रमशाळांचे मुख्याध्यापक सहभागी झाले होते. प्रास्तविक बागूल यांनी केले तर चंद्रात्रे यांनी आभार मानले.