Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

मराठी मालिकांमध्ये प्रेमकथेकडे दुर्लक्ष- महेश कोठारे
नाशिक, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

मराठी मालिकांमध्ये प्रेमकथांना फारसे स्थान देण्यात येत नसल्याबद्दल खंत व्यक्त करून ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिका ती उणीव भरून काढेल, असा विश्वास व्यक्त केला. रसिकांच्या प्रतिसादामुळे मालिका ५०० भागापर्यंत नक्कीच मजल मारेल, असेही ते म्हणाले. ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेची माहिती देण्यासाठी येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालिकेची कहाणी गौरी, निखील आणि नीरजा यांच्याभोवती फिरते. मालिकेत नवोदित चेहऱ्यांना प्राधान्य दिले असून त्यांची प्रचंड मेहनत करण्याची तयारी आहे. रूपेरी पडद्यावरून छोटय़ा पडद्याकडे आलो हा सुखद अनुभव होता. अडीच तास एकाजागी बसल्याशिवाय चित्रपटाचा आनंद घेता येत नाही. मात्र मालिका सुरू असतांना प्रेक्षकांसमोर अनेक पर्याय खुले असतात. त्यामुळे प्रेक्षकाला मालिकेशी समरूप करणे अधिक कठीण असते, असेही कोठारे म्हणाले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दहा भागांनी वेग पकडला असला तरी हा वेग पुढील भागातही कायम राहावा हे आव्हान वाटते. लक्ष्मीकांत बेर्डे यांची उणीव आपल्याला नेहमीच भासते. आज जर ते जिवंत असते तर या मालिकेत त्यांची स्वतची वेगळी भूमिका निश्चितपणे असती, असेही ते म्हणाले. आपली कुणाशीही स्पर्धा नाही. मी स्वतलाच स्वतचा स्पर्धक मानतो. रसिकांना माझ्याकडून जास्तीजास्त चांगले देण्याचा माझा प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले. मालिकेतील बहुतांशी भाग कोल्हापूर येथे चित्रित झाल्याचे त्यांनी सांगितले.
वर्षां उसगांवकर यांनी मालिकेत आपण प्रथमच आईच्या भूमिकेत असल्याचे सांगितले. आईची भूमिका असली तरी त्याला ग्लॅमरस टच आहे. मालिकेने आपले मराठमोळेपण जपलेले असून मालिका ही एक खिडकी आहे. जिच्या माध्यमातून आमच्या विचारांचे आदान प्रदान होत असते, असेही त्या म्हणाल्या. यावेळी मालिकेतील प्रमुख कलाकार नेहा गद्रे, कश्यप परूळेकर, आणि निशा शाह उपस्थित होते.
आगामी काळात आपला ‘सख्या रे’ हा प्रेमपट पडद्यावर येणार असून त्यामध्ये आदिनाथ कोठारे आणि वैदेही परशुराम ही जोडी चमकणार असल्याचेही कोठारे यांनी सांगितले.