Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

खान्देशच्या सिंचनप्रश्नी पॅकेजमध्ये तरतूद- दिलीप वळसे पाटील
अमळनेर, ७ ऑगस्ट / वार्ताहर

 

निवडणुका जवळ आल्यावर अनेक हौशे, गवशे, नवशे बाहेर येतात. कुणी मंदिरांना देणग्या देतो, कुणी आणखी काही तरी करतो, पण हे सर्व आयुष्याला पुरणार आहे का, असा सवाल अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. खान्देशच्या सिंचन प्रश्नी अर्थसंकल्पात तरतूद तर केली आहेच, शिवाय खान्देश पॅकेजमध्येही निधी दिला असून त्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, याची ग्वाहीही वळसे पाटील यांनी दिली.
उत्तर महाराष्ट्र विकास मंच व लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठानच्या वतीने येथे आयोजित नागरी सत्कारात ते बोलत होते. पाडळसे धरणासाठी अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद केली. त्यानंतर अलिकडेच नाशिक येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खान्देश पॅकेजमध्येही ७५ कोटींची तरतूद करण्यात आली, असेही ते म्हणाले.
शासनात केवळ पदे महत्वाची नसतात तर त्या माध्यमातून प्रश्न सोडविणे महत्वाचे असते. आघाडी सरकारने कामे पुष्कळ केली, परंतु लोकांपर्यंत जाऊन सांगण्यास आम्ही कमी पडलो. वीज निर्मिती, उच्च तंत्रशिक्षण, सोयी, सवलती शिक्षणाचे सार्वत्रिकरण या मुद्यांनाही त्यांनी स्पर्श केला.
व्यासपीठावर झालेली गर्दी व गडबड पाहून नेते मंडळींना त्यांनी कानपिचक्या दिल्या. गडबड ही खाली नसते तर व्यासपीठावरच असते. ही गडबड थांबवून सर्वानी एकत्र आल्यास जळगाव जिल्हा आघाडीचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा योगायोगाने सरकार आले, आणि अर्थमंत्री झालो तर जिल्ह्य़ातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.