Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

राज्य

रामराव पाटलाच्या जाहीर आवाहनामुळे खळबळ
नाशिक, ७ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

राज्यातील अवघ्या पोलीस दलामध्ये कार्यक्षमतेच्या अंगानेप्रतिमा उजळलेल्या नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या लेखी वादग्रस्त घंटागाडी ठेकेदार रामराव तुकाराम पाटील गायब असला तरी याच रामरावने आज स्वखर्चाने अन् स्वत:च्या छबीसह एक ‘जाहीर आवाहन’ प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली.

राज्यातील धरणे निम्मीच भरल्याने जलसंकट अटळ
पुणे, ७ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

पावसाच्या मोसमातील दोन महिन्यांत केवळ काही दिवस हजेरी लावलेल्या पावसामुळे राज्यातील धरणांत आतापर्यंत केवळ ४६ टक्केच पाणीसाठा होऊ शकला असून, ही परिस्थिती जलसंकटाला निमंत्रण देणारी आहे. धरणांमध्ये पिण्यापुरता साठा झाला असला तरी शेतीच्या पाण्याची अवस्था मात्र बिकट आहे. राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत मराठवाडय़ातील धरणांच्या जलसाठय़ाची स्थिती दुष्काळाकडे वाटचाल करणारी आहे.

रेडी बंदराच्या विकासाचे दिवास्वप्नच?
अभिमन्यू लोंढे , सावंतवाडी, ७ ऑगस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांनी सागराचे महत्त्व जाणून सैन्य दलासाठी त्याचा उपयोग केला. त्यानंतर ब्रिटिश, पोर्तुगीज, डच या व्यापारासाठी आलेल्या परप्रांतीयांनी त्याचा उपयोग करून घेतला, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर छत्रपतींचे सागरी आरमार दुर्लक्षित झाले, पर्यायाने लोकशाही स्वीकारल्यानंतर कोकणातील बंदरांची वाट लागली. रेडीच्या बंदराचा विकास करण्याचे निवडणुकीपूर्वीच गाजर दाखविण्यात येत आहे असे बोलले जाते.

प्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करण्याची सूचना
अलिबाग, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी

गेली ५३ वष्रे लोंबकळत असलेला महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने समर्थपणे उभे राहून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष किरण ठाकूर यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली. ‘कर्नाटक सरकार चले जाव’ असा इशारा देण्यासाठी सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा,

‘लोकसत्ते’चा ‘यशस्वी भव!’ उपक्रम स्तुत्य- भालेराव
सटाणा, ७ ऑगस्ट / वार्ताहर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दै. लोकसत्ताने सुरू केलेला ‘यशस्वी भव !’ हा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी योग्य मार्गदर्शन लाभणार असल्याचे प्रतिपादन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी ई. जी. भालेराव यांनी केले. कळवण येथे प्रकल्प कार्यालयात आयोजित शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी लोकसत्ताचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक सुरेश बोडस, विशेष प्रतिनिधी जयप्रकाश पवार, सहाय्यक वितरण व्यवस्थापक वंदन चंद्रात्रे व वितरण प्रतिनिधी संदीप खोले उपस्थित होते. यावेळी भालेराव यांनी आदिवासी आश्रमशाळांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.

मराठी मालिकांमध्ये प्रेमकथेकडे दुर्लक्ष- महेश कोठारे
नाशिक, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी
मराठी मालिकांमध्ये प्रेमकथांना फारसे स्थान देण्यात येत नसल्याबद्दल खंत व्यक्त करून ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिका ती उणीव भरून काढेल, असा विश्वास व्यक्त केला. रसिकांच्या प्रतिसादामुळे मालिका ५०० भागापर्यंत नक्कीच मजल मारेल, असेही ते म्हणाले. ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेची माहिती देण्यासाठी येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालिकेची कहाणी गौरी, निखील आणि नीरजा यांच्याभोवती फिरते. मालिकेत नवोदित चेहऱ्यांना प्राधान्य दिले असून त्यांची प्रचंड मेहनत करण्याची तयारी आहे.

ग्राम स्वातंत्र्याच्या मागणीसाठी संघर्ष समितीचा रास्ता रोको
गुजरात महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प
ठाणे, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी
वसई-विरार महापालिकेतून ५३ गावे वगळण्याच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीय गाव वाचवा संघर्ष समितीच्या वतीने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा, शिरसाड व चिंचोटी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. श्रमजीवी संघटनेसह विविध राजकीय पक्षांचे हजारो कार्यकर्ते महामार्गावर उतरल्याने सुमारे तीन ते चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वसई तालुक्यातील ४९ गावच्या ग्रामस्थांनी महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध करणारे ग्रामसभांचे ठराव मंजूर करून ते शासनाकडे पाठविले होते,

प्रस्तावित टाटा-रिलायन्स औष्णिक वीज प्रकल्प
पुनर्वसन प्राधिकारणाची अंतिम मंजुरी नाही
अलिबाग, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड आदी नऊ गावांच्या क्षेत्रावर टाटा-रिलायन्सचे औष्णिक वीज प्रकल्प होणे अद्याप निश्चित झाले नसल्याने, या प्रस्तावित प्रकल्पांना पुनर्वसन प्राधिकरणाने अंतिम मंजुरी दिलेली नाही, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक सतीश लोंढे यांनी दिली आहे.

‘बोर्डा’ची पुरवणी नव्हे, ऑक्टोबर परीक्षाच होणार!
पुणे, ७ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

‘एटीकेटी’च्या प्रस्तावाला मुंबई उच्च न्यायालयात चपराक बसल्यानंतर आता पुरवणी परीक्षेच्या मुद्दय़ावरूनही राज्य शासनाला माघार घ्यावी लागली आहे. यंदा पुरवणी परीक्षा होणार नसून नेहमीप्रमाणे ‘ऑक्टोबर परीक्षा’च घेतली जाणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ‘ऑक्टोबर परीक्षा’ सप्टेंबरमध्ये होणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव तुकाराम सुपे यांनी ‘ऑक्टोबर परीक्षे’चे वेळापत्रक जाहीर केले. गेल्या वर्षी राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेमुळे ऑक्टोबरची परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात आली. यंदा ऑक्टोबरमध्ये होणारी संभाव्य विधानसभा निवडणूक, दिवाळीची सुटी आदी कारणांमुळे ही परीक्षा सप्टेंबरमध्येच घेतली जात आहे.
(वेळापत्रक पुढीलप्रमाणे )- दहावीची परीक्षा - लेखी - १५ ते ३० सप्टेंबर. प्रात्यक्षिक - शास्त्र विषयाच्या लेखी परीक्षेच्या कालावधीमध्ये. तोंडी व श्रेणी परीक्षा - ८ ते १४ सप्टेंबर.
बारावीची परीक्षा - लेखी परीक्षा - १५ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर. तोंडी व श्रेणी परीक्षा - ८ ते १४ सप्टेंबर.

रामचंद्र कदम यांचे निधन
चिपळूण, ७ ऑगस्ट/ वार्ताहर
खेड खालची हुंबरी येथील रामचंद्र कदम यांचे अलीकडेच निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. भाऊ नावाने सुपरिचित असणाऱ्या कदमांची गरिबांचे अन्नदाता म्हणून पंचक्रोशीत ख्याती होती. राहत्या घरी किराणा मालाचे दुकान चालवितानाच त्यांनी फलोत्पादन तसेच शेतीपूरक उद्योगातून व्यवसाय वाढविला. शेतकऱ्ऱ्यांनी मनिऑर्डरवर अवलंवून न राहता स्वकष्टाने स्वावलंबी कसे व्हावे, याचा वस्तुपाठच त्यांनी त्यांच्या वागणुकीतून जनतेपुढे ठेवला. व्यसनमुक्ती चळवळीतही ते सक्रीय होते. गोरगरिबांना ते सदैव मदत करीत होते. रसाळगड आणि दहागाव ग्रामदैवत झोलाई मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ब्राइट किडस् अ‍ॅकॅडमीचा वर्धापनदिन साजरा
खास प्रतिनिधी ,रत्नागिरी, ७ ऑगस्ट

येथील ब्राइट किडस् अ‍ॅकॅडमी या संस्थेचा दुसरा वर्धापनदिन मुलांनीच आयोजित केलेल्या गमतीदार खेळांनी साजरा करण्यात आला. गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या अ‍ॅबॅकस स्पर्धेत अ‍ॅकॅडमीचे ३२ विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्वानी गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले. त्यांचा गौरव करताना अ‍ॅकॅडमीच्या संचालक सई साने यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे येथील सारस्वत बँकेच्या शाखेत खाते उघडण्यात आल्याचे जाहीर केले. येत्या डिसेंबरमध्ये पेनांग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुलांनीच केले. त्यामध्ये प्रमुख पाहुणे, भाषणे अशा औपचारिक प्रकारांना फाटा देऊन मेंदीचा स्टॉल, खाऊचा स्टॉल, लकी ड्रॉ आणि इतर विविध गमतीदार खेळ आयोजित करण्यात आले.
त्यामुळे मुलांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची भरपूर मोज लुटली. अ‍ॅकॅडमीच्या संचालिका साने यांच्यासह सायली चिवटे, मानसी सुर्वे, रचना महाडिक आणि सारस्वत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी विशेष कष्ट घेतले.

सहा आसनी रिक्षाचालकांचा बंद
डहाणू, ७ ऑगस्ट/ वार्ताहर
डहाणू तालुक्यात दहा आसनी मॅजिक रिक्षांना वाहतुकीचा परवाना देण्याचे सरकारने निश्चित केल्याच्या निषेधार्थ सहा आसनी रिक्षाचालक-मालक संघटनांनी आज सर्व रिक्षा बंद ठेवल्या होत्या. मात्र एस.टी.च्या जादा गाडय़ा सोडण्यात आल्याने आणि तीन आसनी रिक्षावाल्यांनी आजच्या बंदमध्ये भाग न घेतल्याने प्रवाशांची फारशी गैरसोय झाली नाही. नव्याने बाजारात आलेल्या चारचाकी दहा आसनी रिक्षांना प्रवासी वाहतुकीसाठी परवाना देण्याचे आघाडी सरकारने ठरविल्याने त्या रस्त्यावर धावू लागल्यास १४-१५ प्रवासी भरले जाणार असल्याने त्याचा फटका सहा आसनी रिक्षांना बसणार आहे. त्यामुळे साहजिकच बँकांची कर्जे काढून घेतलेल्या रिक्षांचे हप्ते भरता येणार नाहीत, शिवाय पोटही भरता येणार नाही, अशी भावना सहा आसनी रिक्षा चालक-मालक संघटनेची झालेली आहे. त्यामुळे सरकारने नव्याने बाजारात आलेल्या दहा आसनी रिक्षांना परवाना देऊ नये, या मागणीसाठी सहा आसनी रिक्षांनी आज बंद पाळला होता. डहाणू ते चारोटी, कासा, आंबेसरी, सायवन, घोलवड, वाणगांव, चिंचणी, डहाणूखाडी येथील रस्त्यावर धावणाऱ्या सहा आसनी रिक्षा पूर्णपणे दिवसभर बंद होत्या. डहाणू शहरात मात्र तीन आसनी रिक्षा नेहमीप्रमाणे सुरू होत्या. त्यातच डहाणू आणि बोईसर एस.टी. आगारांनी नेहमीपेक्षा जादा गाडय़ा सोडल्या, त्यामुळे प्रवाशांवर फारसा परिणाम झाला नाही.

ओंकारतर्फे गणेशमूर्तीचे प्रदर्शन
कर्जत, ७ ऑगस्ट/ वार्ताहर

यंदाही ओंकार कला मंदिराच्या वतीने पत्रकार विजय मांडे यांनी गणेशमूर्तीच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे यंदाचे हे सव्विसावे वर्ष असून, पहिल्याच दिवसापासून या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या श्री धापया देवस्थानच्या सभागृहामध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जतचे नगराध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले. उपनगराध्यक्षा अस्मिता मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष भोईर, पक्षाच्या सहकार विभागाचे अध्यक्ष सीताराम मंडावळे, धापया देवस्थान समितीचे अध्यक्ष किशोर आणेकर, श्री कपालेश्वर देवस्थान समितीचे खजिनदार महेंद्र बोडके तसेच राजाभाऊ गोगटे, अनिल मोरे, तानाजी बैलमारे, सुनील दांडेकर आदी विविध संस्थांचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.