Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

क्रीडा

इंग्लंडचा १०२ धावांत खुर्दा
ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवशी ९४ धावांची आघाडी

हेडिंग्ले, ७ ऑगस्ट / वृत्तसंस्था
येथील चौथ्या अ‍ॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंड संघाला उपाहारानंतर तासाभराच्या खेळात १०२ धावांतच गुंडाळून सनसनाटी सुरुवात केली आहे. अ‍ॅलिस्टर कुक (३०) आणि मॅट प्रायर (नाबाद ३७) यांचा अपवाद वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावा करता आल्या नाहीत. कर्णधार स्ट्रॉसचा बळी मिळवून इंग्लंडच्या डावाला सुरुंग लावणाऱ्या पीटर सिडलने नंतर त्यांच्या शेपटाला वळवळण्याची संधी न देता २१ धावांत ५ बळी, अशी संस्मरणीय कामगिरी करून इंग्लंडला १०२ धावांत गुंडाळण्याची करामत केली.

अ‍ॅशेसची सर विश्वचषकालाही नाही- फ्लिन्टॉफ
लीड्स, ७ ऑगस्ट/वृत्तसंस्था

इंग्लंडच्या कोणत्याही क्रिकेटपटूसाठी अ‍ॅशेस मालिका ही सर्वात महत्त्वाची आहे. अ‍ॅशेस मालिकेची सर आयपीएल किंवा विश्वचषक स्पर्धेला येणार नाही, असे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँड्रय़ू फ्लिन्टॉफ याने म्हटले आहे. अ‍ॅशेस मालिकेचे महत्त्व इंग्लंडच्या क्रिकेटपटूंसाठी अनन्यसाधारण असे आहे. अन्य खेळाडूंसाठी विश्वचषक, आयपीएल स्पर्धा महत्त्वाच्या असतील, पण अ‍ॅशेस मालिकेत खेळणे हे इंग्लंडच्या प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते,

या वर्षांच्या अखेरीपर्यंत झहीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकणार
मुंबई, ७ ऑगस्ट/ क्री. प्र.

खांद्याच्या दुखापतीमुळे भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान याला या वर्षीच्या अखेरीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकावे लागणार आहे. या बातमीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून झहीर चॅम्पियन्स ट्रॉफीसहीत अन्य चार महत्त्वाच्या मालिकेमध्ये खेळू शकणार नाही. बीसीसीआयचे सचिव एन. श्रीनिवासन यांनी आज सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत आयपीएलच्या दुसऱ्या सत्रामध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना झहीरला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली होती.

संघातील प्रत्येक खेळाडूशी बट्ट संवाद साधणार
कराची, ७ ऑगस्ट / वृत्तसंस्था

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवाला पाकिस्तान संघातील बेबनाव जबाबदार असल्याच्या चालू असलेल्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एजाझ बट्ट हे प्रत्येक खेळाडूशी वैयक्तिकरीत्या संवाद साधणार आहेत. पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धची कसोटी आणि एकदिवसीय मालिकाही गमवावी लागली आहे.

लंकादहन करण्याचा व्हेटोरीचा निर्धार
कोलंबो, ७ ऑगस्ट/ पीटीआय

डॅनियल व्हेटोरीच्या कप्तानीखाली न्यूझीलंडचा संघ सहा आठवडय़ांसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आला असून यावेळी फॉर्मात असलेल्या लंकेचे दहन करण्याचा त्याने निर्धार केला आहे. सुरूवातीला न्यूझीलंडचा संघ काही सराव सामने खेळणार असून त्यानंतर १८ ऑगस्टला गॉल येथे त्यांचा पहिला कसोटी सामना होणार आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा संघ मायदेशात भारताविरूद्ध कसोटी सामना खेळला होता.

पराभवाला मी एकटा जबाबदार नाही- युनूस खान
कराची, ७ ऑगस्ट/ वृत्तसंस्था

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवाला संपूर्ण संघ जबाबदार आहे, मी एकटा नाही, असे म्हणत पाकिस्तानचा कर्णधार युनूस खान याने आपल्यावरील टीकेचा रोख अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत युनूस खान याने म्हटले आहे की, श्रीलंकेविरुद्धच्या खराब कामगिरीला मी एकटा जबाबदार नाही. संघाच्या अपयशाची जबाबदारी सर्व खेळाडूंवर आहे.

पाकिस्तानच्या पराभवाचा उपवास संपला
कोलंबो, ७ ऑगस्ट/ वृत्तसंस्था

श्रीलंकेच्या दौऱ्यातील येथे झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने १४६ धावांनी दणदणीत विजय मिळवित पराभवाचा उपवास संपवला आहे. यापूर्वी झालेल्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला एकही विजय मिळविता आला नव्हता. फलंदाजीमध्ये शतकवीर युवा उमर अकमलच्या आक्रमक फलंदाजीने संघाला तीनशे धावांचा टप्पा ओलाडूंन दिला तर गोलंदाजीमध्ये इफ्तिकार अंजुमने पटकाविलेल्या पाच विकेट्समुळे पाकिस्तानने श्रीलंकेवर सहज विजय मिळविला.

व्हॉलिबॉल: भारतापुढे गतविजेत्या ब्राझीलचे आव्हान
पुणे ७ ऑगस्ट/प्रतिनिधी

ऐतिहासिक कामगिरीची मालिका पुढे सुरू ठेवण्यासाठी उत्सुक असलेल्या यजमान भारताला जागतिक कनिष्ठ व्हॉलिबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीत उद्या गतविजेत्या ब्राझीलच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत क्युबाची अजेर्ंटिनाशी गाठ पडणार आहे.

सार्क कॅरम: भारताची विजयी सलामी
मुंबई, ७ ऑगस्ट / क्री. प्र.

भारताने १३ व्या सार्क कॅरम स्पर्धेत आज विजयी सलामी दिली. मुंबईत प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये करण्यात आले असून, सलामीच्या सामन्यात भारतीय पुरुष संघाने बांगलादेशवर ३-० मात केली. तर भारतीय महिला संघाने मालदिववर ३-० असा सफाईदार विजय मिळविला. भारताच्या राधाकृष्णनने बांगलादेशच्या मोहम्मद अली २५-५, २५-२० अशी तर योगेश परदेशीने रेहमानवर १४-७, २३-२१ अशी मात केली. भारताच्या हिदायत अंसारीने बांगलादेशच्या हुमायुन कबिरला २५-११, २५-७ असे नमविले.या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा भारताचे माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्या हस्ते साजरा झाला.

१३ ऑगस्ट रोजी बीसीसीआयची बैठक
नवी दिल्ली, ७ ऑगस्ट/ वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारी समितीची बैठक १३ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे.या बैठकीअगोदर एक दिवस म्हणजे १२ ऑगस्ट रोजी मंडळाच्या अर्थविषयक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेसाठीच्या खर्चावर चर्चा करण्यात येणार आहे.१६ ऑगस्ट रोजी चॅम्पियन करंडक आणि श्रीलंका दौऱ्यासाठी संघ निवडीसाठी निवड समितीची बैठक होणार आहे, असे नियामक मंडळाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.