Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

अकरावीसाठी अद्यापही भरपूर जागा शिल्लक
शिक्षणाधिकारी पाटील यांचा भ्रमणध्वनी- ९८६७२९७५८१
ठाणे / प्रतिनिधी

अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन केल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या हजारो विद्यार्थी व पालकांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातील मुख्य ऑनलाइन केंद्रावर गरुवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. दिवसभर वाट पाहूनही शिक्षण मंडळाचा एकही अधिकारी न फिरकल्याने संध्याकाळी पालकांचा संयम सुटला आणि तेथील वातावरण तंग झाले. अखेर पोलिसांनी व नेत्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती केल्यावर सायंकाळी पाचनंतर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एस. ए. पाटील यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयात येऊन एकही विद्यार्थी प्रवेशावाचून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर पालकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

अनधिकृत बांधकाम पाडताना पालिका कर्मचारी करतात ढोंगबाजी
कल्याण/प्रतिनिधी

संध्याकाळी पाचची वेळ झाली की, कल्याण- डोंबिवली पालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी तक्रार असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जातात. जाईपर्यंत साडेपाच वाजतात. सहा वाजेपर्यंत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मालकाकडून ‘चारापाणी’ खाल्ल्याने मालकाला पत्रे, खिडक्या काढून देण्यास मदत करतात आणि सहा वाजले की कार्यालयीन वेळ संपल्याचे ढोंग करून पुन्हा पालिकेत निघून येतात, अशी माहिती नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांनी महासभेत दिल्याने संपूर्ण सभागृह आवाक झाले.

बँक भरती परीक्षेसाठी शिवसेनेतर्फे मार्गदर्शन शिबीर
ठाणे/प्रतिनिधी

शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेट बँक, तसेच इतर राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये लिपिक (क्लार्क) पदासाठी होणाऱ्या भरतीमध्ये जास्तीत जास्त मराठी मुलांची निवड व्हावी, यासाठी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे मार्गदर्शन शिबीर ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता दगडी शाळा, गडकरी रंगायतन जवळ, चरई, ठाणे या ठिकाणी हे शिबीर होईल. या शिबिरात बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येईल. संपर्क- बाळा गवस (९८१९८७५५६७), अक्षर पारसनीस (९८२०४६८३६८).

विविध गुणदर्शन स्पर्धा
डोंबिवली -
डोंबिवली जिमखाना, गुरुकुल द डे स्कूल आणि सुधीर फडके स्मृती समितीतर्फे आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धेत ५२ शाळांमधील ९०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत, अशी माहिती डोंबिवली जिमखान्याचे अध्यक्ष दीपक मेजारी यांनी दिली. ८ व ९ ऑगस्ट रोजी या स्पर्धा डोंबिवली जिमखाना येथे होणार आहेत.

विद्यार्थ्यांचे अपहरण करणारे दोन तरुण गजाआड
ठाणे/प्रतिनिधी

एसएमएसद्वारे बोलावून दोन तरुणांचे त्यांच्याच गाडीमधून अपहरण करण्याचे प्रयत्न करणाऱ्या कासारवडवलीमधील दोन तरुणांना पोलिसांनी तुरुंगाची हवा दाखविली आहे. हे अपहरण खंडणीसाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. कासारवडवलीमधील बारावीत शिकणारा गौरव पुरुषोत्तम पाटील व त्याच्या मित्राचे अपहरण करणाऱ्या सन्नी जगन्नाथ दुधकर (१९, रा. मोगरपाडा) आणि रवीराज दया पुजारी (१८, रा. देवीसिद्धी अपार्टमेंट, कासारवडवली) या आरोपींना अटक करण्यात आली. एसएमएसद्वारे निरोप आल्याने गौरव आपल्या महेश शिंगे या मित्रासह वाहनांनी आरोपींना भेटायला गेले. तेव्हा आरोपीेने शस्त्रांचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्याचे प्रयत्न केले. अखेर गौरवने स्वत:ची सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

ग्रामीण रुग्णालयास श्रमजीवी संघटनेने ठोकले टाळे
वाडा/वार्ताहर

गेले अनेक दिवस कोमात गेलेल्या विक्रमगड ग्रामीण रुग्णालयावर तातडीने उपचार करावेत, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने वारंवार करूनही त्याची आरोग्य खात्याने दखल न घेतल्याने मंगळवारी या रुग्णालयालाच श्रमजीवी संघटनेने टाळे ठोकून तीव्र निषेध व्यक्त केला. तालुक्यातील दोन लाख लोकसंख्येचे आरोग्य ज्या रुग्णालयावर अवलंबून आहे, ते रुग्णालयच गेली अनेक वर्षे अनेक समस्यांनी ग्रासले आहे. दहा वर्षांपूर्वी युती शासनाने येथील प्रश्नथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा दिला. ग्रामीण रुग्णालय झाल्याने बहुसंख्य आदिवासी लोकवस्ती असलेल्या या तालुक्यांतील गोरगरिबांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र युती शासनानंतर आलेल्या काँग्रेस आघाडी सरकारने गेल्या दहा वर्षांत प्रश्नथमिक आरोग्य केंद्रातच हे ग्रामीण रुग्णालय सुरू तर ठेवलेच, पण तेही अनेक सोयी-सुविधांपासून वंचित ठेवले. वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी एक, तीन परिचारिका, एक कनिष्ठ लिपिक, तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी शासकीय रुग्णवाहिका नाही. गेली सात वर्षे हे रुग्णालय रुग्णवाहिकाविनाच सुरू आहे. नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून कासवाच्या गतीने सुरू आहे. या रुग्णालयाच्या या सर्व समस्या सुटाव्यात, म्हणून अनेक आंदोलने करणाऱ्या श्रमजीवी संघटनेलाही दाद न देणाऱ्या आरोग्य खात्याला त्यांची जागा दाखविण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, चिटणीस रूपेश डोळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी या रुग्णालयास टाळे ठोकले.

राकेश लेले यांचे अपघाती निधन
प्रतिनिधी

चतुरंग प्रतिष्ठानच्या तरुण फळीतील आघाडीचे कार्यकर्ते राकेश लेले यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३९ होते. सहकुटुंब सहलीला गेले असताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. स्नेहशील स्वभावाचे राकेश लेले गेल्या १९-२० वर्षापासून चतुरंग प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक-शैक्षणिक विभागाच्या सर्वच उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेत असत. कोकणातील खेडय़ांमधील शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या चतुरंगच्या विविध प्रकारच्या अभ्यासवर्गाच्या उपक्रमांची आखणी करण्यापासून ते कार्यक्रम यशस्वी करण्यापर्यंत सर्व जबाबदारी ते आवडीने सांभाळायचे. एवढेच नव्हे तर चतुरंग प्रतिष्ठानच्या पटावर असलेल्या सुमारे ५० मान्यवर शिक्षकांशी त्यांचा व्यक्तिगत स्नेहबंध होता. त्यामुळे शैक्षणिक उपक्रम पुढे नेण्याचे मोठे श्रेय राकेश लेले यांचेच होते.
चतुरंग प्रतिष्ठानचे काम हा त्यांचा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय होता. अभ्यासवर्गातील मुले असोत अथवा शिक्षक, संस्थेतील लोक असोत अथवा कार्यक्रमांमध्ये भेटणाऱ्या व्यक्ती असोत प्रत्येकाशी अत्यंत आपुलकीने वागून स्नेह निर्माण करण्याची त्यांची हातोटी, सर्वाशी जवळकीच्या नात्यातला आप्त म्हणून जोडलेला राहणे ही त्यांच्या आनंदमयी कार्यमग्नतेची खासियत होती.
त्यांच्या निधनाने चतुरंग कुटुंबातील सदस्य, कार्यकर्ते यांच्याबरोबरच आनंदवनचे विकास आमटे तसेच कोकणातील वहाळ-गुणदे गावचे काटदरे, मिसाळ सर आदींनी लेले कुटुंबाकडे तीव्र दु:ख व्यक्त केले.