Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

..अखेर जळगावमध्ये रोडरोमिओ प्रतिबंधक पथक
वार्ताहर / जळगाव

 

शहरात एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर टवाळखोर तरुणाकडून प्राणघातक हल्ला झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी ‘रोडरोमिओ प्रतिबंधक पथक’ स्थापन केले आहे. पालक वर्गाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असले तरी पथकातील सदस्यांकडून प्रामाणिकपणे काम व्हावे, जेणेकरून खरोखरच टवाळखोरीवर प्रतिबंध बसेल अशी अपेक्षा येथे व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर अमित परदेशी या तरुणाने प्राणघातक हल्ला केला. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हे थरारनाटय़ घडले असले तरी झालेल्या प्रकरणाने अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर तसेच संपूर्ण शहरातच घबराटीचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर गेल्या वर्षीच्या माधुरी शेवाळे या विद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येच्या घटनेची चर्चा सुरू झाली. शहरात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी एखाद्या विशेष पथकाच्या नेमणुकीची आवश्यकताही व्यक्त केली जात होती. शहरात नेहमीच घडत असलेल्या अशा घटनांनी धास्तावलेल्या पालक वर्गानेही टवाळखोरांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर ही वेळच आली नसती, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत होती.
दरम्यान, पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी यांनी उपनिरीक्षक अनुश्री बोराडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केले असून या पथकाने आपले कामही सुरू केले आहे. नागरिकांकडून पथकाचे स्वागत करण्यात येत असून पथकानेही कारवाई सुरू केली आहे. बोराडे यांच्या पथकाने शहरातील बहुतेक शाळा, महाविद्यालयात जाऊन मुख्याध्यापक, प्राचार्याची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येते. टवाळखोरांची रोमिओगिरी फक्त शाळा किंवा महाविद्यालयापुरतीच मर्यादित नाही हे बोराडेंच्या पथकाने लक्षात घ्यायला हवे. शहराच्या जवळपास प्रत्येक गल्ली-बोळात, चौकात, बाजार पेठेत, कॉलनीत रस्त्यांवर खासगी शिकवणी वर्गाच्या बाहेर रोमिओगिरी मोठय़ा प्रमाणात फोफावली आहे. त्यामुळे विशेष पथकाने आपली दहशत या साऱ्या ठिकाणी निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रविण साळुंखे यांनी सुद्धा त्यांच्या वेळी असे पथक स्थापन कऱ्ण्याचा प्रयोग केला होता. परंतु, पथकातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी रोमिओंवर कारवाई करण्याऐवजी खाकी वर्दी व रुबाबाचा वापर आपले खिसे भरण्यासाठी केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या पथकातील काही पोलीस निर्जन स्थळी प्रेमविरांकडून खंडणी उकळायला लागले होते. कारवाई तर दूरच उलट अशा तक्रारी आल्याने अधीक्षकांनी ते पथकच बंद केले होते. या पाश्र्वभूमीवर टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवरच सोपविण्यात आल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व पथकानेही प्रामाणिक काम करावे, अशी अपेक्षा येथे व्यक्त होत आहे.