Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कोटबांधणी येथे गॅस्ट्रोसदृश आजाराने दोन बालकांचा मृत्यू
वार्ताहर / शहादा

 

तालुक्यातील म्हसावद परिसरात गॅस्ट्रोसदृश रोगाची लागण झाली असून त्यामुळे कोटबांधणी येथील दोन बालके दगावली तर अन्य नऊ रुग्णांना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आजारामुळे रश्मी गोरख भील (१ वर्ष), कमला फुलसिंग भिल (८ महिने) या दोन बालकांचा कोटबांधणी येथे मृत्यू झाला. दूषित पाणी प्याल्यानेच या सर्वाना बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांना किंवा घरोघरी क्लोरीनची बाटली देतात, परंतु ते क्लोरीन पाण्यात टाकत नाहीत, उलट काही जण या क्लोरीनचा उपयोग मासेमारीसाठी करतात असा अनुभव आहे. क्लोरीन नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यात टाकले तर तेवढय़ा परिसरातील माशांना ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे ते पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात आणि त्यांना पकडणे सोपे जाते. त्यामुळे अनेकजण क्लोरीनचा वापर मासेमारीसाठी करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे क्लोरीनचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी करावा, तरच आरोग्य चांगले राहील व गॅस्ट्रोसारख्या आजारांचा त्रास होणार नाही, असे आवाहन म्हसावद ग्रामीण रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.