Leading International Marathi News Daily

शनिवार, ८ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सटाणा वळण रस्त्याचे काम लवकरच
वार्ताहर / सटाणा

 

सटाणा वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास शहरातून जाणारी अवजड वाहने शहराबाहेरून जाणार असल्याने वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे वळण रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे, अशी माहिती राम इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक यु. डी. नेहेते यांनी दिली.
पावसामुळे खराब झालेल्या सोग्रस फाटा ते पिंपळनेर या दरम्यानच्या रस्त्याची दुरूस्ती युध्दपातळीवर केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर विंचूर-प्रकाशा राज्य मार्गाचे काम इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे करण्यात येत आहे. सोग्रस फाटा ते पिंपळनेर या दरम्यान रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने नागरिकांकडून तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यासंदर्भात अखेर नेहेते यांनी आपली बाजू मांडली.
या मार्गाचे खडीकरण, डांबरीकरण दर्जेदार केल्याचा दावाही त्यांनी केला. अपघात झाल्यावर रस्त्याला दोष दिला जातो. हा रस्ता रहदारीसाठी योग्यच असून या मार्गावर वाहने नियंत्रितपणे चालविणे ही चालकांची जबाबदारी आहे. भरधाव तसेच ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातच अनेक अपघात होतात. दुचाकी वाहनचालक व अवजड वाहनचालकांच्या चुकांमुळेही अपघात झाल्याचे सांगत त्यांनी या रस्त्यावरील अपघातांचा सर्व दोष चालकांवर ढकलला. रस्ता खराब झाला म्हणून अपगात वाढले असा अपप्रचार केला जातो, ही बाब चुकीची असल्याचा दावाही त्यांनी केला. वळण रस्त्यासाठी भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागल्यावर वळण रस्त्याचे काम हाती घेऊन वर्षांच्या आत ते पूर्ण करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.